अफगाणिस्तानातील इस्त्रायली फूटप्रिंट्सचे पाकिस्तानला भय

अफगाणिस्तानातील इस्त्रायली फूटप्रिंट्सचे पाकिस्तानला भय

अपेक्षेनुसार इस्त्रायलने इराणवर हल्ले सुरू केले आहेत. पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये युद्ध सुरू असताना दुसऱ्या बाजूला इराण-इस्त्रायल युद्धाला तोंड फुटले आहे. या हल्ल्याची तयारी इस्त्रायल बऱ्याच काळापासून करत होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी २६ फेब्रुवारी रोजी इस्त्रायल दौऱ्यावरून परतले. त्यानंतर एका दिवसाने हे हल्ले सुरू झाले. या घटनांमध्ये काही संबंध आहे का, ही बाब उघड झालेली नाही. इराण आणि पाकिस्तानचा सख्खा शेजारी असलेल्या अफगाणिस्तानमध्ये असलेले इस्त्रायलची उपस्थिती पाकिस्तानच्या चिंतेचे कारण बनली आहे.

अमेरिकेच्या डिपार्टमेंट ऑफ वॉरने इराण मोहिमेला ऑपरेशन एपिक फ्यूरी असे नाव दिले आहे तर इस्त्रायलने ऑपरेशन रोअरींग लायन. आज २८ फेब्रुवारी आहे. यापूर्वी इस्त्रायल आणि अमेरिकेने जून २०२५ मध्ये इराणच्या आण्विक आस्थापनांवर हल्ला केला होता. एखाद्या देशाच्या विरोधात जेव्हा लष्करी कारवाई करायची असते तेव्हा तुमच्याकडे त्या देशाची इत्यंभूत माहिती असणे गरजेचे असते. इराणवर गेल्या वर्षी जूनमध्ये इस्त्रायलने केलेला हल्ला अशाच प्रकारचा होता. ताजा हल्ला करतानाही इस्त्रायलने हातात ढीगभर माहिती ठेवली असणार याबाबत शंका असण्याचे काहीच कारण नाही.

भारताचे इराण आणि अफगाणिस्तानशी उत्तम संबंध आहेत. भारताची अफगाणिस्तानमध्ये भक्कम उपस्थिती आहे. इथे मोठ्या प्रमाणात भारत सरकारच्या वतीने मानवतावादी मदतकार्य चालते. अफगाणिस्तानमध्ये भारत आणि भारतीयांबाबत जे अनुकूल मत आहे, त्याचे श्रेय या मदतकार्यालाच जाते. इस्त्रायलबाबत तसे म्हणता येत नाही, अफगाणिस्तानमध्ये सत्ते कोणीही असो, कोणत्याही सरकारने इस्त्रायलला ना मान्यता दिली, ना दोन्ही देशांचे अधिकृतपणे संबंध आहेत. परंतु इस्त्रायलच्या एनजीओ मात्र अफगाणिस्तानमध्ये मदत कार्य करत असतात. इस्त्रा एड, शाई फंड आदी एनजीओ सक्रीय आहेत. आपत्ती व्यवस्थापन, संकट काळी अफगाणिस्तानच्या लोकांना बाहेर काढणे, त्यांना मानवतावादी सहायता मिळवून देणे आदी, काम या संस्था करत असतात. HIAS सारख्या जागतिक स्तरावर काम करणाऱ्या यहुदी धर्मीय संस्थांच्या भागीदारीतून केले जाते.

हे ही वाचा:

भारताची प्रतिक्रिया: शांतता राखा, संवादाचा मार्ग स्वीकारा!

श्रीलंका हरला; तरी पाकडे चालले घरला!

आंध्र प्रदेशातील काकीनाडा येथे फटाका कारखान्यात भीषण स्फोट

जो जिंकेल तोच टिकेल!

अफगाण इन्स्टिट्यूट फॉर स्ट्रॅटेजिक स्टडीजने (AISS) २०२३ मध्ये ‘इस्राएड’ आणि संबंधित स्वयंसेवी संस्थांच्या कार्याची दखल घेतली. तालिबानांनी अफगाणिस्तानचा ताबा घेतल्यानंतर अफगाण नागरिकांना बाहेर काढण्यात आणि त्यांचे पुनर्वसन करण्यात त्यांनी बजावलेल्या भूमिकेचे कौतुक केले आहे.

पाकिस्तानात मात्र या कामाकडे संशयाच्या नजरेने पाहीले जाते आहे. एक गोष्ट स्पष्ट आहे. जगभरातील कोणत्याही देशात मानवतावादाचा बुरखा पांघरून काम करणाऱ्या एनजीओचे अंतरंग कायम संशयास्पद राहीलेले आहेत. मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर भारतात गृहमंत्रायलाच्या रडारवर अनेक एनजीओ आल्या. अनेकांची नोंदणी रद्द करण्यात आली. अनेकांच्या मागे चौकशीचा फेरा लागला. यापैकी बऱ्याच एनजीओ विदेशी हस्तकासारख्या काम करीत होत्या. अमेरिकेने पोसलेल्या अनेक एनजीओ जगभरात पसरलेल्या आहेत, यापैकी बऱ्याच एनजीओचा थेट संबंध अमेरिकी गुप्तचर संस्था सीआयएशी आहे. इस्त्रायलच्या अफगाणिस्तानातील एनजीओबाबत पाकिस्तानला असाच संशय आहे. या एनजीओ इस्त्रायलचे सामरीक हित जपण्यासाठी काम करतात, असा ठाम समज झाल्यामुळे या एनजीओवर पाकिस्तानचे बारीक लक्ष असते.

