नववर्षाच्या पूर्वसंध्येला सांताक्रूझ पूर्व येथील कलिना परिसरात एक धक्कादायक आणि संतापजनक घटना उघडकीस आली आहे. नवीन वर्षाची मिठाई खाण्यासाठी बोलावून २५ वर्षीय विवाहित प्रेयसीने आपल्या ४४ वर्षीय प्रियकराचे गुप्तांग छाटल्याची घटना घडली आहे.
या प्रकरणात गंभीर जखमी झालेल्या प्रियकरावर सायन रुग्णालयात उपचार सुरू असून, आरोपी प्रेयसी फरार झाली आहे. वाकोला पोलिसांनी तिच्याविरोधात गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करून शोधमोहीम सुरू केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिला ही जखमी व्यक्तीच्या बहिणीची नणंद आहे. सांताक्रूझ पूर्व येथे गेल्या १८ वर्षांपासून कुटुंबासह राहणाऱ्या जखमी व्यक्तीचा आणि आरोपी महिलेचा मागील सहा ते सात वर्षांपासून प्रेमसंबंध होता. मात्र, आरोपी महिला त्याने पत्नीला सोडून आपल्याशी लग्न करावे, यासाठी सातत्याने दबाव टाकत होती. यावरून दोघांमध्ये वारंवार वाद होत होते.
या त्रासाला कंटाळून जखमी व्यक्ती नोव्हेंबर २०२५ मध्ये बिहारला निघून गेला होता. मात्र, तरीही आरोपी महिलेने फोनवरून धमक्या देणे सुरूच ठेवले होते. १९ डिसेंबर रोजी तो मुंबईत परतला असला तरी त्याने आरोपीशी संपर्क टाळला होता.
३१ डिसेंबरच्या रात्री सुमारे दीड वाजण्याच्या सुमारास आरोपी महिलेने नवीन वर्षाची मिठाई देण्याच्या बहाण्याने प्रियकराला आपल्या घरी बोलावले. तो घरी पोहोचला असता आरोपीची दोन्ही मुले झोपलेली होती. तिने प्रियकराला पँट काढण्यास सांगून स्वयंपाकघरात जाऊन भाजी कापण्याचा चाकू आणला आणि अचानक त्याच्या गुप्तांगावर वार केला.
हे ही वाचा:
भारतीय महिला क्रिकेट संघाने महाकाल दर्शन घेत २०२६ चे स्वागत
स्वित्झर्लंडमधील बारला आग; ४० लोकांचा मृत्यू
केकेआरच्या मुस्तफिजूर निवडीवर वाद
डिजिटल पेमेंटमध्ये भारताची मोठी झेप
रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या जखमी व्यक्तीने कसाबसा जीव वाचवत घर गाठले. त्यानंतर मुलगा आणि मित्रांच्या मदतीने त्याला प्रथम व्ही. एन. देसाई रुग्णालयात, तर पुढील उपचारांसाठी सायन रुग्णालयात हलवण्यात आले. डॉक्टरांच्या माहितीनुसार जखम खोल असून शस्त्रक्रिया करावी लागण्याची शक्यता आहे.
या घटनेमुळे कलिना परिसरात मोठी खळबळ उडाली असून, वाकोला पोलीस फरार प्रेयसीचा कसून शोध घेत आहेत.
