चायना पाकिस्तान इकोनॉमिक कोरीडोअरसाठी चीनने आजवर पाकिस्तानमध्ये सुमारे ७० अब्ज डॉलर ओतले. तरीही हा प्रकल्प अजून फक्त ३० टक्के पूर्ण झालेला आहे. बलोचिस्तान आणि खैबर पख्तुनख्वामध्ये प्रचंड हाणामाऱ्या सुरू असल्यामुळे उर्वरित प्रकल्प पूर्ण होण्याची शक्यता कमी आहे. या पार्श्वभूमीवर चीनने पाकिस्तानला धमकी दिली आहे, पैसा हवा असेल तर सीपेकची खोळंबलेली कामे पूर्ण करा. इशाऱ्याचा अर्थ स्पष्ट आहे, चीनचा भ्रमनिरास झाला आहे. परंतु एवढा मोठा पैसा गुंतवल्यानंतर पाकिस्तानकडून आता त्याची वसूली कशी करणार, पाकिस्तानचा एखादा लचका तोडणार काय ? भारताचे मिशन पीओके अधिक गुंतागुंतीचे होणार काय? असे अनेक प्रश्न आता निर्माण झालेले आहे.
व्हेनेझुएला प्रकरणानंतर अमेरिका आणि चीनमध्ये तणाव प्रचंड वाढला आहे. पाकिस्तान चीन आणि अमेरिका या दोन्ही दगडांवर उभा आहे. दोन्ही बाजूचे लोणी खाण्याचे काम करतो आहे, किंबहुना तो अमेरिकेच्या बाजूला जास्त कललेला आहे हे चीनच्या लक्षात आलेले आहे. हे आता चीनच्याही लक्षात आल्यामुळे चीनने आता हिशोब घ्यायला सुरूवात केली आहे. बाप दाखव नाही तर श्राद्ध कर असा पवित्रा चीनने घेतला आहे. चीनचा बेल्ट एण्ड रोड प्रकल्प एक मोठा सापळा आहे. जगातील १५० देश या सापळ्यात अडकलेले आहेत. चीनने आजवर या प्रकल्पासाठी १.४ ट्रिलियन डॉलर खर्च केले आहेत. एका चायना पाकिस्तान इकोनॉमिक कोरीडोअरवर खर्च केलेली रक्कम ७० अब्ज डॉलर इतकी प्रचंड आहे.
हे ही वाचा:
प्रदूषणामुळे श्वास घेणे कठीण होत आहे?
उद्धव ठाकरेंशी केलेल्या युतीचा राज यांना सर्वात मोठा फटका
भारताची अर्थव्यवस्था पुन्हा वेगात
ड्रोन हल्ल्यांविरोधात भारताचे नवे संरक्षण कवच
चीन मोठी कर्ज देऊन देशांना कर्जाच्या सापळ्यात अडकवतो. चीनची ही सावकारी आहे. एखाद्या मजूराने सावकाराकडून चढ्या व्याजाने पैसे घेतले की काय होते? त्याला हे कर्ज फेडता येत नाही. अखेर आपली जमीन, दागिने, घर सावकाराला विकावे लागते. सावकाराचा डोळाही व्याजापेक्षा मजूराच्या जमिनीवर असतो. चीनचा डोळाही पीओकेच्या जमिनीवर आहे. जिथून हा सीपेक निघतो. पाकिस्तानने पाकव्याप्त काश्मीरचा एक भाग शक्सगम व्हॅली आधीच पाकिस्तानला बहाल केलेली आहे. या भागात १७३ हिमशिखरे आहेत. बर्फाच्या स्वरुपात साठलेले स्वच्छ पाणी. ज्याची भविष्यात चीनला प्रचंड गरज भासणार आहे. कारण चीनच्या बहुतेक नद्या आता प्रदूषित झालेल्या आहे. चीनचा ज्या सेमी कण्डक्टर चीपच्या उद्योगावर डोळा आहे, त्या चीपच्या निर्मिती प्रक्रीयेत तुम्हाला स्वच्छ पाण्याची गरज भासते. पाकिस्तानमुळे चीनच्या तोंडाला आधीच रक्त लागलेले आहे. आता कर्जाच्या मोबदल्यात तो पीओकेची अधिक भूमी ताब्यात घेणार आहे का?
