मालदीवची भारतविरोधी ज्योत मालवली! घेतली नरमाईची भूमिका

मालदीवच्या पर्यटन विभागाकडून निवेदन प्रसिद्ध करत निषेध

मालदीवची भारतविरोधी ज्योत मालवली! घेतली नरमाईची भूमिका

मालदीवमधील काही मंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आणि भारतीयांवर अपमानास्पद शब्दात टीका केली होती. यानंतर मालदीवला भारतीयांच्या रोषाचा सामना करावा लागत आहे. याचा परिणाम मालदीवमधील पर्यटनावर झाला आहे. त्यामुळे मालदीवने आता नरमाईची भूमिका घेतल्याचे पाहायला मिळत आहे. मालदीवच्या पर्यटन विभागाने एक निवेदन जारी करत भारताची माफी मागितली आहे. तसेच त्यांच्या मंत्र्यांनी केलेल्या वक्तव्यांचा निषेध नोंदवला आहे.

मालदीव असोसिएशन ऑफ टुरिझम इंडस्ट्रीने (MATI) जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे की, “आमच्या काही उपमंत्र्यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय नागरिक यांच्याविषयी केलेल्या अपमानास्पद वक्तव्यांचा आम्ही तीव्र निषेध करत आहोत. भारत हा आमचा शेजारी आणि मित्र देश आहे. आमच्या संपूर्ण इतिहासात अनेक संकटकाळात भारताने सर्वात आधी प्रतिसाद दिला आहे. भारत सरकारने आणि भारतीय नागरिकांनी आमच्याशी जपलेल्या घनिष्ठ संबंधांबद्दल आम्ही भारताचे नेहमीच आभारी आहोत. मालदीवच्या पर्यटन उद्योगात भारताचे महत्त्वाचे आणि सातत्यपूर्ण योगदान आहे. करोना काळात लावलेले निर्बंध शिथील केल्यानंतर आम्ही पर्यटकांसाठी आमच्या देशाचे दरवाजे उघडले. त्यानंतर मालदीवच्या पर्यटनात भारताने मोठं योगदान दिलं आहे. भारत मालदीवसाठी प्रमुख बाजारपेठ म्हणून कायम आहे. उभय राष्ट्रांमधील घनिष्ठ मैत्रीचे संबंध यापुढेही कामय राहावेत अशी आमची प्रामाणिक इच्छा आहे. त्यामुळेच आपल्या संबंधांवर कुठलाही नकारात्मक परिणाम होईल अशा कृतीपासून आणि वक्तव्यांपासून आम्ही यापुढे दूर राहू,” अशी भूमिका पर्यटन विभागाने स्पष्ट केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीयांवर केलेल्या टीकेनंतर या दोन्ही देशात तणाव निर्माण झाला आहे. टीकेनंतर भारतीय नागरिक, कलाकार आणि खेळाडूंनी सोशल मीडियाच्या माध्यमातून संताप व्यक्त केला. तसेच भारतीय नागरिकांकडून मालदीववर बहिष्कार घालण्याचं, पर्यटनासाठी मालदीवला न जाण्याचं आवाहन केलं जात आहे. अशातच अनेक भारतीयांनी त्यांची मालदीव सफर रद्द केली. भारतातल्या काही आंतरराष्ट्रीय ट्रॅव्हल कंपन्यांनीदेखील मालदीवसाठी बुकिंग्स घेणं बंद केलं आहे. परिणामी, मालदीवच्या पर्यटनाला मोठा फटका बसणार आहे. त्यामुळे मालदीवच्या पर्यटन विभागाने ही नरमाईची भूमिका घेत भारताची माफी मागितली आहे.

हे ही वाचा:

संरक्षणापासून आरोग्यापर्यंत… भारताने मालदीवशी नेहमीच पाळला शेजारधर्म!

मालदीवप्रकरणी चीनने खुपसले नाक

उरी हल्ल्यातील आयएसआयच्या भूमिकेवरून अमेरिकेने पाकिस्तानला फटकारले

रामजन्मभूमीचे टाळे उघडून देणाऱ्या न्यायाधीशांना पाकमधून येत असत धमक्या

ईजमायट्रिपकडून सर्व बुकिंग्स रद्द केले

देशातली मोठी ट्रॅव्हल कंपनी ‘ईजमायट्रिप’ने मालदीवसाठी बूक केलेली विमानाची सर्व तिकिटं रद्द केली आहेत. कंपनीचे सहसंस्थापक आणि सीईओ निशांत पिट्टी यांनी स्वतः समाजमाध्यमांद्वारे याबाबतची माहिती दिली. निशांत पिट्टी म्हणाले, आपल्या राष्ट्राच्या एकात्मतेसाठी ईजमायट्रीपने मालदीवच्या सर्व फ्लाईट बुकिंग्स रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

बॉलीवूड कलाकार, खेळाडूही एकटवले

अभिनेता अक्षय कुमार, कार्तिक आर्यन, सलमान खान, जॉन अब्राहम, अभिनेत्री श्रद्धा कपूर, क्रिकेटपटू सचिन तेंडूलकर यांनी ही या मुद्द्याची दखल घेत भारतातील पर्यटन स्थळांना भेट देण्याचं आवाहन त्यांनी केलं.

Exit mobile version