गोवंडी परिसरात बकरीच्या मलमूत्राच्या साफसफाईवरून झालेल्या क्षुल्लक वादातून एक धक्कादायक घटना घडली आहे. बकरी घरासमोर बांधल्याच्या रागातून सख्ख्या दोन भावांनी शेजारी राहणाऱ्या वृद्धावर बेल्टने बेदम मारहाण केली. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या वृद्धाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतक मोहम्मद इकबाल हे कुटुंबासह फैजुल रसूल मशिदीजवळ राहत होते. त्यांच्या समोर राहणाऱ्या मोहम्मद इलियास कुरेशीने बकरी ईदच्या काळात बकरी विकत घेतली होती. इलियास रात्री बकरी घरासमोर बांधत असून तिचे मलमूत्र नाल्यात किंवा थेट मृतकांच्या घरासमोर टाकत होता. याबाबत इकबाल व त्यांच्या कुटुंबीयांनी अनेकदा समज दिली होती; मात्र इलियासकडून दुर्लक्ष करण्यात येत होते.
हे ही वाचा:
विधानसभा निवडणुका होतील तेव्हा पक्ष पूर्ण बहुमत मिळवेल
बांधकाम व्यावसायिकाकडून १० कोटी खंडणीप्रकरणी दोन महिला जेरबंद
महिला वाहतूक पोलीसाने प्रसंगावधान राखले म्हणून…
रुची ग्रुप बँक फसवणूक : ईडीची मोठी कारवाई
२१ डिसेंबर रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास इकबाल यांनी पुन्हा एकदा बकरीच्या मलमूत्राची साफसफाई करण्यास सांगितले. यावेळी इलियासचा भाऊ मोहम्मद रियाज कुरेशी बाहेर आला आणि शिवीगाळ करत वादात उडी घेतली. मृतकाचा धाकटा मुलगा फैसल याने विरोध केला असता इलियासने त्याच्या कानाखाली मारली. परिस्थिती चिघळत असल्याचे पाहून इकबाल मध्यस्थी करण्यासाठी पुढे आले. मात्र याच क्षणी इलियासने त्यांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण सुरू केली, तर रियाजने कंबरेतील बेल्ट काढून इकबाल यांच्या डोक्यावर जोरदार वार केला. बेल्ट तुटल्यानंतरही रियाजने तुटलेल्या बेल्टने सतत प्रहार केला.
या मारहाणीत इकबाल गंभीर जखमी होऊन बेशुद्ध पडले. स्थानिकांनी त्यांना तातडीने शताब्दी रुग्णालयात दाखल केले; मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. मृतकाचा मुलगा मोहम्मद फैजान याच्या तक्रारीवरून शिवाजीनगर पोलिसांनी दोन्ही भावांविरोधात खुनासह गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी मंगळवारी मोहम्मद इलियास कुरेशी आणि मोहम्मद रियाज कुरेशी यांना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.
