प. बंगाल विधानसभा निवडणुकांचे रणमैदान अवघ्या दोन दिवसांवर आले आहे. विधानसभेची निवडणूक असली तरी देशातील कोट्यवधी लोकांचे लक्ष प. बंगालकडे आहे. प. बंगालमध्ये कोणाचे सरकार येते, यावर आपल्या अंतर्गत सुरक्षेचे भवितव्य अवलंबून आहे. २०२१ च्या निवडणुकीत ममता बॅनर्जी यांच्या पक्षाला एकतर्फी विजय मिळाला होता. तृणमूल काँग्रेसला २१५ जागा आणि भाजपाला केवळ ७७ जागांवर विजय मिळाला होता. २९४ जागांच्या विधानसभेत बहुमतासाठी १४८ जागा लागतात. गेल्या निवडणुकीत ७० जागा अशा आहेत, जिथे भाजपाचा निसटता पराभव झाला होता.
प. बंगालच्या निवडणुकीत बांगलादेशींच्या घुसखोरीचा मुद्दा भाजपाने उपस्थित केला आहे. हा मुद्दा राष्ट्रीय सुरक्षेशी थेट संबंधित असल्यामुळे प. बंगाल निवडणुकांची देशभरात चर्चा आहे. यापूर्वी बांगलादेशींच्या घुसखोरीमुळे पोखरलेल्या आणि लोकसंख्येचे गणित बिघडलेल्या आसाममध्ये भाजपाने सत्ता मिळवली आणि ती टिकवली. येत्या निवडणुकीतही भाजपाला तिथे यश मिळेल, अशी दाट शक्यता आहे; कारण काँग्रेसकडे ना नेते, ना कार्यकर्ते अशी परिस्थिती आहे. घुसखोरीमुळे मुस्लीम मतांचा टक्का बेसुमार वाढला आहे, अशा आसामसारख्या राज्यात सत्ता मिळवण्यात भाजपाला यश मिळाले आहे. त्यामुळे प. बंगालचे गणितही यंदा सुटेल, अशी भाजपा नेत्यांना आशा आहे. लढाई सोपी नाही, हे त्यांना ठाऊक आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यापासून सर्व संघटना यात ताकदीने उतरल्या आहेत.
मोदी-शाह यांचे प. बंगालमध्ये तुफानी दौरे झाले आहेत. अमित शाह यांनी तर काही जिल्ह्यांत रात्री मुक्कामही ठोकला होता. मेहनतीच्या बाबतीत या दोन्ही नेत्यांचा हात धरणारा विरोधी पक्षात एकही नेता नाही. ७५ वर्षांचे पंतप्रधान मोदी एखाद्या सामान्य कार्यकर्त्यासारखे जमिनीवर उतरून प्रचार करत आहेत आणि लोकांशी थेट संवाद साधत आहेत. झारग्रामच्या दौऱ्यावर असताना ते एका भेळवाल्याच्या दुकानावर थांबले. तिथे त्यांनी ठेला चालवणाऱ्या विक्रम साहूशी गप्पा मारल्या, त्याच्या कुटुंबीयांची चौकशी केली आणि झालमुरी अर्थात भेळेचा आस्वाद घेतला. ही भेळ त्यांनी आजूबाजूला असलेल्या कार्यकर्त्यांना आणि लहान मुलांना वाटली.
कायदा आणि सुरक्षेचे बारा वाजलेल्या प. बंगालमध्ये मोदी स्वतःच्या सुरक्षेची फारशी चिंता न करता लोकांमध्ये मिसळत आहेत आणि उन्हाच्या कडाक्यात घाम गाळत आहेत. जनताही तापलेल्या वातावरणाची पर्वा न करता तासंतास त्यांच्या रोड शोसाठी रस्त्यावर उभी राहते. लोक फक्त त्यांना पाहण्यासाठी थांबलेले असतात. भाजपाच्या सभांना गर्दी होत आहे. वातावरण निर्मितीत भाजपाचा हात कोणीही धरू शकत नाही आणि मेहनतीच्या बाबतीतही भाजपा नेत्यांचा हात कोणी धरू शकत नाही. काँग्रेसचे नेते या प्रचाराच्या गर्दीत दिसतही नाहीत. काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे एक वैशिष्ट्य आहे; जिथे विजयाची शक्यता नसते, तिथे ते फिरकतही नाहीत. पराभवाचे खापर स्वतःच्या डोक्यावर कोण फोडून घेणार? काँग्रेस कुठेही शर्यतीत दिसत नाही.
