देशातील तामिळनाडू, केरळ, आसाम, पश्चिम बंगाल ही चार राज्य आणि पुद्दचेरी या केंद्र शासित प्रदेशात निवडणुका. सगळ्यात कडवी झुंज प.बंगालमध्ये आहे. २०२१ च्या निवडणुकी दरम्यान आणि नंतर झालेला हिंसाचार लक्षात घेता, यंदा निवडणूक आयोग सजग आहे, असे दिसते. चुन चुन के हिसाब लिया जायेगा, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोलकात्यातील परेड ग्राऊंडवर झालेल्या महारॅलीमध्ये केली होती. त्यामुळे राज्यातील वातावरण तापलेले आहे. निवडणुकीपर्यंत भडका उडू नये म्हणून केंद्रीय सुरक्षा दलांची मोठ्या प्रमाणात राज्यात तैनाती करण्यात येत आहे.
२३ आणि २९ एप्रिल अशा दोन टप्प्यात राज्यात निवडणुका होणार आहेत. मतमोजणी ४ मे रोजी असेल, असे निवडणूक आय़ोगाने जाहीर केलेले आहे. निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर पहील्या फटक्यात राज्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. निवडणूक जाहीर होण्याआधी राज्यात केंद्रीय सुरक्षा दलाच्या ४८० कंपन्या तैनात करण्यात आल्या आहेत. निवडणुकीच्या काळात साधारण आणखी २००० हजार कंपन्या तैनात करण्यात येणार आहेत. स्वाभाविकपणे ममता बॅनर्जी प्रचंड नाराजी वाढणार आहे.
राज्यात राबवलेल्या स्पेशल इंटेन्सिव्ह रिविजनमध्ये सुमारे ६० लाख नावे संशयास्पद आहेत. त्यापैकी काही नावांची पडताळणी शिल्लक आहे. ही पडताळणी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने जिल्हा न्यायाधीशांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. पडताळणीचे काम पूर्ण झाले किंवा झाले नाही, तरी निवडणूक आता ठरल्यावेळी होणार हे स्पष्ट आहे. निवडणुकीच्या वेळापत्रकावर त्याचा परीणाम होणार नाही.
ममता बॅनर्जी यांनी तीन टर्म राज्याचे नेतृत्व केले आहे. त्यामुळे सरकारच्या कारभाराबाबत नाराजीचे वातावरण आहे. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर झाला आहे. राज्यातील रोजगार मोठ्या संख्येने बांगलादेशींनी बळकावले आहेत. ज्या हुकमी बांगलादेशी मतदारांच्या बळावर ममतांनी आजवर सत्ता राखली. त्यापैकी बरेच मतदार स्पेशल इंटेन्सिव्ह रिविजन या उपक्रमामुळे मतदार यादीतून वगळे जाणार आहेत. २०२१ च्या निवडणुकीत ममतांच्या तृणमूल काँग्रेसला ४७.९ टक्के तर भाजपाला ३८.१ टक्के मते होती. दोन्ही पक्षांच्या मतात ५९ लाखांचा फरक होता. घुसखोरांची हक्काची मते कमी झाल्यामुळे ममता अस्वस्थ आहेत. सरासरी प्रत्येक मतदार संघातून २० हजार नावे कमी होणार आहेत.
गेल्या निवडणुकीत पायाला प्लास्टर लावून ममतांनी प्रचार केला होता. सहानुभूती मिळेल अशा प्रकारच्या प्रचारात ममतांना विशेष कौशल्य प्रात्प आहे. यंदाच्या निवडणुकीत त्या असाच एखादा नवा अविष्कार करतील अशी शक्यता आहे.
