बांगलादेशमध्ये वारंवार हिंदूंना लक्ष्य करण्यात येत असून त्यांची हत्या करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर बांगलादेशात आणखी एका हिंदू व्यक्तीची हत्या करण्यात आली आहे. यामुळे खळबळ उडाली असून गेल्या १८ दिवसांत हिंदू समुदायाच्या व्यक्तीवर झालेला हा सहावा प्राणघातक हल्ला आहे.
सोमवारी रात्री नरसिंगडी जिल्ह्यातील चारसिंदूर बाजारात किराणा व्यापारी मणी चक्रवर्ती यांची हत्या करण्यात आली. माहितीनुसार, पलाश उपजिल्ह्यातील वर्दळ असलेल्या बाजारात दुकान चालवत असताना अज्ञात हल्लेखोरांनी चक्रवर्ती यांच्यावर हल्ला केला. त्यांना गंभीर दुखापत झाली. यानंतर स्थानिकांनी तातडीने त्यांना रुग्णालयात नेले, परंतु काही वेळातच त्यांचा मृत्यू झाला.
मणी चक्रवर्ती हे शिबपूर उपजिल्ह्यातील सदरचर युनियनचे रहिवासी होते. चारसिंदूर बाजारातील व्यापाऱ्यांनी त्यांच्या हत्येनंतर सांगितले की, मणी हे एक शांत आणि प्रसिद्ध व्यापारी होते शिवाय त्यांचे कोणासोबतही वाद नव्हते. सार्वजनिक ठिकाण असलेल्या अशा बाजारात त्यांच्या हत्येमुळे अल्पसंख्याकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. अनेकांनी आपली दैनंदिन कामे करण्यास असुरक्षित वाटत असल्याचे मत व्यक्त केले आहे. वारंवार होणाऱ्या हल्ल्यांमुळे असुरक्षितता निर्माण होत असल्याचा इशारा देत, जबाबदार असलेल्यांना तात्काळ अटक करून कठोर शिक्षा करण्याची मागणी हिंदू समुदायाने केली आहे.
याआधी सोमवारी संध्याकाळी जशोर जिल्ह्यात आणखी एका हिंदूची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. मणिरामपूर उपजिल्हामधील प्रभाग क्रमांक १७ मधील कोपलिया बाजार येथे सायंकाळी ५.४५ च्या सुमारास (स्थानिक वेळेनुसार) ही घटना घडली. पीडित राणा प्रताप (४५) हा तुषार कांती बैरागी यांचा मुलगा आणि केशबपूर उपजिल्हामधील अरुआ गावचा रहिवासी होता. प्रत्यक्षदर्शी आणि पोलिसांनी सांगितले की, राणा प्रताप बाजारात असताना अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला, ज्यामुळे त्यांना अनेक गोळ्या लागल्या. त्यांचा जागीच मृत्यू झाला.
हे ही वाचा..
अंगारकी चतुर्थी: महत्त्व, पूजा विधी आणि धार्मिक मान्यता जाणून घ्या
दिवसाची योग्य सुरुवात करण्यासाठी सकाळी काय खावे आणि काय टाळावे?
भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या मालमत्ता जप्तीची प्रक्रिया वेगात
उधमपूरमध्ये मोटरसायकल रॅलीचे आयोजन
या दोन्ही हत्यांमुळे हिंदू समुदायाच्या सदस्यांशी संबंधित अलिकडच्या हिंसक घटनांमध्ये भर पडली आहे. अलिकडच्या आठवड्यात, जमावाच्या हिंसाचारात कापड कारखान्यातील हिंदू कामगार दीपू चंद्र दास यांची हत्या करण्यात आली, तर अमृत मोंडल यांचीही हत्या झाली. त्यानंतर मयमनसिंग जिल्ह्यात, बजेंद्र बिस्वास यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. ३१ डिसेंबर रोजी, शरीयतपूर जिल्ह्यातील केउरभंगा बाजाराजवळ एका जमावाने हिंदू व्यापारी खोकन चंद्र दास यांना चाकूने वार करून जाळून टाकले. नंतर ढाका येथील राष्ट्रीय बर्न इन्स्टिट्यूटमध्ये उपचारादरम्यान भाजलेल्या जखमांमुळे त्यांचा मृत्यू झाला.
