पाकिस्तानात मान्सूनच्या पावसात १९ जणांचा मृत्यू, पुराचा धोका वाढला

पाकिस्तानात मान्सूनच्या पावसात १९ जणांचा मृत्यू, पुराचा धोका वाढला

पाकिस्तानात पहिल्या मान्सूनच्या पावसात १९ जणांचा मृत्यू झाला. बलुचिस्तान, खैबर पख्तूनख्वा, इस्लामाबाद आणि रावळपिंडीमध्ये ही जीवितहानी झाली आहे. दरम्यान, राष्ट्रीय आपत्कालीन ऑपरेशन्स सेंटरने आज आणि उद्या देशाच्या विविध भागात मुसळधार पाऊस आणि पुराचा अंदाज जारी केला आहे.

डॉन वृत्तपत्राच्या वृत्तानुसार, राष्ट्रीय आपत्कालीन ऑपरेशन्स सेंटरने १० जुलैपर्यंत मध्यम ते मुसळधार मान्सून पाऊस आणि जवळजवळ सर्व नद्यांमध्ये पूर येण्याचा अंदाज जारी केला आहे. पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (एनडीएमए) आणि इतर अधिकाऱ्यांना संभाव्य आपत्कालीन परिस्थिती, विशेषतः पुराचा सामना करण्यासाठी उच्च सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत.

प्रांतीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (पीडीएमए) ने सांगितले की, गेल्या ४८ तासांत बलुचिस्तानमध्ये मान्सूनच्या पावसामुळे किमान सात जणांचा मृत्यू झाला आहे आणि अनेक जण जखमी झाले आहेत. बलुचिस्तानमधील सुमारे २२ जिल्हे पावसाने बाधित झाले आहेत. याशिवाय, २२ घरांचे नुकसान झाले आहे आणि पाच घरे उद्ध्वस्त झाली आहेत.

पीडीएमए अधिकाऱ्यांनी सांगितले की, इराणच्या सीमेला लागून असलेल्या वाशुक जिल्ह्याला सर्वाधिक फटका बसला आहे, जिथे उभी पिके वाहून गेली आहेत आणि मोठ्या संख्येने लोक बेघर झाले आहेत. पोलिस आणि आपत्कालीन सेवांनी सांगितले की, रावळपिंडी आणि इस्लामाबादच्या वेगवेगळ्या भागात पावसाशी संबंधित घटनांमध्ये तीन मुलांसह किमान सहा जण बुडाले आहेत. खैबर पख्तूनख्वामधील मलाकंद, बुनेर, मानसेहरा आणि करक जिल्ह्यात सहा जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.

पंतप्रधान शाहबाज यांनी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, बचाव संस्था आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांना कोणत्याही संभाव्य आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी उच्च सतर्क राहण्याचे निर्देश दिले. तरबेला धरणाच्या स्पिल-वेच्या ऑपरेशनमुळे सिंधू नदीकाठच्या खालच्या जिल्ह्यांमध्ये पूर येऊन परिस्थिती आणखी बिकट होऊ शकते, अशी चिंता त्यांनी व्यक्त केली. अधिकाऱ्यांच्या मते, काबूल, सिंधू, झेलम आणि चिनाबसह सर्व प्रमुख नद्यांमध्ये पाण्याचा प्रवाह वेगाने वाढण्याची अपेक्षा आहे. स्वात आणि पंजकोरा नद्यांव्यतिरिक्त, इतर उपनद्या कधीही भयानक रूप धारण करू शकतात.

Exit mobile version