“पाकने सुवर्ण मंदिरावर डागली होती क्षेपणास्त्र, पण…” काय म्हणाले लष्कर अधिकारी?

दहशतवादी छावण्यांवर केलेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तानी ड्रोनने सुवर्ण मंदिराला लक्ष्य करण्याचा केला होता प्रयत्न

“पाकने सुवर्ण मंदिरावर डागली होती क्षेपणास्त्र, पण…” काय म्हणाले लष्कर अधिकारी?

भारताने पाकिस्तान आणि पीओकेमधील नऊ दहशतवादी तळांवर केलेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तानने पंजाबमधील अमृतसर येथील सुवर्ण मंदिरावर क्षेपणास्त्रे आणि ड्रोनने हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. १५ व्या इन्फंट्री डिव्हिजनचे जनरल ऑफिसर कमांडिंग (जीओसी) मेजर जनरल कार्तिक सी शेषाद्री यांनी सोमवारी याबाबत खुलासा केला. लष्कराच्या हवाई संरक्षण युनिटने सुवर्ण मंदिरावर लक्ष्य केलेले सर्व ड्रोन आणि क्षेपणास्त्रे पाडली, असेही ते म्हणाले.

ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारताने नऊ दहशतवादी छावण्यांवर केलेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तानी ड्रोनने अमृतसरमधील सुवर्ण मंदिराला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. पाकिस्तान प्रत्युत्तर देईल असा अंदाज होता. मुख्य हवाई तळ आणि लष्करी प्रतिष्ठानांना लक्ष्य करेल, याची कल्पना होती. परंतु, आश्चर्याची गोष्ट म्हणजे, काही कामिकाझे ड्रोन, जमिनीवरून जमिनीवर आणि हवेतून जमिनीवर मारा करणारी क्षेपणास्त्रे थेट सुवर्ण मंदिरावर डागण्यात आली. सुमारे तीन दिवसांपर्यंत आमच्या हवाई तळांना आणि लष्करी केंद्रांना नुकसान पोहोचवण्यात यश न मिळाल्यानंतर, त्यांनी या कामिकाझे ड्रोन आणि रॉकेटने नागरी क्षेत्रे, गुरुद्वारा साहिब आणि इतर भागांना लक्ष्य केले. सर्व हवाई हल्ले अतिशय अचूकतेने रोखण्यात आले आणि पाडण्यात आले. हा हल्ला ८ मे रोजी पहाटे झाला. पाकिस्तानने अंधाराचा फायदा घेत ड्रोन आणि लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांचा वापर करून मोठ्या प्रमाणात हवाई हल्ला केला. पण, भारतीय सैन्य पूर्णपणे तयार होते आणि अशा प्रकारे येणाऱ्या सर्व धोक्यांना रोखले आणि नष्ट केले.

“आम्हाला याची पूर्वकल्पना असल्याने आम्ही पूर्णपणे तयार होतो आणि आमच्या धाडसी आणि सतर्क लष्कराच्या हवाई संरक्षण दलाच्या तोफखान्यांनी पाकिस्तानी सैन्याच्या नापाक योजना उधळून लावल्या आणि सुवर्ण मंदिरावर लक्ष्य केलेले सर्व ड्रोन आणि क्षेपणास्त्रे पाडली. अशा प्रकारे, आमच्या पवित्र सुवर्ण मंदिरावर एकही ओरखडा येऊ दिला नाही,” असे ते पुढे म्हणाले.

भारतीय लष्कराने आकाश क्षेपणास्त्र प्रणाली आणि एल-७० हवाई संरक्षण गन सारख्या त्यांच्या हवाई संरक्षण प्रणालींनी येणाऱ्या पाकिस्तानी ड्रोन आणि क्षेपणास्त्रांना यशस्वीरित्या कसे रोखले आणि निष्क्रिय केले, सुवर्ण मंदिर आणि पंजाबमधील प्रमुख शहरांचे संरक्षण कसे केले हे दाखवण्यासाठी एक प्रात्यक्षिक देखील आयोजित केले.

Exit mobile version