अमेरिकेतील युनिव्हर्सिटी ऑफ कोलोरॅडो बोल्डर येथे शिक्षण घेत असलेल्या दोन भारतीय पीएचडी विद्यार्थ्यांनी वांशिक व सांस्कृतिक भेदभावाविरोधात दाखल केलेल्या खटल्यात मोठा विजय मिळवला आहे. या प्रकरणात विद्यापीठ प्रशासनाने विद्यार्थ्यांना २ लाख अमेरिकन डॉलर (सुमारे १.८ कोटी रुपये) इतकी भरपाई देण्यास मान्यता दिली आहे.
या प्रकरणाची सुरुवात सप्टेंबर २०२३ मध्ये झाली. संशोधन विभागातील सर्वांसाठी असलेल्या मायक्रोवेव्हमध्ये एका भारतीय विद्यार्थ्याने पालक पनीर हा पारंपरिक भारतीय पदार्थ गरम केला होता. त्यावेळी अन्नाच्या वासाबाबत तक्रार करण्यात आली आणि त्या विद्यार्थ्याला मायक्रोवेव्ह वापरण्यापासून रोखण्यात आले. विद्यार्थ्यांचा आरोप आहे की, अशा तक्रारी प्रामुख्याने भारतीय आणि दक्षिण आशियाई विद्यार्थ्यांनाच लक्ष्य करून केल्या जात होत्या.
हे ही वाचा :
अमेरिका ग्रीनलँड ताब्यात घेणार? नव्या विधेयकामुळे खळबळ
सोन्या-चांदीने गाठले आकाश, नवे उच्चांक प्रस्थापित
इस्रायलचा संयुक्त राष्ट्रांच्या सात एजन्सींमधून बाहेर पडण्याचा निर्णय
१५ उपग्रह हरवले पण ‘KID’ बचावला; तीन मिनिटे अवकाशातून पाठवली माहिती
या घटनेनंतर दोन्ही विद्यार्थ्यांनी विद्यापीठ प्रशासनाकडे अधिकृत तक्रार दाखल केली. मात्र तक्रारीची योग्य दखल घेण्याऐवजी प्रशासनाने उलट कारवाई केल्याचा दावा करण्यात आला. तक्रार केल्यानंतर त्यांना अध्यापन सहाय्यक पदावरून हटवण्यात आले, वारंवार चौकशीसाठी बोलावण्यात आले आणि त्यांच्या शैक्षणिक प्रगतीत अडथळे निर्माण करण्यात आले. ही कारवाई सूडबुद्धीने करण्यात आल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे होते.
दीर्घ काळ चाललेल्या कायदेशीर प्रक्रियेनंतर अखेर हा वाद सामंजस्याने मिटवण्यात आला. या सामंजस्यानुसार विद्यापीठाने आर्थिक भरपाई देण्यास सहमती दर्शवली असून विद्यार्थ्यांना त्यांची पदवी देण्यात आली आहे. मात्र भविष्यात त्या विद्यापीठात अध्यापन किंवा नोकरी करण्यास त्यांना मनाई करण्यात आली आहे.