२०२१ च्या निवडणुकीतही अशीच वातावरण निर्मिती झाली होती. भाजपाला विजय मिळेल असे चित्र दिसत होते; प्रत्यक्षात हा भ्रम ठरला. याचे कारण इथल्या लोकसंख्येच्या गणितात दडले आहे. प. बंगालमध्ये सर्वाधिक मुस्लीम लोकसंख्या असलेल्या पाच जिल्ह्यांत किमान ७० ते ७५ असे मतदारसंघ आहेत, जिथे एकतर्फी लढत आहे. भाजपाच्या जागांची मोजणी शून्यापासून आणि तृणमूलच्या जागांची ७५ जागांपासून सुरू होते. मुर्शिदाबाद, मालदा, उत्तर दिनाजपूर, बीरभूम आणि दक्षिण २४ परगणा या पाच मुस्लीमबहुल जिल्ह्यांत २९४ पैकी ८५ जागा आहेत. त्यापैकी तृणमूलने ७५ जागा जिंकल्या होत्या.
पश्चिम बंगालमध्ये मुस्लिमांचा टक्का २५ पेक्षा जास्त असलेल्या जागा ११० आहेत. यापैकी ६५ जागा अशा आहेत, जिथे मुस्लीम मतांचा टक्का ४० पेक्षा जास्त आहे. या ६५ जागांवर तृणमूलची एकतर्फी पकड आहे. उरलेल्या ४५ जागांवर मुस्लीम मतांचा टक्का २५ पेक्षा जास्त आहे, जिथे तृणमूलचा जोर असला तरी लढत होऊ शकते.
गेल्या निवडणुकीतील आकड्यांवर नजर टाकली तर भाजपाने २,००० च्या फरकाने ८, ५,००० च्या फरकाने १२ आणि १०,००० च्या फरकाने २२ जागा गमावल्या होत्या. १०,००० च्या निसटत्या फरकाने गमावलेल्या जागांची एकूण संख्या ४२ होती. तसेच, निसटत्या फरकाने जिंकलेल्या जागांची संख्या २३ होती. हा एकूण आकडा ६५ आहे. या जागांचे निकाल प. बंगालमध्ये कोणाची सत्ता येणार हे निश्चित करणार आहेत.
२०२१ च्या निवडणुकीत भाजपाला ३८.१० टक्के आणि तृणमूलला ४८.५ टक्के मतदान झाले होते. भाजपाला साधारण ६० लाख मते कमी पडली होती. भाजपाच्या पथ्यावर पडणाऱ्या काही गोष्टी यंदाच्या निवडणुकीच्या आधी निश्चितपणे घडताना दिसत आहेत. त्यातली सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे मतदार यादीतून ९१ लाख नावे कमी झाली आहेत. हे असे मतदार आहेत जे मृत आहेत, स्थलांतरित आहेत किंवा संशयास्पद आहेत. हा आकडा गेल्या निवडणुकीतील दोन्ही पक्षांतील फरकाच्या दीडपट आहे. सरासरी काढली तर प्रत्येक मतदारसंघातून ३० हजार मते कमी झाली आहेत.
एसआयआरपूर्वी मतदारांची संख्या ७.६६ कोटी होती, ती आता ६.७५ कोटींवर आली आहे. भाजपा आणि तृणमूलमधील मुकाबला आता या खऱ्या मतदारांसाठी होणार आहे.
