नववर्षाच्या पूर्वसंध्येला स्वित्झर्लंडमधील एका आलिशान बारमध्ये झालेल्या स्फोटानंतर भीषण आग लागली असून या दुर्घटनेत डझनावारी लोकांचा मृत्यू झाला आहे आणि सुमारे १०० जण जखमी झाले आहेत. स्विस अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की ही घटना दहशतवादी हल्ला नसून आग लागण्याची दुर्घटना म्हणून पाहिली जात आहे.
ही घटना स्वित्झर्लंडमधील प्रसिद्ध स्की रिसॉर्ट शहर क्रान्स-लमोंटाना येथील ‘ले कॉन्स्टेलेशन बार अँड लाऊंज’ येथे घडली. स्फोटाच्या वेळी बारमध्ये १५० हून अधिक लोक उपस्थित होते. विशेष म्हणजे, असामान्य दुष्काळी परिस्थितीमुळे स्वित्झर्लंड सध्या जंगलातील आगींच्या समस्येला सामोरे जात असतानाच ही घटना घडली आहे.
स्विस माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, हा स्फोट कदाचित कॉन्सर्टदरम्यान फटाक्यांमुळे झाला असावा, मात्र पोलिसांनी स्फोटाचे नेमके कारण अद्याप अज्ञात असल्याचे सांगितले आहे.
हे ही वाचा:
डिजिटल पेमेंटमध्ये भारताची मोठी झेप
केकेआरच्या मुस्तफिजूर निवडीवर वाद
चालत्या कारमध्ये आग, एका वर्षाच्या बाळाचा मृत्यू
शेअर बाजारात नववर्षची सुरुवात उत्तम
हा स्फोट बारच्या तळघरात (बेसमेंटमध्ये) झाला. एका डॉक्टरांनी सांगितले की, क्रान्स-मोंटानामधील रुग्णालयांवर भाजलेल्या जखमी रुग्णांचा मोठा ताण आला आहे.
सोशल मीडियावर फिरत असलेल्या व्हिडिओंमध्ये स्फोटानंतर बारमधून दाट धुराचे लोळ बाहेर येताना दिसत आहेत. पोलिसांचे प्रवक्ते गाएतान लाथिऑन यांनी एएफपी वृत्तसंस्थेला सांगितले, अज्ञात कारणामुळे स्फोट झाला आहे. अनेक जण जखमी झाले असून काही जणांचा मृत्यू झाला आहे.”
पोलिसांनी या घटनेने प्रभावित झालेल्या कुटुंबीयांसाठी हेल्पलाईन सुरू केली आहे. तसेच क्रान्स-मोंटाना परिसरात नो-फ्लाय झोन जाहीर करण्यात आला आहे.
स्विस आल्प्सच्या निसर्गरम्य भागात वसलेले क्रान्स-मोंटाना हे जगभरातील पर्यटकांचे आवडते ठिकाण असून येथे स्कीइंग, स्नोबोर्डिंग आणि गोल्फसारख्या उपक्रमांसाठी मोठ्या संख्येने पर्यटक येतात. हे रिसॉर्ट स्वित्झर्लंडची राजधानी बर्नपासून सुमारे दोन तासांच्या अंतरावर आहे.
या घटनेच्या काही महिन्यांपूर्वीच जिनेव्हा शहरातील स्वित्झर्लंडच्या सर्वात जुन्या आलिशान हॉटेलमध्ये आग लागली होती. १८३४ साली सुरू झालेले आणि ऐतिहासिक वारसा मानले जाणारे फोर सीझन्स हॉटेल दे बर्ग येथे लागलेल्या आगीतही अनेक जण जखमी झाले होते.
दरवर्षी स्वित्झर्लंडला, विशेषतः उष्ण व कोरड्या कालावधीत, जंगलातील आगींचा धोका भेडसावत असतो. आकडेवारीनुसार, २००१ ते २०२४ या कालावधीत स्वित्झर्लंडने आगीमुळे ३ टक्क्यांहून अधिक वनक्षेत्र गमावले आहे.
