अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मध्यस्थीने रशिया- युक्रेन युद्ध थांबवण्यासाठी प्रयत्न सुरू असतानाच रशियामध्ये एक मोठी घटना घडली आहे. युक्रेनने रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या नोव्हगोरोड येथील शासकीय निवासस्थानावर तब्बल ९१ लांब पल्ल्याच्या ड्रोननी हल्ला केल्याचा दावा रशियन परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह यांनी केला आहे. यावरून डोनाल्ड ट्रम्प यांनी या कृत्याबाबत संताप व्यक्त केला आहे.
डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, “स्वतः राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा मला फोन आला होता. त्यांनी सांगितले की त्यांच्या घरावर हल्ला झाला आहे. हे अजिबात चांगले नाही. युद्धाच्या मैदानात लढणे एक गोष्ट आहे, पण थेट राष्ट्राध्यक्षांच्या घरावर हल्ला करणे ही वेगळी गोष्ट आहे. मी या घटनेमुळे खूप संतापलो आहे.” ट्रम्प यांनी पुढे असेही स्पष्ट केले की, ही वेळ अशा प्रकारच्या हल्ल्यांची नाही, कारण आपण शांतता कराराच्या अगदी जवळ आहोत.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी सांगितले की, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी त्यांना सांगितले की युक्रेनियन ड्रोनने त्यांच्या एका निवासस्थानाला लक्ष्य केले आहे. तथापि, कीव्हने हा दावा फेटाळून लावला. रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह यांनी २८ आणि २९ डिसेंबर रोजी रात्री उशिरा मॉस्कोच्या पश्चिमेकडील नोव्हगोरोड प्रदेशातील पुतिन यांच्या निवासस्थानी लांब पल्ल्याच्या ड्रोनच्या गटाने हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला. या हल्ल्यात ९१ ड्रोन सोडण्यात आले होते परंतु ते सर्व रशियन हवाई संरक्षण दलांनी रोखले.
हे ही वाचा:
गुणवत्ता तपासणीसाठी १०८ लॅब्सना मंजुरी
आयबीसीमध्ये सुधारणा केल्याने कर्ज वसुलीत आराम
उन्नाव बलात्कार प्रकरण: सुप्रीम कोर्टच्या निर्णयामुळे पीडिता समाधानी
दिल्लीत मंत्री आशीष सूद यांनी स्वच्छता व्यवस्थेची केली पाहणी
युक्रेनने लगेचच हा दावा फेटाळून लावला. रशियन फेडरेशनकडून खोटेपणाचा आणखी एक टप्पा, असे युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी पत्रकारांना सांगितले. तसेच या ड्रोन हल्ल्याची पुष्टी झाल्यास, संघर्ष संपवण्यासाठी राजनैतिक प्रयत्न कमकुवत असताना रशिया आणि युक्रेनमधील तणावात आणखी वाढ होईल.
