मालेगाव येथे घडलेल्या एका वादग्रस्त घटनेने शहरात तसेच राज्यभरात चर्चेला तोंड फोडले आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये मालेगाव महानगरपालिकेच्या वीज विभागाच्या कार्यालयात नमाज अदा करण्यात आल्याचे दिसत आहे. या घटनेवरून विविध राजकीय प्रतिक्रिया उमटत असून भाजपाने कारवाईची मागणी केली आहे.
ही घटना शहरातील एका प्रभागातील दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या वीज समस्येशी संबंधित असल्याचे सांगितले जात आहे. स्थानिक नागरिकांनी वारंवार तक्रारी आणि लेखी निवेदने देऊनही वीजपुरवठ्याचा प्रश्न सुटला नसल्याचा आरोप केला आहे.
या पार्श्वभूमीवर, संबंधित प्रभागातील नागरिकांनी लुकमान कमाल यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेच्या वीज विभाग कार्यालयात आंदोलन छेडले. ते मालेगाव लोकसंघर्ष समितीचे अध्यक्ष आहेत.
दरम्यान, हा आंदोलनाचा दिवस रमजान महिन्यातील होता आणि असर नमाजची वेळ झाली होती. आंदोलनकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, त्यांना दुपारी ३ वाजता कार्यालयात बोलावण्यात आले होते; मात्र संबंधित अधिकारी बैठकीत असल्याचे सांगण्यात आले आणि ते उपस्थित झाले नाहीत.
हे ही वाचा:
झारखंडमधील अपघातग्रस्त एअर ऍम्ब्युलन्समध्ये ब्लॅक बॉक्स नव्हता! कसा होणार तपास?
खाण विभागात काम करणाऱ्या अधिकाऱ्याच्या घरात सापडली ‘पैशाची खाण’
…आणि ‘धुरंधर’ने असा बदला घेतला!
भारताच्या रिअल इस्टेट क्षेत्रात AI ची एंट्री
लुकमान कमाल यांनी स्पष्टीकरण देताना म्हटले, “जर आम्ही नमाजसाठी बाहेर पडलो असतो, तर कार्यालय बंद झाले असते आणि दुसऱ्या दिवशीही वीज मिळाली नसती. त्यामुळे असर नमाज आम्ही कार्यालयातच अदा केली.”
या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल झाला आणि शहरात तीव्र चर्चा सुरू झाली. काही नागरिकांनी याला शांततापूर्ण आणि परिस्थितीजन्य आंदोलनाचे स्वरूप असल्याचे म्हटले, तर काहींनी सरकारी कार्यालयात धार्मिक विधी करणे योग्य आहे का, असा प्रश्न उपस्थित केला.
किरीट सोमय्या यांची कारवाईची मागणी
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आरोप केला की, काही सरकारी कर्मचाऱ्यांनी महापालिकेच्या कार्यालयात नमाज अदा केली आणि त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला. त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून संबंधितांवर एफआयआर दाखल करावा आणि कर्मचाऱ्यांना निलंबित करावे, अशी मागणी केली आहे.
सोमय्या यांनी ‘एक्स’वरील पोस्टमध्ये म्हटले की, “मालेगाव सरकारी कार्यालयात नमाज अदा करण्यात आली. अधिकाऱ्यांनी हे बेकायदेशीर कृत्य असल्याचे मान्य केले आहे. मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कठोर कारवाई करण्याची विनंती केली आहे. या प्रकरणी प्रशासनाकडून अधिकृत भूमिका स्पष्ट होण्याची प्रतीक्षा आहे. दरम्यान, ही घटना सामाजिक आणि राजकीय पातळीवर चर्चेचा विषय ठरली आहे.
