एका ३७ वर्षीय कोरिओग्राफरचा अश्लील व्हिडिओ गुप्तपणे रेकॉर्ड करून तो व्हायरल करण्याची धमकी देत तब्बल ९ लाख रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी मालाड पोलिसांनी एका महिलेसह चार जणांना अटक केली आहे. विशेष म्हणजे, हा व्हिडिओ कोरिओग्राफरकडूनच नृत्याचे धडे घेणाऱ्या त्याच्या विद्यार्थ्यानेच रेकॉर्ड केल्याचे तपासात उघड झाले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मालाड परिसरात राहणाऱ्या या कोरिओग्राफरला १५ डिसेंबर रोजी एका अनोळखी क्रमांकावरून व्हॉट्सअॅप कॉल आला. कॉल करणाऱ्याने त्याच्याकडे कोरिओग्राफरचा नग्न अवस्थेतील व्हिडिओ असल्याचा दावा केला. पैसे न दिल्यास हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देण्यात आली. काही वेळातच ही क्लिप त्याला पाठवण्यात आली आणि नंतर दुसऱ्या क्रमांकावरून ती इंस्टाग्रामवरही शेअर करण्यात आली.
हे ही वाचा:
राहुल गांधी जर्मनीत भारतविरोधी लोकांना का भेटले?
‘पृथ्वीराज चव्हाण यांना म्हातारचळ लागला आहे!’
निसर्गाच्या संकल्पनेवरील अनोखे गुवाहाटी विमानतळ देशाला समर्पित
भ्रष्टाचाराचे खटले हस्तांतरित करण्याची राबडी देवींची याचिका फेटाळली
धमकीची तीव्रता वाढवण्यासाठी आरोपींनी हा व्हिडिओ तक्रारदाराच्या पुतण्याला तसेच त्याच्या एका कर्मचाऱ्यालाही पाठवला. तक्रारदार आपल्या मोठ्या भावासोबत राहतो, ही बाब आरोपींना माहीत होती. त्यामुळे मागणी पूर्ण न झाल्यास इतर नातेवाईकांनाही व्हिडिओ पाठवण्याची धमकी देत त्याच्यावर मानसिक दबाव आणण्यात आला.
या धमक्यांमुळे घाबरलेल्या तक्रारदाराने सुरुवातीला आरोपींच्या मागणीनुसार पैसे देण्यास होकार दिला. वाटाघाटीनंतर त्याने ६ लाख रुपये दिले. मात्र, त्यानंतर त्याने धैर्य एकवटत मालाड पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत १६ डिसेंबर रोजी पहाटे भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत गुन्हा दाखल केला.
त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून अनमोल राज अरोरा (२१), लकी संतोष वर्मा (२०), हिमांशू योगेश कुमार (२३) आणि दिपाली विनोद सिंग (३०) या चौघांना अटक केली. यामध्ये अरोरा आणि वर्मा हे मुख्य आरोपी असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.
पोलिस तपासात उघड झाले की, अरोरा हा गेल्या जवळपास दोन वर्षांपासून तक्रारदाराकडून नृत्य शिकत होता. त्याच दरम्यान त्याने कोरिओग्राफरच्या घरी हा अश्लील व्हिडिओ गुप्तपणे रेकॉर्ड केला. नंतर वर्मा, कुमार आणि सिंग यांना या खंडणीच्या कटात सामील करून घेण्यात आले.
सापळ्याच्या भाग म्हणून तक्रारदाराला गोरेगाव येथील विवेक कॉलेजजवळ आरोपीला भेटण्यास सांगण्यात आले. पैसे घेण्यासाठी दिपाली सिंगने तक्रारदाराशी संपर्क साधला. मात्र, तक्रारदाराने व्हिडिओ असलेला मोबाईल फोन देण्याची अट घातली. त्यानंतर दिपालीने इतर आरोपींशी संपर्क साधून मोबाईल फोन घटनास्थळी आणण्यास सांगितले.
लकी वर्मा आणि हिमांशू कुमार व्हिडिओ असलेला मोबाईल घेऊन येताच पोलिसांनी त्यांना रंगेहात अटक केली. चौकशीत अनमोल अरोरानेच व्हिडिओ रेकॉर्ड केल्याची कबुली दिल्यानंतर त्यालाही अटक करण्यात आली. या प्रकरणी वरिष्ठ निरीक्षक दुष्यंत चौहान यांनी अटकेची पुष्टी केली असून, आरोपींकडून आणखी काही बाबी उघड होण्याची शक्यता असल्याने पुढील तपास सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