प.बंगालमध्ये २०२१ मध्ये होणाऱ्या निवडणुकीच्या प्रचारासाठी २० डीसेंबर रोजी प्रचाराला आलेले गृहमंत्री अमित शहा यांनी जाहीरपणे आरोप केला होता की निवडणूक हिंसाचारात ३०० पेक्षा जास्त भाजपा कार्यकर्त्यांची हत्या करण्यात आली, परंतु तपास एक इंचही पुढे सरकला नाही. निवडणुकीच्या काळात सुरक्षा दलाच्या जवानांवर हल्ले झाले. तृणमूलच्या गुंडांनी भाजपा कार्यकर्त्यांच्या घरी घुसून महिलांवर बलात्कार केले. हिंसाचारामुळे आसाममध्ये परागंदा झालेले भाजपा कार्यकर्ते राज्यात परतले असले तरी ते तृणमूलच्या गुंडांना अंगावर घेण्याच्या मानसिकतेत असतील हे ठामपणे सांगता येणार नाही.
गेल्या वेळच्या अनुभवातून निवडणूक आय़ोगाला शहाणपण सुचलेले आहे. राज्याचे पोलिस महासंचालक, अतिरिक्त पोलिस महासंचालक, कोलकात्याचे पोलिस आयुक्त, राज्याच्या मुख्य सचिव, गृहसचिव या सगळ्या पदांवर असलेल्या अधिकाऱ्यांना नारळ देण्यात आला आहे. या अधिकाऱ्यांना निवडणुकीच्या प्रक्रीयेतून पूर्णपणे बाहेर ठेवण्यात आले आहे. नव्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. राज्यात शांततापूर्ण वातावरणात मुक्त निवडणुका संपन्न होतील असा विश्वास निवडणूक आय़ुक्त ग्यानेश कुमार यांनी व्यक्त केलेला आहे.
निवडणूक आय़ोगाच्या विरोधात ममता संसदेत भांडतायत. रस्त्यावर भांडतायत. ग्यानेश कुमार यांना हटवण्यासाठी तृणमूलच्या सदस्यांनी संसदेत नोटीस दिली आहे. विरोधी पक्षातील १९३ सदस्यांनी या प्रस्तावावर सही केलेली आहे. तृणमूलच्या सदस्यांनी राज्यसभेतून सभात्याग केला. ममता बँनर्जी यांनी मुख्य निवडणूक आय़ुक्तांना पत्र लिहून संताप व्यक्त केला. निवडणूक आयोगाचा निर्णय हा संघराज्य प्रणाली आणि लोकशाही प्रक्रीयेला धक्का असल्याचे मत व्यक्त केले. कोणतेही ठोस कारण नसताना, कोणताही हिंसाचार किंवा राज्य सरकारकडून कोणताही गैर प्रकार झाला नसताना निवडणूक आयोगाने एकतर्फी निर्णय घेत राज्यात घाऊक बदल्या केल्याचा आरोप ममता बॅनर्जी यांनी या पत्रात केला आहे. हे सगळे नरेटीव्ह निर्मितीसाठी ठीक आहे, परंतु खरी लढाई जनतेत जाऊन लढावी लागणार आहे, हे मोदी आणि ममता दोघांनाही ठाऊक आहे. तुर्तास मोदींनी त्यात आघाडी घेतलेली दिसली. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा संसदेत किल्ला लढवत असताना मोदी मात्र प.बंगालसह अन्य राज्यात प्रचार करत होते.
राज्यात निवडणूका घोषित होण्या आधीच राज्यातील राजकारणाचा पारा तापला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पोरिबर्तन यात्रा काढून राज्यात प्रचाराचा धुरळा उडवला. मालदा, सिंगूर आणि कोलकाता अशा फक्त तीन सभा घेतल्या. तिन्ही सभांमध्ये प्रचंड गर्दी उसळली.
कोलकात्याच्या ब्रिगेड परेड ग्राऊंडमध्ये यात्रेची सांगता झाली. दहा फूट उंच, ८० फूट रुंद असे भव्य व्यासपीठ उभारण्यात आले होते. व्यासपीठाच्या पार्श्वभूमीवर दक्षिणेश्वर कालीमंदीराचे चित्र होते. लाखोंच्या जनसुमदायासमोर नरेंद्र मोदी यांनी घोषणा केली. गुंडागर्दीचे दिवस संपत आले आहेत. प.बंगालमध्ये परिवर्तनाची लाट आहे. जगंलराज संपणार आहे. या मैदानाची क्षमता सुमारे ५ ते ६ लाख आहे. मैदान खच्चून भरले होते.
