लव्ह जिहाद रोखण्यासाठीचे प्रयत्न घरापासून आणि कुटुंबातूनच सुरू झाले पाहिजेत, तसेच कुटुंबातील सदस्यांमध्ये नियमित संवाद असल्यास ही समस्या मोठ्या प्रमाणात हाताळता येऊ शकते. राज्याच्या राजधानी भोपाळ येथे त्यांच्या दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी संवाद साधताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी हे वक्तव्य केले.
भगवत म्हणाले, “आपली मुलगी एखाद्या अनोळखी व्यक्तीच्या प्रभावाखाली कशी येऊ शकते, याचा आपण गांभीर्याने विचार केला पाहिजे.” त्यांच्या मते, कुटुंबातील सदस्यांमधील परस्पर संवादाचा अभाव आणि आपापसातील नातेवाईक यांच्यात संवाद कमी असणे ही या समस्येची महत्त्वाची कारणे आहेत.
ते पुढे म्हणाले, “कुटुंबात सातत्याने संवाद असेल, तर धर्म, संस्कृती आणि परंपरेबद्दलचा आदर आपोआप निर्माण होतो.” लव्ह जिहाद रोखण्यासाठी तीन अत्यावश्यक उपाय भगवत यांनी सुचवले की, कुटुंबातील सतत आणि मोकळा संवाद असला पाहिजे. मुलींमध्ये सावधगिरीची जाणीव आणि आत्मसंरक्षणाचे प्रशिक्षण असले पाहिजे. तसेच अशा प्रकारचे गुन्हे करणाऱ्यांवर प्रभावी आणि कठोर कारवाई व्हायला हवी.
त्यांनी सांगितले की, सामाजिक संघटनांनी अशा घडामोडींबाबत सतर्क राहिले पाहिजे आणि समाजाने सामूहिक पातळीवर विरोध केला, तरच या समस्येवर तोडगा निघू शकतो. समाज सुसंस्कृत असल्याची चर्चा होत असताना महिलांची भूमिका ही केंद्रस्थानी असते, असे सांगत भागवत म्हणाले की, “आपला धर्म, आपली संस्कृती आणि आपली सामाजिक रचना सुरक्षित आहे, ती महिलांमुळेच.”
हे ही वाचा:
‘अमेरिका चालवणार व्हेनेझुएलाचा कारभार’
भारताकडे आता रामबाण…रामजेटवर चालणारा तोफगोळा लष्करात दाखल
७ मराठा लाईट इन्फंट्रीचा शौर्य, स्मृतींचा मेळावा आज सोलापूरमध्ये
बांगलादेशात कट्टरपंथ्यांच्या बळी ठरला आणखी एक हिंदू
ते पुढे म्हणाले, “महिलांना केवळ सुरक्षेच्या कारणास्तव घरात बंद ठेवण्याचा काळ आता संपला आहे. आज कुटुंब आणि समाज पुढे नेण्याचे काम स्त्री-पुरुष दोघेही एकत्र करत आहेत. त्यामुळे दोघांचेही प्रबोधन अत्यावश्यक आहे. महिलांचे सक्षमीकरण, त्यांना संधी उपलब्ध करून देणे आणि त्यांचे वैचारिक प्रबोधन ही आजच्या काळाची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. ही प्रक्रिया सुरू झाली आहे. महिला समाजाच्या प्रत्येक क्षेत्रात पुढे जात आहेत, मात्र ही गती आणखी वाढवण्याची गरज आहे, असे मोहन भागवत यांनी नमूद केले.
लैंगिक भेदभाव आणि महिलांवरील अन्याय-अत्याचार या विषयावर बोलताना ते म्हणाले की, पाश्चिमात्य समाजात महिलांचा दर्जा विवाहानंतर ठरतो, तर भारतीय परंपरेत महिलांचा दर्जा मातृत्वामुळे उंचावतो. “मातृत्व हेच आपल्या मूल्यव्यवस्थेचे केंद्र आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.
आधुनिकतेच्या नावाखाली लादली जाणारी पाश्चिमात्यीकरणाची वाटचाल ही आंधळी शर्यत असल्याचे सांगत त्यांनी म्हटले की, “लहानपणापासून आपण मुलांमध्ये कोणती मूल्ये रुजवत आहोत, याचा गांभीर्याने विचार करणे आवश्यक आहे.” महिलांना स्वतःचे संरक्षण करता येईल इतके सक्षम करणे महत्त्वाचे असून, आपल्या परंपरा महिलांना मर्यादित करत नाहीत, तर त्यांना अधिक सक्षम आणि असामान्य बनवतात, असेही त्यांनी ठामपणे सांगितले. राणी लक्ष्मीबाई यांचे उदाहरण देत त्यांनी सांगितले की, भारतीय महिलांनी प्रत्येक युगात आपले शौर्य आणि धैर्य सिद्ध केले आहे.
भागवत यांनी पुढे म्हटले की, आज संपूर्ण जग भारताकडे आशेने पाहत आहे आणि भारत त्या भूमिकेसाठी स्वतःला तयार करत आहे. देशाच्या लोकसंख्येतील सुमारे ५० टक्के लोकसंख्या महिलांची असून, मोठ्या प्रमाणावर महिला समाज आणि राष्ट्रासाठी कार्यरत आहेत. मात्र, अजूनही अनेक महिला या प्रक्रियेत सहभागी झालेल्या नाहीत, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
“जिथे महिलांचा सन्मान केला जातो आणि त्यांचे स्थान सुरक्षित असते, तिथे समाज आपोआप सुदृढ राहतो,” असे ते म्हणाले. आज समाजासमोर सांस्कृतिक आक्रमणाचे नवे आव्हान उभे ठाकले असून, त्याला ‘कल्चरल मार्क्सिझम’ आणि ‘वोकिझम’ अशी नावे दिली जात असल्याचे त्यांनी नमूद केले. “या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी आपला धर्म, मूल्ये आणि परंपरा यांचे सखोल आकलन अत्यावश्यक आहे,” असे मतही त्यांनी व्यक्त केले.
