इराणच्या राष्ट्राध्यक्षांचे अमेरिकन नागरिकांना पत्र; काय म्हटले पत्रात?

इराणचे अध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांचे पत्रातून अनेक सवाल

इराणच्या राष्ट्राध्यक्षांचे अमेरिकन नागरिकांना पत्र; काय म्हटले पत्रात?

अमेरिका- इस्रायल विरुद्ध इराण असा संघर्ष शिगेला पोहचलेला असताना इराणचे अध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनी अमेरिकन लोकांसाठी एक खुले पत्र लिहिले आहे. अमेरिकी जनतेला उद्देशून लिहिलेल्या एका खुल्या पत्रात, पेझेश्कियन यांनी असा प्रश्न उपस्थित केला की, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे “अमेरिका फर्स्ट” धोरण “आज अमेरिकी सरकारच्या प्राधान्यक्रमांपैकी खरोखरच एक आहे का”. तसेच अमेरिकेतील लोकांना “विकृतीकरण आणि बनावट कथांच्या महापुराच्या” पलीकडे पाहण्याचे आणि इराणविरुद्धच्या अमेरिका-इस्रायल युद्धामुळे कोणाचे हित साधले जात आहे, हे विचारण्याचे आवाहन केले आहे.

“या युद्धामुळे अमेरिकन जनतेच्या नेमक्या कोणत्या हितांची खऱ्या अर्थाने पूर्तता होत आहे?” असे त्यांनी विचारले आहे. निष्पाप मुलांची कत्तल, कर्करोगावर उपचार करणाऱ्या औषधनिर्माण सुविधांचा विध्वंस, किंवा एखाद्या देशाला ‘पाषाणयुगात परत नेल्याबद्दल’ बढाई मारणे, यांमुळे अमेरिकेची जागतिक प्रतिष्ठा आणखी खराब करण्याव्यतिरिक्त दुसरा कोणता उद्देश साध्य होतो का? असा सवाल मसूद पेझेश्कियान यांनी उपस्थित केला आहे.

पेझेश्कियन यांनी तेहरानला धोका म्हणून चित्रित करणे देखील फेटाळून लावले आणि नमूद केले की, जेव्हा इराणचे वाटाघाटीकार बहुपक्षीय अणुचर्चांमध्ये भाग घेत होते, तेव्हा इराणवर दोनदा हल्ला झाला होता– एकदा जून २०२५ मध्ये जेव्हा इस्रायलने १२ दिवसांचे युद्ध सुरू केले, ज्यात अमेरिका थोड्या काळासाठी सामील झाली होती, आणि पुन्हा या वर्षी फेब्रुवारीच्या अखेरीस. “इराणच्या ऊर्जा आणि औद्योगिक सुविधांसारख्या महत्त्वाच्या पायाभूत सुविधांवर हल्ला करणे म्हणजे थेट इराणी जनतेला लक्ष्य करणे आहे. हा केवळ युद्धगुन्हा नाही, तर अशा कृतींचे परिणाम इराणच्या सीमांच्या पलीकडेही दूरवर पोहोचतात,” असे ते म्हणाले.

हे ही वाचा:

“इराणमधील सर्व लष्करी उद्दिष्टे लवकरच होणार साध्य!”

भारत इलेक्ट्रॉनिक्सला संरक्षण, एव्हियोनिक्स, संप्रेषण उपकरणांसाठी ₹६,७९५ कोटींच्या नव्या ऑर्डर्स

सात वर्षांनंतर भारतात पोहचणार इराणी कच्चे तेल

१९८४ शीखविरोधी दंग्यांच्या पीडितांचे वकील एच. एस. फुलका भाजपमध्ये

ट्रम्प यांनी तेहरानला ताजी धमकी दिल्यानंतर काही तासांतच इराणच्या राष्ट्राध्यक्षांचे हे पत्र आले आहे. ट्रम्प यांनी सोशल मीडियावर लिहिले होते की, जोपर्यंत होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा उघडली जात नाही, तोपर्यंत अमेरिका “इराणला उद्ध्वस्त करण्यासाठी किंवा, जसे ते म्हणतात, पुन्हा पाषाणयुगात पाठवण्यासाठी बॉम्बवर्षाव करत राहील.” अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी असेही म्हटले की, इराणच्या “नव्या राजवटीच्या राष्ट्राध्यक्षांनी” युद्ध संपवण्यासाठी युद्धविरामाची विनंती केली होती – हा दावा इराणी अधिकाऱ्यांनी फेटाळला.

Exit mobile version