काही राष्ट्रे लष्करी ताकदीच्या जोरावर वर्चस्व प्रस्थापित करू पाहाताहेत!

पोप यांनी व्यक्त केली चिंता

काही राष्ट्रे लष्करी ताकदीच्या जोरावर वर्चस्व प्रस्थापित करू पाहाताहेत!

व्हॅटिकन सिटी – कॅथोलिक चर्चचे प्रमुख पोप लिओ चौदावा यांनी परराष्ट्र धोरणावर दिलेल्या महत्त्वाच्या वार्षिक भाषणात सध्याच्या जागतिक घडामोडींवर तीव्र चिंता व्यक्त केली. अनेक देश आपल्या प्रभावासाठी व स्वार्थासाठी संवादाऐवजी शक्तीचा वापर करत असल्याचा त्यांनी कडाडून निषेध केला. या प्रवृत्तीमुळे जागतिक शांतता धोक्यात येत असून आंतरराष्ट्रीय कायदे व नियम कमकुवत होत असल्याचे त्यांनी सांगितले.

पोप म्हणाले की, दुसऱ्या महायुद्धानंतर निर्माण झालेली आंतरराष्ट्रीय सहकार्याची व कायद्याची व्यवस्था हळूहळू दुर्लक्षित केली जात आहे. काही राष्ट्रे लष्करी ताकदीच्या जोरावर आपले वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत आहेत, ही बाब अत्यंत धोकादायक असल्याचे त्यांनी नमूद केले. कोणत्याही देशाचे नाव न घेता त्यांनी सूचक शब्दांत सध्याच्या विविध संघर्षांकडे लक्ष वेधले.
हे ही वाचा :
चीन, रशिया व ईरान यांचा दक्षिण आफ्रिकेत संयुक्त नौदल सराव

‘ऑपरेशन सिंदूर’ने पाकिस्तानचे अपयश उघड केले; घटनात्मक बदल करण्यास भाग पाडले!

मुंबईतील गोरेगावमध्ये घरात लागलेल्या भीषण आगीत एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

व्हेनेझुएलाचे तेल भारताला विकण्यास अमेरिका तयार पण… काय म्हणाले ट्रम्प?

भाषणात त्यांनी संयुक्त राष्ट्र संघ तसेच इतर बहुपक्षीय संस्थांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे अधोरेखित केले. संवाद, सहकार्य आणि परस्पर सन्मान या मूल्यांवर आधारित मार्गानेच जागतिक प्रश्न सोडवले गेले पाहिजेत, असे त्यांनी स्पष्ट केले. युद्ध आणि संघर्षांचा सर्वाधिक फटका सामान्य नागरिकांना बसतो, त्यामुळे मानवी हक्कांचे संरक्षण आणि शांततेचा मार्ग स्वीकारणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

याच भाषणात पोप यांनी जीवनमूल्ये, कुटुंबसंस्था आणि सामाजिक जबाबदारी यांचाही उल्लेख केला. गर्भपातासारख्या संवेदनशील मुद्द्यांवर चर्चची भूमिका स्पष्ट करत मानवी जीवनाचे संरक्षण आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. एकूणच, हे भाषण सध्याच्या अस्थिर जागतिक परिस्थितीत शांतता, संवाद आणि नैतिक मूल्यांचा ठोस संदेश देणारे ठरले आहे.

Exit mobile version