भारतीय वायुसेना आणि अमेरिकन वायुसेना यांच्यात अत्यंत महत्त्वपूर्ण असा द्विपक्षीय वायुसेना युद्धाभ्यास सुरू आहे. या संयुक्त सरावाचा उद्देश दोन्ही देशांच्या वायुसेनांमधील परस्पर समज, सामरिक सहकार्य आणि एकत्रित कार्यक्षमतेत वाढ करणे हा आहे. गुरुवार, १३ नोव्हेंबर हा या सरावाचा अंतिम दिवस आहे. विशेष म्हणजे या युद्धाभ्यासात अमेरिकन वायुसेनेने आपल्या अत्याधुनिक बी-1बी लांसर सुपरसॉनिक बॉम्बर विमानासह सहभाग नोंदवला आहे. बी-१ बी लांसर हे आपली दीर्घ पल्ल्याची प्रहार क्षमता आणि अचूक लक्ष्यभेदी तंत्रज्ञानासाठी प्रसिद्ध आहे.
भारतीय वायुसेनेच्या ताफ्यातून या सरावात विविध अत्याधुनिक लढाऊ विमाने, वाहतूक विमाने आणि वायुरक्षा प्रणाली सहभागी झाल्या आहेत. सरावादरम्यान दोन्ही देशांच्या वायुसेनांनी मिळून अनेक जटिल युद्धपरिस्थितींवर काम केले आहे. यात वायुरक्षा ऑपरेशन, स्ट्राइक मिशन, इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर, हवाई इंधन भरणे आणि संयुक्त मिशन नियोजन यांचा समावेश आहे. या सरावादरम्यान दोन्ही देशांच्या वैमानिकांनी आणि तांत्रिक पथकांनी एकमेकांच्या रणनीती, तंत्रज्ञान व कार्यपद्धतींबाबत मौल्यवान अनुभवांची देवाणघेवाण केली. या सरावाचा मुख्य हेतू म्हणजे भविष्यातील बहुराष्ट्रीय मोहिमांमध्ये अधिक चांगला समन्वय प्रस्थापित करणे आणि बदलत्या सुरक्षा परिस्थितीत संयुक्त प्रतिसादक्षमता मजबूत करणे हा आहे.
हेही वाचा..
“पाकिस्तान दोन आघाड्यांवर युद्धासाठी तयार” संरक्षणमंत्री ख्वाजा असे का म्हणाले?
दिल्ली बॉम्बस्फोट: आरोपी डॉ. उमर, डॉ. मुझम्मिलच्या डायरी जप्त; काय सापडले डायरीत?
इस्लामाबाद स्फोटानंतर श्रीलंकन खेळाडूंना पाकिस्तानातचं राहण्याचे आदेश
अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मोठा ४३ दिवसांचा शटडाऊन संपला!
भारतीय वायुसेनेनुसार, भारत–अमेरिका संयुक्त वायुसेना सराव १० नोव्हेंबरपासून सुरू झाला असून 13 नोव्हेंबरला त्याची सांगता होत आहे. रक्षा तज्ज्ञांच्या मते, हा सराव दोन्ही देशांमधील सामरिक भागीदारी आणखी मजबूत करेल आणि हिंद-प्रशांत प्रदेशातील स्थैर्य व सुरक्षा सुनिश्चित करण्यास महत्त्वपूर्ण ठरेल. या सरावादरम्यान दोन्ही देशांच्या वायुसेनांच्या शूर वैमानिकांनी एकमेकांच्या व्यावसायिक कौशल्याची आणि सामरिक विचारसरणीची जवळून ओळख घेतली.
रक्षा विश्लेषकांचे म्हणणे आहे की अशा प्रकारचे संयुक्त सराव दोन्ही देशांतील संरक्षण सहकार्याचे नवे आयाम उघडतात. दोन्ही देशांनी एकत्रितपणे हा निर्धार व्यक्त केला आहे की भारत आणि अमेरिका यांच्यातील संरक्षण भागीदारी भविष्यात अधिक दृढ होईल आणि सामायिक सुरक्षा हितांच्या रक्षणासाठी सातत्याने सहकार्य सुरू राहील. लक्षात घेण्यासारखे म्हणजे, ज्या वेळी दोन्ही देशांच्या वायुसेना हा संयुक्त सराव करत आहेत, त्याच काळात भारतीय नौदलप्रमुख ॲडमिरल दिनेश के. त्रिपाठी हे अमेरिकेच्या महत्त्वपूर्ण अधिकृत दौर्यावर आहेत. त्यांचा हा दौरा बुधवार, १२ नोव्हेंबरपासून सुरू झाला आहे.
भारतीय नौदलानुसार, ॲडमिरल त्रिपाठी यांच्या या भेटीचा उद्देश भारतीय आणि अमेरिकन नौदलांमधील आधीच मजबूत असलेल्या सागरी भागीदारीला आणखी बळकट करणे हा आहे. भारतीय आणि अमेरिकन नौदलांतील ही सखोल नाती, भारत–अमेरिका संरक्षण सहकार्याचा एक महत्त्वपूर्ण स्तंभ मानली जातात. भारतीय नौदलप्रमुख १७ नोव्हेंबरपर्यंत अमेरिकेच्या अधिकृत दौर्यावर राहतील. या कालावधीत ते अमेरिकेच्या संरक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बैठक व चर्चा करतील. तसेच अन्य उच्चपदस्थ नौदल अधिकारी आणि मान्यवर व्यक्तींसोबतही विचारविनिमय होणार आहे.