प. बंगालमध्ये ‘बाबरी’ उभारण्याची घोषणा करणारा तृणमूल काँग्रेसचा बंडखोर नेता हुमायून कबीर मैदानात आहे. त्याने ‘आम जनता उन्नयन पार्टी’ नावाचा पक्ष स्थापन केला आहे. हा पक्ष तिथे १८२ जागा लढवणार आहे. हुमायून त्याचे उमेदवार मुस्लीमबहुल मतदारसंघातून उभे करणार हे स्वाभाविक आहे. भाजपा आणि तृणमूल हे दोन्ही पक्ष एकमेकांवर आरोप करत आहेत की, हुमायून कबीरचा पक्ष ही विरोधी पक्षाची ‘बी टीम’ आहे. कबीर यांच्या पक्षावर ‘वोट कटवा’ (मते खाणारा) पक्ष असा आरोप होत आहे. प. बंगालमध्ये तिरंगी लढतीचा इतिहास नाही, तिथे लढत एकास एक होते. यावेळीही तृणमूल आणि भाजपा अशीच थेट लढत होणार आहे.
कोणत्याही कडवट मुस्लीम पार्टीपेक्षा तृणमूलवर मुस्लिमांचा जास्त विश्वास आहे. गेल्या १५ वर्षांच्या काळात प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी कायदा आणि घटना बाजूला ठेवून मुस्लिमांना भरभरून दिले आहे. निवडणुकीच्या मंचावर त्या कलमा वाचतात, डोक्यावर हिजाब घेतात, घुसखोरांचे समर्थन करतात; त्यांना ‘जय श्रीराम’च्या घोषणांचे वावडे आहे आणि राम मंदिराच्या उभारणीलाही त्यांनी विरोध केला होता. त्यामुळे त्या एखाद्या कट्टरवादी मुस्लीम नेत्यापेक्षा मुस्लिमांमध्ये जास्त लोकप्रिय आहेत.
हे ही वाचा:
एनजीओच्या आडून धर्मांतर, लैंगिक शोषणाचा प्रकार; रियाज काजी अटकेत
मणिपूरमधून शस्त्रास्त्रे आणि स्फोटकांचा साठा जप्त
जागतिक ॲथलेटिक्स रिले चॅम्पियनशीपसाठी हर्ष राऊतची निवड
घरून काम, फक्त सहा आठवड्यांचे जेट इंधन शिल्लक
गेल्या निवडणुकीत मुस्लीम मतांमध्ये फूट पडण्याची शक्यता निर्माण झाली होती, पण ती केवळ शक्यताच राहिली; प्रत्यक्षात तसे काहीच घडले नाही. पीरजादा अब्बास सिद्दीकी नावाचा एक कट्टरवादी नेता अचानक धूमकेतूसारखा उगवला आणि निवडणूक रिंगणात उतरला. त्याने ‘इंडियन सेक्युलर फ्रंट’ नावाचा पक्ष काढला. असदुद्दीन ओवेसी यांच्या ‘ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन’ अर्थात ‘एआयएमआयएम’ने पीरजादा यांच्या पक्षाशी आघाडी स्थापन करण्याचा प्रयत्न केला, परंतु तो फसला. पीरजादा डाव्यांसोबत गेला. या निवडणुकीत एआयएमआयएमला एक टक्का मतेही पडली नाहीत. त्या तुलनेत पीरजादाला १.४ टक्के मते पडली आणि त्यांचा एक आमदार विजयी झाला. ही मते फुटकळ होती, त्यामुळे ममता यांच्या किल्ल्याचा चिराही ढळला नाही. निवडणुकीत त्यांना भरघोस बहुमत मिळाले.
प. बंगालच्या मुस्लिमांनी एकगठ्ठा मते ममता यांच्या पदरात टाकली. यावेळी पीरजादा यांची जागा हुमायून यांनी घेतली आहे. त्यांनी ओवेसी यांच्या पक्षाशी युतीही केली आहे. गेल्या वेळचा अनुभव लक्षात घेतला तर या दोघांना मिळून २-४ टक्के मते पडण्याची शक्यता आहे.
सीमा सुरक्षा दल, इंडो-तिबेट बॉर्डर पोलीस, सशस्त्र सीमा बल आणि केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल या केंद्रीय सुरक्षा बलांच्या २४०० कंपन्या राज्यात तैनात केल्या आहेत. पहिल्या टप्प्यात २३ एप्रिल रोजी १५२ मतदारसंघांत निवडणुका होतील. म्हणजेच प्रत्येक मतदारसंघात दीड हजार सशस्त्र पोलीस तैनात असतील.
(न्यूज डंकाचे संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)