अफगाणिस्तान हा पाकिस्तान आणि इराणचा शेजारी देश आहे. अफगाणिस्तानमध्ये बसून या दोन्ही देशांवर नजर ठेवणे सहज शक्य आहे. अमेरिकेने बगराम विमानतळासाठी अफगाणिस्तानच्या मागे लकडा लावला होता. त्याचे कारण हेच आहे. कारण इथून त्यांना इराण आणि चीनवर लक्ष ठेवणे सोयीचे होते. अफगाणिस्तानने या मागणीला वाटाण्याच्या अक्षता लावल्या ही बाब वेगळी. अमेरिकेची डाळ अफगाणिस्तानात शिजली नाही, परंतु इस्त्रायलच्या एनजीओ मात्र इथे सक्रीय राहील्या. कदाचित भारताची यात भूमिका असू शकेल. काही अमेरिकी एनजीओही इथे आहेत.

टाइम्स ऑफ इस्लामाबाद हे लोकप्रिय पाकिस्तानी ऑन लाईन पोर्टल आहे. याच्या संपादकीयात या अफगाणिस्तानातील एनजीओच्या मूळ हेतूबाबत शंका व्यक्त करण्यात आली आहे.
कारण या एनजीओ ज्या भागात काम करतायत ते तहरीक ए तालिबान पाकिस्तानचे बालेकिल्ले आहेत. या भागात मदत कार्य करण्याचा हेतू दुहेरी असू शकतो. मदतकार्याच्या नावाखाली संवेदनशील भागात प्रवेश मिळवणे आणि सामरीकदृष्ट्या महत्वाची माहिती गोळा करणे, हा या एनजीओंचा हेतू असू शकतो, असे या अग्रलेखात सूचित करण्यात आले आहेत.

पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि इराण या तिन्ही देशांचे इस्त्रायलशी अधिकृत संबंध नाहीत. इराणशी इस्त्रायलचे उघड शत्रूत्व आहे. पाकिस्तानशी पडद्या मागे काही प्रमाणात संवाद असला तरी या देशातील कडवट इस्लामी ओळख आणि विचारधारा आपल्या अस्तित्वाला घातक असल्याचे इस्त्रायल समजून आहे. परंतु अफगाणिस्तानबाबत असे नाही. अफगाणिस्तानही कट्टर इस्लामी देश असला तरी भारतासोबत अफगाणिस्तानचे उत्तम संबंध आहेत. अफगाणिस्तानात भारताचे बऱ्यापैकी बस्तान आहे. भारत आणि इस्त्रायलचे उत्तम संबंध असल्यामुळे भारताने अफगाणिस्तानमध्ये निर्माण केलेल्या जमीनीचा फायदा इस्त्रायला होत असावा असे मानायला वाव आहे.

अफगाणिस्तानवर पाकिस्तानने आक्रमण केले आहे. हवाई दल किंवा हवाई हल्ल्यापासून रक्षण करणारे सुरक्षा कवच नसल्यामुळे पाकिस्तान नेहमीच अफगाणिस्तानवर हवाई हल्ले करत असतो. ताज्या आक्रमणाची सुरूवातही हवाई हल्ल्यानेच झालेली आहे. या हल्ल्याचे कारण टीटीपीकडून पाकिस्तानी लष्करावर सातत्याने होणारे हल्ले. इस्त्रायली एनजीओंचे काम अफगाणिस्तानातील टीटीपीच्या त्याच बालेकिल्ल्यात आहे, हे पाहून पाकिस्तानी मीडियामध्ये अस्वस्थता आहे.
पाकिस्तानमधील बराच मीडिया हा आयएसआय नियंत्रित आहे. त्यामुळे टाइम्स ऑफ इस्लामाबादमध्ये आलेले संपादकीय लेखात पाकिस्ताननी गुप्तचर संस्था आयएसआय़चे इनपुट असण्याची शक्यता नाकारता येत नाही. या लेखात व्यक्त करण्यात आलेली शंका खरी असेल तर पाकिस्तानसाठी ते निश्चित धोकायदाक आहे.

सोशल मीडियावर इस्त्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा एक व्हीडीयो व्हायरल झाला होता. भारताचे पंतप्रधान मोदी यांनी अफगाणिस्तानला मदत कऱण्याची विनंती केली आहे. ही विनंती लक्षात घेऊन आम्ही अफगाणिस्तानला शक्य ती सर्व मदत देऊ असे नेतन्याहू यांचे वक्तव्य या व्हीडीयोमध्ये आहे.
हा व्हीडीयो प्रचंड व्हायरल झाल्यानंतर त्याची सत्यता तपासण्यात आली. तेव्हा हा व्हीडीयो फेक असल्याचे उघड झाले. हा व्हीडीयो फेक असला तरी भारताने अफगाणिस्तानला मदत देण्याची विनंती इस्त्रायला केली नसेल किंवा भारत युद्धजन्य अफगाणिस्तानला मदत पुरवत नसेल याची शक्यता कमीच आहे. कारण रशिया युक्रेन युद्धाच्या काळात जेव्हा रशियाकडे दारुगोळ्याचा खडखडात निर्माण झाला, तेव्हा भारताने रशियाला मदत पाठवली होती, ही बाब आता बऱ्यापैकी उघड झाले आहे. युद्धस्य कथा रम्या असे म्हणतात. यातल्या अनेक कथा कधीही बाहेर येत नाहीत, हे वास्तव आहे.

(न्यूज डंकाचे संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

Exit mobile version