अफगाणिस्तानच्या राजधानी काबूलच्या मध्यवर्ती भागातील शहर-ए-नव भागात आज संध्याकाळच्या सुमारास एका हॉटेलजवळ स्फोट झाल्यामुळे आतापर्यंत ७ जणांचा मृत्यू झाला आहे आणि अनेक नागरिक जखमी झाले आहेत, असे तालिबानच्या गृह मंत्रालयाने सांगितले आहे. स्फोटाची भीषणता पहाता मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
तालिबानच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा स्फोट इतका जोरदार होता की आवाज शहरभर ऐकू आला आणि आसपासच्या इमारतींच्या काचाही तुटल्या. घटनास्थळी धूराचे लोट पसरले आणि रस्त्यावर लोकांमध्ये घबराट निर्माण झाली. सुरक्षा दल आणि आपत्कालीन वैद्यकीय सेवा त्वरित घटनास्थळी दाखल झाल्या आहेत आणि जखमींना नजीकच्या रुग्णालयात दाखल केले आहे.
हे ही वाचा:
नितीन नबीन बिनविरोध भाजप अध्यक्ष
IMF कडून भारतासाठी दिलासादायक अंदाज
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडे उंबरगाव-तलासरीच्या चार पदरी रस्त्याची मागणी
तालिबानच्या अधिकाऱ्यांनी सध्याच्या आकडेवारीनुसार किमान ७ जण मरण पावले आहेत, परंतु अधिकृत खात्यांद्वारे मृतांची आणि जखमींची अंतिम संख्या अद्याप जाहीर केली नाही.
ही घटना शहरातील तुलनेने सुरक्षित आणि व्यापारी भागात घडली आहे, जेथे अनेक परदेशी नागरिक आणि स्थानिक लोक दररोज फिरतात. यामुळे या स्फोटामुळे पुन्हा एकदा सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे.
आता पर्यंत कोणत्याही दहृशतवादी संघटनेने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही. सुरक्षा दल आणि गृह मंत्रालय सध्या स्फोटाचे कारण शोधत आहेत आणि तपास चालू ठेवला आहे.