सीपेकच्या संदर्भात चीनने पाकिस्ताना सज्जड दम दिलेला आहे. पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इशाक दार हे चीन भेटीवर असताना हा इशारा देण्यात आला. बीजीगमध्ये चीनी परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांसोबत झालेल्या चर्चेत चीनने पाकिस्तानचे कान व्यवस्थित पिळले आहेत. गळ्यात गळे घालण्याचा काळ, हनीमुनचा काळ आता संपत चालला आहे, ही बाब स्पष्ट करणारी ही घटना.
पाकिस्तानची पावले त्या दिशेने पडताना दिसत आहेत. सीपेकचा एक महत्वपूर्ण टप्पा असलेले ग्वादर बंदर, ग्वादर विमानतळ बलोचिस्तानमध्ये आहे. काराकोरम हायवे पाकव्याप्त काश्मीरमधून जातो. सीपेक खैबर पख्तुनख्वामधील हवेलियन, मासेहरा, ओबोटाबाद आणि डेरा इस्माईल खान येथून बलोचिस्तानच्या दिशेने सरकतो. डेरा इस्माईल खान-झोब हा सीपेकचा अत्यंत महत्वाचा टप्पा कारण इथून सीपेक बलोचिस्तानमध्ये प्रवेश करतो. पाकिस्तानचे हे दोन्ही भाग सध्या धगधगतायत. इथे पाकिस्तानी सैनिक रोज बळी पडतायत. अनेकदा सीपेक प्रकल्पावर काम करणारे मजूर, इंजिनिअर यांच्यावरही हल्ले होत असतात. ते रोखण्यासाठी पाकिस्तान लष्कराने पडलेली सुरक्षा पुरेशी ठरत नाही. कारण जिथे लष्करावरच हल्ले होत असतील तर लष्कर कोणाच्या सुरक्षेची हमी कशी देऊ शकते. बलोचिस्तान लिबरेशन आर्मी, तेहरीक ए तालिबान पाकिस्तान यांच्याशी इथे नियमितपणे चकमकी घडत असतात. अनेक ठिकाणी संघर्षाच्या काळात पाकिस्तानी लष्कराचे जवान पळ काढतात.
वारंवार पाकिस्तानला समज देऊन सीपेकवर काम करणाऱ्या चीन नागरीकांच्या सुरक्षेचा प्रश्न सुटलेला नाही. टीटीपी आणि बीएलओच्या बंडखोरांना रोखणे हा पाकिस्तानी लष्कराला न झेपणारा विषय आहे, हे चीनच्या लक्षात आले आहे. त्यामुळे इथे गेल्या दोन वर्षांपासून चीनने खासगी सुरक्षा रक्षक तैनात करायला सुरूवात केली. चीनी लष्कराची इथे तैनाती केली तर जगभरात बोंब होईल, अमेरिका आक्षेप घेईल म्हणून तुर्तास खासगी सुरक्षा रक्षक तैनात करण्यात येणार असे दाखवण्याचा चीन प्रयत्न करतो आहे. डेवे सेक्युरीटी फ्रण्टीअर ग्रुप, चायना ओव्हरसीज सेक्युरीटी ग्रुप, हॉक्झिन झोंगशान सेक्युरीटी अशी या सुरक्षा संस्थांची नावे आहेत. या संस्था खासगी असल्या तरी चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीशी संबंधित माजी अधिकारी या सुरक्षा संस्थांचे कर्ते धर्ते आहेत.
हे खासगी सुरक्षा रक्षकही फारसे उपयोगी नाही असे स्पष्ट होते आहे. जानेवारी २०२४ मध्ये बलोच लिबरेशन आर्मीने सीपेकच्या विरोधात दारा ए बोलन ही मोहीम सुरू केली. मार्च २०२५ पर्यंत अनेक छोटेमोठे हल्ले करून चीनी नागरीकांना लक्ष्य केले. मार्च २०२५ मध्ये बलोचिस्तानमधून जाणारी जफर एक्सप्रेस हायजॅक केली. ठिकठिकाणी चीनी नागरीकांना वेचून वेचून ठार कऱण्यात येत आहे. बुलेटप्रुफ आणि बॉम्बप्रुफ बसेस मधून फिरण्याची वेळ चीन्यांवर आलेली आहे.
