विद्यार्थी नेते उस्मान हादीच्या हत्येतील मुख्य संशयिताचे ठिकाण नामांकित बांगलादेशी पत्रकाराने जाहीर केल्यानंतर काही तासांतच, त्या आरोपीने परदेशातून एक व्हिडिओ संदेश जारी करत या हत्येत आपला कोणताही सहभाग नसल्याचे म्हटले असून, एका राजकीय संघटनेवर आरोप केले आहेत. या दाव्यामुळे संशयित भारतात पळाल्याचा आरोप खोटा ठरला आहे.
बांगलादेश पोलिसांनी उस्मान हादीच्या गोळीबार प्रकरणातील प्रमुख संशयित म्हणून जाहीर केलेला फैसल करीम मसूद याने सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत आपण सध्या दुबईत असल्याचे सांगितले. या हत्येशी आपला काहीही संबंध नसल्याचा दावा करत त्यांनी जमात-शिबिर या संघटनेवर जबाबदारी ढकलली. तसेच हादी यांच्याशी आपले संबंध केवळ व्यावसायिक होते, असे त्यांनी स्पष्ट केले.
व्हिडिओ संदेशात मसूद म्हणतो, मी हादीची हत्या केलेली नाही. माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर खोटे आरोप लावले जात आहेत. स्वतःचे संरक्षण करण्यासाठी मी दुबईत आलो आहे. हादी हे जमातची निर्मिती होती. जमाती लोक यामागे असू शकतात.”
तो पुढे म्हणाला की, ते एका आयटी कंपनीचे मालक असून व्यावसायिक कारणांसाठीच त्याची हादीशी भेट झाली होती. सरकारी कंत्राटांच्या आश्वासनांच्या बदल्यात त्याने राजकीय देणग्या दिल्याचाही दावा त्यांनी केला.
यापूर्वी बांगलादेश पोलिसांनी असा आरोप केला होता की १२ डिसेंबर रोजी झालेल्या हल्ल्यानंतर मसूद आणि दुसरा संशयित आलमगीर शेख हे देशाबाहेर पळून गेले आणि हालुआघाट सीमेवरून भारतात प्रवेश करून नंतर इतर ठिकाणी गेले असावेत.
मात्र हे दावे भारतीय सुरक्षा यंत्रणांनी फेटाळले आहेत. सीमा सुरक्षा दल (BSF) आणि मेघालय पोलिसांनी अशा कोणत्याही सीमापार हालचालींचे पुरावे नसल्याचे स्पष्ट केले आहे.
हे ही वाचा:
मतदानापूर्वी भाजपचा पहिला विजय
भारत ठरला जगातील चौथी अर्थव्यवस्था
WPL २०२६ साठी मुंबई इंडियन्स सज्ज!
उस्मान हादीला १२ डिसेंबर रोजी ढाका येथील पल्टन परिसरात, प्रचारादरम्यान दिवसाढवळ्या गोळ्या घालण्यात आल्या होत्या. गंभीर जखमी अवस्थेत त्याला सिंगापूरला नेण्यात आले, जिथे १८ डिसेंबर रोजी त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर संपूर्ण बांगलादेशात असंतोष पसरला आणि मोठ्या प्रमाणावर आंदोलन झाले.
ढाका पोलीस या प्रकरणाचा गांभीर्याने तपास करत असून हत्येशी आणि आरोपीच्या पलायनाशी संबंधित अनेक जणांना अटक करण्यात आली आहे. मसूदला पळून जाण्यास मदत केल्याच्या आरोपाखाली दोन जणांना पोलीस कोठडीत ठेवण्यात आले असून, लवकरच आरोपपत्र दाखल होण्याची शक्यता आहे.
