रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन हे लवकरच भारत दौऱ्यावर येणार असून त्यांनी त्यांच्या भारत भेटीची पुष्टी केली आहे. पत्रकारांशी संवाद साधताना पुतिन म्हणाले की ते भारत दौऱ्यासाठी आणि त्यांचे प्रिय मित्र पंतप्रधान मोदी यांना भेटण्यासाठी उत्सुक आहेत. डिसेंबरच्या सुरुवातीला होणाऱ्या दौऱ्यासाठी उत्सुक असून आमचा विश्वासू भागीदार, प्रिय मित्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी होणाऱ्या भेटीसाठी आतुरतेने वाट पाहत असल्याचे पुतिन म्हणाले.
वर्षाच्या अखेरीस पुतिन पंतप्रधान मोदींसोबत वार्षिक शिखर परिषदेसाठी येणार असल्याचे वृत्त होते. आता पुतिन यांनी स्वतः त्यांच्या दौऱ्याची पुष्टी केली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर ५०% आयात शुल्क लादल्यानंतर पुतिन यांचा हा पहिला भारत दौरा असणार आहे. दोन्ही देशांमध्ये धोरणात्मक आणि आर्थिक सहकार्य वाढवणे यासाठी हा त्यांचा भारत दौरा असेल, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
यापूर्वी रशियासोबत तेल व्यापार करण्यावरून ट्रम्प यांनी भारतावर लावलेल्या कर दबावावर पुतिन यांनी टीका केली. अमेरिकेच्या दबावाला बळी न पडल्याबद्दल भारताचे कौतुक केले. नवी दिल्ली मॉस्कोवरील आपले ऊर्जा अवलंबित्व संपवणार नाही असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. भारत आपले ऊर्जा संसाधने सोडून देईल का? जर तसे असेल तर त्यांचे काही नुकसान होईल. जर त्यांनी नकार दिला नाही तर निर्बंध लादले जातील आणि तोटाही तितकाच असेल. भारतीय लोक कधीही कोणाकडूनही स्वतःचा अपमान होऊ देणार नाहीत. मी पंतप्रधान मोदींना ओळखतो, तेही असे कोणतेही निर्णय घेणार नाहीत, असे पुतिन म्हणाले.
हे ही वाचा :
ऑपरेशन सिंदूर: एफ- १६, जेएफ- १७ विमानांसह पाकिस्तानी लढाऊ विमाने पाडली!
पाक पोलिसांचा नॅशनल प्रेस क्लबवर हल्ला; पत्रकारांना मारहाण
राहुल गांधी परदेशात जाऊन देशाची बदनामी करतात!
जागतिक वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप: मीराबाई चानूने रौप्यपदक जिंकले!
भारतासोबतचा व्यापार असमतोल दूर करण्यासाठी ते काम करतील आणि भारताकडून अधिक कृषी उत्पादने आणि औषधे खरेदी करण्याची योजना आखत आहेत असेही त्यांनी सांगितले. पुढे बोलताना पुतिन म्हणाले, अमेरिकेच्या दंडात्मक शुल्कामुळे भारताला होणारे नुकसान रशियाकडून होणाऱ्या कच्च्या तेलाच्या आयातीद्वारे संतुलित केले जाईल आणि त्याचबरोबर एक सार्वभौम राष्ट्र म्हणून भारताची प्रतिष्ठा वाढेल.
