संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारताने पाकिस्तानच्या ‘विभाजनकारी अजेंड्यावर’ जोरदार टीका केली. भारताने म्हटले की, पाकिस्तान हा असा देश आहे जो आपल्या एका पंतप्रधानाला तुरुंगात टाकतो आणि लष्करप्रमुखांना आजीवन संरक्षण देतो. हे सर्व असूनही, तो आपल्या लोकांच्या इच्छेचा आदर करण्याचा दावा करतो. संयुक्त राष्ट्रांमधील भारताचे स्थायी प्रतिनिधी, राजदूत हरीश पार्वतानेनी यांनी पाकिस्तानला जागतिक दहशतवादाचं केंद्र असंही संबोधलं.
हरीश पार्वतानेनी म्हणाले की, “भारताने ६५ वर्षांपूर्वी सद्भावना आणि मैत्रीच्या भावनेने सिंधू जल कराराला मान्यता दिली होती. मात्र, या साडेसहा दशकांमध्ये पाकिस्तानने भारतावर अनेक दहशतवादी हल्ले करून या कराराच्या भावनेचं उल्लंघन केलं आहे. एवढंच नाही तर गेल्या चार दशकांत पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी हल्ल्यांमध्ये शेकडो भारतीयांचे प्राण गेले आहेत. या वर्षी एप्रिलमध्ये जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यात देखील २६ नागरिकांचा मृत्यू झाला. त्यामुळे भारताने अखेर जाहीर केलं की दहशतवादाचं जागतिक केंद्र असलेल्या पाकिस्तानने सीमापार आणि इतर सर्व प्रकारच्या दहशतवादाला पाठिंबा देणं बंद करेपर्यंत सिंधू पाणी करार स्थगित ठेवण्यात येईल,” अशा शब्दांत हरीश पार्वतानेनी यांनी पाकिस्तानवर टीका केली.
हरीश पार्वतानेनी यांनी सुरक्षा परिषदेत “शांततेसाठी नेतृत्व” या विषयावरील खुल्या चर्चेदरम्यान भाष्य करत पाकिस्तानला फटकारले. पाकिस्तानचे राजदूत असीम इफ्तिखार अहमद यांनी चर्चेदरम्यान जम्मू- काश्मीर आणि सिंधू पाणी कराराचे मुद्दे उपस्थित केल्यानंतर त्यांनी ही तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली.
हरीश पर्वतानेनी म्हणाले, “पाकिस्तानकडे आपल्या लोकांच्या इच्छेचा आदर करण्याची एक अनोखी पद्धत आहे. ते पंतप्रधानांना तुरुंगात टाकतात, सत्ताधारी राजकीय पक्षावर बंदी घालतात, २७ व्या घटनादुरुस्तीद्वारे आपल्या सशस्त्र दलांना घटनात्मक बंड करण्यास परवानगी देतात आणि संरक्षण दलांच्या प्रमुखांना आजीवन संरक्षण देतात. याचा अर्थ असा आहे की पाकिस्तानचे लष्करप्रमुख आणि संरक्षण दलांचे प्रमुख असीम मुनीर यांना त्यांच्या कृत्यांसाठी आयुष्यभर न्यायालयात आणले जाणार नाही आणि त्यांना कोणत्याही शिक्षेला सामोरे जावे लागू शकत नाही,” असे म्हणत हरीश यांनी पाकिस्तानला फटकारले.
हे ही वाचा:
पश्चिम बंगाल: आज जाहीर होणार प्रारूप मतदार यादी; ५८ लाखांहून अधिक नावे वगळणार
“… तर भारताचा ईशान्य भाग वेगळा होईल!” बांगलादेशी नेत्याने भारताविरुद्ध ओकले विष
“संजौली मशिदीचे अनधिकृत मजले हवेतर आम्ही मोफत पाडू!”
विजय दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून १९७१ च्या युद्धवीरांना श्रद्धांजली!
राजदूत पार्वतानेनी यांनी पुढे म्हटले की, “आजच्या खुल्या चर्चेत पाकिस्तानने जम्मू आणि काश्मीरचा अयोग्य उल्लेख करणे हे भारत आणि लोकांना हानी पोहोचवण्याच्या पाकिस्तानच्या ध्यासाचे पुरावे आहेत. संयुक्त राष्ट्रांच्या सर्व बैठका आणि व्यासपीठांवर आपला विभाजनकारी अजेंडा पुढे नेण्यासाठी हा ध्यास कायमस्वरूपी ठेवणारा एक कायमस्वरूपी सुरक्षा परिषदेचा सदस्य आपल्या जबाबदाऱ्या पूर्ण करेल अशी अपेक्षा केली जाऊ शकत नाही.”
