हस्तांदोलन टाळणे पुरेसे नाही; भारत-पाक क्रिकेट सामने रद्द करा

हिंदु जनजागृती समितीची मागणी

हस्तांदोलन टाळणे पुरेसे नाही; भारत-पाक क्रिकेट सामने रद्द करा

पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने १५ फेब्रुवारी २०२६ पासून श्रीलंकेतील कोलंबो येथे प्रारंभ होणाऱ्या ‘आयसीसी टी-२० वर्ल्ड कप’ क्रिकेट स्पर्धेमध्ये भारतासोबत सामना खेळण्याची तयारी दर्शवली असली, तरी भारत सरकारने या प्रस्तावाला बळी पडू नये. ‘‘जोपर्यंत सीमेपलीकडून होणारा आतंकवाद थांबत नाही, तोपर्यंत पाकिस्तानशी कोणतेही संबंध ठेवू नये,’’ ही भारताची ठाम भूमिका असायला हवी. क्रिकेटच्या मैदानात केवळ हस्तांदोलन टाळून पाकिस्तानचा निषेध करणे पुरेसे नाही. क्रिकेटच नव्हे, तर कोणत्याही प्रकारे पाकिस्तानशी संबंध ठेवू नये. ‘रक्ताचे डाग क्रिकेटच्या जर्सीने लपवता येत नाहीत’, अशी ठाम भूमिका भारत सरकारने घ्यावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने ठिकठिकाणच्या आंदोलनातून केली.

राजाराम पूल, सिंहगड रस्ता, पुणे या ठिकाणी झालेल्या आंदोलनात सनदी लेखापाल आणि अधिवक्ता सर्वेश मेहेंदळे, राष्ट्रभक्त अधिवक्ता समितीच्या अधिवक्ता मुग्धा बिवलकर, भाजप महिला मोर्चाच्या सरचिटणीस उज्ज्वला गौड, हिंदु जनजागृती समितीचे पराग गोखले आणि हिंदु राष्ट्र समन्वय समितीचे पुणे जिल्हा संयोजक सचिन घुले आदी मान्यवर उपस्थित होते. अशाच प्रकारे अहिल्यानगर येथील दिल्ली गेट येथेही निषेध आंदोलन करण्यात आले होते. तसेच सातारा, कोल्हापूर आणि राज्यभरात ठिकठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन भारत-पाक क्रिकेट सामने रद्द करण्याची आग्रही मागणी समिती आणि हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी केली.

या संदर्भात समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते रमेश शिंदे यांनी म्हटले आहे की,भारताने ‘सिंधू जल करारा’च्या वेळी ‘‘पाणी आणि रक्त एकाच वेळी वाहू शकत नाही,’’ अशी कणखर भूमिका घेतली होती. तीच भूमिका क्रिकेट संदर्भातही घ्यावी. सीमेवर आमचे जवान रक्त सांडत असतांना आणि देशात ‘ऑपरेशन सिंदूर’सारखी गंभीर मोहीम सुरू असतांना पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळणे, हा आपल्या जवानांचा अन् देशप्रेमी जनतेचा घोर अपमान आहे.

पाकिस्तानी खेळाडू हे केवळ खेळाडू नसून अनेकदा ते भारतविरोधी अजेंडा राबवतांना दिसतात. शाहीद आफ्रिदी आणि जावेद मियांदाद अनेकदा काश्मीरवर गरळ ओकतात, तर शोएब अख्तरने उघडपणे ‘गझवा-ए-हिंद’चे (भारतावर इस्लामिक आक्रमणाचे) समर्थन केले होते. अशा मनोवृत्तींच्या खेळाडूंसोबत भारताने का खेळायचे?

बांगलादेशात हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर बीसीसीआयने काही दिवसांपूर्वीच बांगलादेशी खेळाडू मुस्तफिझुर रहमान याला ‘कोलकाता नाइट रायडर्स’ संघातून वगळण्यास भाग पाडले आहे. तीच कठोर भूमिका आता पाकिस्तानसोबत घ्यायला हवी. खेळ आणि आतंकवाद हातात हात घालून चालू शकत नाहीत. भारत सरकारने ठणकावून सांगावे, अशी मागणी समितीचे प्रवक्ते रमेश शिंदे यांनी केली.

Exit mobile version