अमेरिकेत अमेरिकन सिनेट मध्ये झालेल्या एका सुनावणीत “पुरुष गरोदर होऊ शकतात का?” या प्रश्नावरून मोठा वाद निर्माण झाला. ही सुनावणी गर्भपातासाठी वापरल्या जाणाऱ्या औषधांच्या (अबॉर्शन पिल्स) सुरक्षिततेबाबत आयोजित करण्यात आली होती. यावेळी रिपब्लिकन पक्षाचे सिनेटर जोश हॉली यांनी तज्ज्ञ डॉक्टर डॉ. निशा वर्मा यांना थेट हा प्रश्न विचारला.
डॉ. निशा वर्मा या भारतीय वंशाच्या प्रसूती व स्त्रीरोग तज्ज्ञ असून त्या प्रजनन आरोग्याच्या क्षेत्रात कार्यरत आहेत. सिनेटर जोश हॉली यांनी हा प्रश्न वारंवार विचारत “जैविक वास्तव काय आहे?” हे स्पष्ट करण्याची मागणी केली. मात्र डॉ. वर्मा यांनी “हो” किंवा “नाही” असे थेट उत्तर देणे टाळले. त्यांनी सांगितले की त्या वेगवेगळ्या लिंग ओळख असलेल्या रुग्णांची काळजी घेतात आणि या प्रश्नाला राजकीय स्वरूप दिले जात असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
हे ही वाचा :
सोन्याचे दर पुन्हा वाढले
नवी मुंबईतील मतदान केंद्रावर कोब्रा सापाची एंट्री
नामदेव ढसाळ यांच्या पत्नीची काळजी घेतंय फडणवीस सरकार
‘शाई पुसण्याचा हेतू गुन्हेगारीचा’
डॉ. वर्मा यांच्या उत्तरामुळे सुनावणीत वातावरण तापले. यावर प्रतिक्रिया देताना सिनेटर हॉली यांनी “विज्ञानानुसार फक्त स्त्रिया गरोदर राहू शकतात” असे ठाम मत मांडले. त्यांच्या मते, अशा प्रश्नांवर स्पष्ट उत्तर न दिल्यास सामान्य लोकांमध्ये संभ्रम निर्माण होऊ शकतो.
या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून यावर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. काहींनी हा प्रश्न अयोग्य असल्याचे म्हटले, तर काहींनी हा वाद जैविक वास्तव, लिंग ओळख आणि प्रजनन आरोग्य धोरणांमधील संघर्ष अधोरेखित करणारा असल्याचे मत व्यक्त केले आहे.