मोठा गाजावाजा करत सुरू केलेले ग्वादर बंदर, ग्वादर विमानतळ चीनच्या अपयशाचे उदाहरण बनले आहे. ना इथे फारशी जहाजे फिरकत ना विमाने. ग्वादर सक्कर मार्गाचे कामही अपूर्ण आहे. एका बाजूला अब्जावधी डॉलर पाण्यात जाण्याची भीती आहे. दुसऱ्या बाजूला माणसं मरतायत. त्यात फिल्ड मार्शल आसिम मुनीर आणि पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी अमेरीकेशी चुंबाचुंबी करायला सुरूवात केलेली आहे. व्हाईट हाऊसमध्ये त्यांच्या जेवणावळी होत आहेत.
बलोचिस्तानमध्ये असलेले रेअर अर्थ, तांबे, सोने सगळे तुमचेच आहे, असे गाजर या दोघांनी अमेरीकीचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना दाखवले आहे. एक जमीन किंवा फ्लॅट अनेक जणांना विकून पैसा कमावणारे काही भुरटे असतात. पाकिस्तानची परिस्थितीही तशीच झालेली आहे. बलोचिस्तानची खनिजे दाखवून आधी चीनकडून माल उकळला आता अमेरिकेला तेच दाखवून पैसा काढण्याचा प्रयत्न हे दोघे करतायत.
चीन हा काही साधा सरळ देश नाही. टाकलेला पैसा वसूल करण्यासाठी चीन पाकिस्तान्यांच्या घशात हात घालू शकतो. मलाक्का सामुद्रधनीवर भारतीय नौदलाची असलेली हुकुमत चीनला नेहमीच खटकत आलेली आहे. मलाक्काची कोंडी करून भारत कधीही चीनी व्यापारी जहाजांना रोखू शकतो. युद्धाच्या काळात एवढी एक रणनीती चीनला गुढग्यावर आणू शकते. त्यातून मार्ग काढण्यासाठी सीपेकचा तोडगा काढण्यात आला. जेणे करून चीनच्या शिंझियान प्रांताशी आणि पाकिस्तानचे ग्वादर बंदर जोडले जाईल आणि चीनला अरबी समुद्रात थेट प्रवेश मिळेल, असा चीनचा होरा होता. सीपेक सध्या तरी पूर्ण अपयशी ठरलेला आहे. चायना म्यानमार इकोनॉमिक कोरीडोअरच्या माध्यमातून चीनला हिंदी महासागरात दाखल व्हायचे होते, तोही प्रयोग फसला.
पैसा गुंतवला परंतु हाती काहीच लागलेले नाही. येत्या काही काळात ते लागण्याची शक्यता नाही. कारण भविष्यात पाकिस्तान अस्तित्वात राहील की नाही, इथ पासून प्रश्न सुरू झालेले आहेत, त्यामुळे चीनने पुन्हा एकदा पाकिस्तानचे हात पिरगळायला सुरूवात केलेली आहे. काम पूर्ण करा, नाही तर पैसे नाही. अशी भूमिका घेतलेली आहे.
सीपेक पूर्ण होणार नाही. बीएलए, टीटीपीचे बंडखोर हे होऊ देणार नाहीत. त्यामुळे पुन्हा एकदा पाकिस्तान चीनच्या पदरात भूमीचे दान टाकणार का किंवा चीन पाकिस्तानची भूमी ताब्यात घेणार आहे का, असा सवाल आता निर्माण झाला आहे. पाकिस्तानने शक्सगम व्हॅली चीनचा पदरात टाकली. कारण स्पष्ट आहे, ही भूमी पाकिस्तानची नसून भारताची बळकावलेली भूमी आहे. चीनचा दबाव वाढला तर पीओकेचा आणखी एखादा तुकडा पाकिस्तान चीनच्या पदरात टाकू शकतो. त्यामुळे भारताचे ऑपरेशन पीओके येत्या काळात अधिक गुंतागुंतीचे होण्याची शक्यता आहे.
(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)
