मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूक प्रचाराचा धुरळा उडत असतानाच वांद्रे पूर्व भागात एक धक्कादायक घटना घडली आहे. शिवसेना (शिंदे गट) उमेदवार सलीम कुरेशी यांच्यावर भररस्त्यात प्रचारफेरी दरम्यान एका अज्ञात हल्लेखोराने चाकूने हल्ला केला. ज्ञानेश्वर नगर झोपडपट्टी परिसरात बुधवारी सायंकाळी ही घटना घडली असून, या हल्ल्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
वांद्रे पूर्व येथील वॉर्ड क्रमांक ९२ मधून सलीम कुरेशी हे महायुतीचे (शिंदे गट) उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत. बुधवारी सायंकाळी ५ च्या सुमारास ते आपल्या समर्थकांसह ज्ञानेश्वर नगर भागातील एका चिंचोळ्या गल्लीतून प्रचारफेरी काढत होते. कार्यकर्त्यांच्या घोषणाबाजीने परिसर दुमदुमलेला असतानाच, तिथे दबा धरून बसलेल्या अज्ञात हल्लेखोराने कुरेशी यांच्या पोटात चाकूने वार केले आणि गर्दीचा फायदा घेत पळ काढला.
हे ही वाचा:
प्रदूषणामुळे श्वास घेणे कठीण होत आहे?
भारताची अर्थव्यवस्था पुन्हा वेगात
ड्रोन हल्ल्यांविरोधात भारताचे नवे संरक्षण कवच
पंतप्रधान मोदींशी आपले चांगले संबंध !
कार्यकर्त्यांची धावपळ, कुरेशींची प्रकृती स्थिर
हल्ला इतक्या अनपेक्षितपणे झाला की, कुरेशी रक्ताच्या थारोळ्यात पडल्यानंतरच कार्यकर्त्यांच्या लक्षात हा प्रकार आला. त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. सुदैवाने, त्यांच्यावर उपचार झाले असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
परिसरात तणाव, पोलिसांचा मोठा बंदोबस्त
हल्ल्याच्या बातमीने वांद्रे पूर्व परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
घटनेची माहिती मिळताच खेरवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. या वॉर्डमध्ये कुरेशी यांच्या विरोधात शिवसेना (ठाकरे गट) उमेदवार अरुण कांबळे रिंगणात असल्याने राजकीय वाद उफाळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
“आम्ही अज्ञात हल्लेखोराविरुद्ध गुन्हा दाखल केला असून सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने त्याचा शोध घेत आहोत. परिसरात शांतता राखण्यासाठी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे,” अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली.
