अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसच्या ओव्हल ऑफिसमध्ये पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ आणि लष्कर प्रमुख फील्ड मार्शल आसिम मुनीर यांच्यासोबत द्विपक्षीय बैठक घेतली. मात्र, या बैठकीपूर्वी शहबाज शरीफ आणि आसिम मुनीर यांना बराच वेळ वाट बघावी लागल्याचे वृत्त आहे. त्यामुळे अमेरिकेतही पाकिस्तानची नाचक्की झाल्याचे बोलले जात आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांना भेटण्याआधी शरीफ आणि मुनीर यांना व्हाईट हाऊसच्या गेटवर बराच वेळ थांबावे लागले. असे सांगितले जात आहे की, जेव्हा शरीफ आणि मुनीर ट्रम्प यांची वाट पाहत होते, त्याच वेळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ‘टिकटॉक’ संदर्भात कार्यकारी आदेशावर स्वाक्षरी करत होते आणि प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते. याच कारणामुळे त्यांना ट्रम्प यांची भेट घेण्यासाठी गेटवरच थांबावे लागले. अमेरिकन राष्ट्राध्यक्षांची पत्रकार परिषद संपल्यानंतरच त्यांना ट्रम्प यांना भेटण्याची संधी मिळाली. त्यांची ही भेट गुरुवारी संध्याकाळी झाली. माहितीनुसार, या बैठकीत द्विपक्षीय संबंध, व्यापार, प्रादेशिक सुरक्षा आणि जागतिक मुद्द्यांवर चर्चा झाली.
भेटीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांनी पत्रकारांशी बोलताना शरीफ आणि मुनीर यांचे कौतुक केले होते. त्यांनी म्हटले की, “आज आमच्याकडे एक महान नेता येत आहेत. पाकिस्तानचे पंतप्रधान आणि फील्ड मार्शल महान व्यक्ती आहेत. ते येत आहेत आणि कदाचित खोलीत बसले असतील.” याआधी, जून महिन्यात ट्रम्प यांनी मुनीर यांना व्हाईट हाऊसमध्ये लंचसाठी आमंत्रित केले होते, जी पाकिस्तानी आर्मी चीफची पहिली एकल भेट होती. ऑगस्ट महिन्यातही मुनीर वॉशिंग्टनला गेले होते. जूनच्या दौऱ्यात मुनीर यांनी व्हाईट हाऊसमध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षांशी सविस्तर चर्चा केली होती, ज्यामध्ये द्विपक्षीय व्यापार वाढवण्यासारख्या मुद्द्यांचा समावेश होता. या बैठकीत अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबिओ आणि मध्यपूर्व विषयक विशेष प्रतिनिधी स्टीव्ह विटकॉफही उपस्थित होते.
हे ही वाचा:
सोनम वांगचुक यांचे उपोषण आणि लडाख समोरील खरा प्रश्न..!
ट्रम्प यांचा नवा टॅरिफ वार; औषधांवर १०० टक्के कर
भाजपाकडून बिहार, बंगाल, तामिळनाडूत निवडणूक प्रभार्यांची नियुक्ती
सोनम वांगचुक आणि त्यांच्या संस्थेची परकीय निधी कायदा उल्लंघन प्रकरणी चौकशी
शहबाज शरीफ यांनी यावर्षी पाकिस्तान आणि भारत यांच्यातील तणाव कमी करण्याच्या ट्रम्प यांच्या प्रयत्नांना नोबेल शांतता पुरस्कारासाठी सार्वजनिक समर्थन दिले होते. मात्र, भारताने तणाव कमी करण्यामध्ये ट्रम्प यांच्या भूमिकेला नकार दिला होता.