हे ही वाचा:
इफ्तार पार्टी करताना हाडे गंगा नदीत फेकणारे १४ जण ताब्यात
गुजरातमध्ये भारतीय जहाज ‘नंदा देवी’ सुरक्षित
अमेरिका–इराण संघर्षाचा तेल बाजारावर मोठा परिणाम
ममता बँनर्जी यांना मोदींच्या सभेचा ताप होणे स्वाभाविक होते. मोदींनी चुन चुन के हिसाब लिया जायेगा अशी घोषणा सभे दरम्यान केली. तो ममता बॅनर्जी यांना प्रचंड झोंबली. हे पंतप्रधानांना शोभणारे वक्तव्य नाही, या शब्दात त्यांनी आपली नापसंती व्यक्त केली. मोदींच्या वक्तव्यापेक्षा या रॅलीमध्ये उसळलेल्या जनसागरामुळे ममतांना जास्त त्रास झाला असण्याची शक्यता आहे.
देशात गॅसचा तुटवडा आहे, असा प्रचार विरोधी पक्षांनी सुरू केला आहे. इराण युद्धामुळे जगावर संकट आले आहे. भारतात त्याचे विरोधी पक्षांकडून राजकारण सुरू आहे. राहुल गांधी आणि ममता बॅनर्जी यूएईमध्ये नाहीत नाही तर विमानतळ बंद असल्यामुळे प्रवाशांना त्रास होतो आहे, अशी कारणे पुढे करून आंदोलन सुरू केले असते.
निवडणुकीत जिंकण्याची शक्यता कमी झाल्यामुळे गॅसमुळे आपल्या पक्षाला ऑक्सिजन मिळेल असा आशावाद तृणमूलचे नेते बाळगून आहेत. मोदी म्हणालेत की, जंगलराज संपेल परंतु ते संपवण्यासाठी प्राणांची बाजी लावणारे भाजपा कार्यकर्ते निवडणुकीतील यश पाहण्यासाठी जिवंत राहतील याची काळजी केंद्र सरकारने घेणे गरजेचे आहे.
तिकीट वाटप करताना पक्षाने नव्याने दाखल होणाऱ्या हवशा गवशांना, धनिकांना तिकीट देण्याचे टाळून रस्त्यावर उतरून संघर्ष करणाऱ्या कार्यकर्त्यांना भाजपाने प्राधान्य दिले आहे. संघर्ष करताना कार्यकर्तेच लागतात. एकदा सत्ता मजबूत झाली की मग कार्यकर्त्यांची गरज वाटेनाशी होते. तेव्हा मर्जीतल्या लोकांना तिकीटे वाटली तरी चालतात. सध्या प.बंगालमध्ये भाजपाला ही चैन परवडणारी नाही.
लोकांच्या घरी धुणीभांडी करणाऱ्या कालिता माझी या अत्यंत गरीब महिलेला भाजपाने औसग्राम मतदार संघातून निवडणुकीच्या मैदानात उतरवले आहे. भारत सेवाश्रम संघाशी संबंधित उत्पल महाराज या संन्याशाला कलियागंजमधून उमेदवारी देण्यात आली आहे. मंगलानंद पुरी हे आणखी एक संन्यासी उलूबेरीया दक्षिण मधून लढतायत. मैना मूर्मु या आदीवासी तरुणीला मनबाजार मधून उमेदवारी मिळाली आहे. सुवेंदु अधिकारी नंदीग्राममधून पुन्हा लढणार आहेत. भाजपाने २९४ पैकी १४४ उमेदवारांची पहीली यादी जाहीर केली आहे. प्रत्येक निवडणूक भाजपा नेते अत्यंत गंभीरपणे लढवतात. प.बंगालमध्ये ते जरा अधिकच गंभीर दिसत आहेत. उमेदवारांच्या पहील्या यादीतून ही झलक स्पष्ट दिसते आहे. प.बंगाल हे असे राज्य आहे, जिथल्या जय पराजयाचा थेट संबंध राष्ट्रीय सुरक्षेशी आहे.
(न्यूज डंकाचे संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)
