“इराणमध्ये खोमेनी शासन बदलायची गरज!”

युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेंस्कींची मागणी

“इराणमध्ये खोमेनी शासन बदलायची गरज!”

इराणमध्ये सरकारविरोधी आंदोलकांवर होत असलेल्या दडपशाही आणि हिंसाचारावर आता आंतरराष्ट्रीय प्रतिक्रिया येत आहेत. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेंस्की यांनी बुधवार (१४ जानेवारी) रोजी इराणी आंदोलकांच्या समर्थनार्थ वक्तव्य करताना म्हटले की, इस्लामिक रिपब्लिकला अस्तित्वाचा हक्क नाही आणि शासनबदलाची गरज आहे. दुसरीकडे, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तेहरानला पुन्हा एकदा इशारा देत इराणने चांगले वर्तन करावे, असे सांगितले.

झेलेंस्की म्हणाले, “आम्ही इराणविरोधात कठोर भूमिकेचे समर्थन करतो. जे शासन इतक्या वर्षांपासून सत्तेत आहे आणि ज्याने इतक्या लोकांची हत्या केली आहे, ते अस्तित्वाचा हक्कदार नाही. बदल आवश्यक आहेत. युरोपमध्येही बदल गरजेचे आहेत.” इराणच्या विविध शहरांमध्ये झालेल्या व्यापक निदर्शनांदरम्यान सुरक्षा दलांकडून झालेल्या हिंसाचाराच्या वृत्तांनंतर वाढलेल्या आंतरराष्ट्रीय चिंतेच्या पार्श्वभूमीवर झेलेंस्कींचे हे वक्तव्य आले आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही इराणला कठोर संदेश दिला. इराणसाठी संदेश काय, असे विचारले असता ते म्हणाले, “संदेश असा आहे की त्यांनी मानवता दाखवली पाहिजे. त्यांच्या समोर मोठी समस्या आहे आणि मला आशा आहे की ते लोकांची हत्या करत नसतील. असे दिसते की त्यांनी फार वाईट वर्तन केले आहे, मात्र याची अद्याप पुष्टी झालेली नाही.” इराणकडून ट्रम्प यांच्या इशाऱ्यांना वारंवार अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप असल्याचे सांगत फेटाळले गेले आहे. यावर प्रतिक्रिया देताना ट्रम्प म्हणाले, “होय, मागील वेळीही इराणने असेच म्हटले होते, जेव्हा मी त्यांच्या अणुक्षमतांसह त्यांना उध्वस्त केले ज्या आता त्यांच्या जवळ नाहीत. त्यामुळे त्यांनी चांगले वर्तन केले पाहिजे.”

हे ही वाचा:

‘तमिळ संस्कृती हा संपूर्ण भारताचा सामाईक वारसा’

सोन्या-चांदीने गाठले आकाश, नवे उच्चांक प्रस्थापित

अमेरिका ग्रीनलँड ताब्यात घेणार? नव्या विधेयकामुळे खळबळ

मकर संक्रांत २०२६: ‘या’ रंगाचे कपडे घालू नका!

मंगळवार (१३ जानेवारी) रोजी ट्रम्प यांनी इराणमधील सरकारविरोधी आंदोलकांना देशभर आंदोलन सुरू ठेवण्याचे आवाहन केले. ‘ट्रुथ सोशल’वर सलग पोस्ट करत त्यांनी आंदोलकांना देशातील संस्थांवर ताबा मिळवण्याचे आवाहन केले आणि MIGA म्हणजेच “मेक इराण ग्रेट अगेन” हा नारा दिला. त्यांनी हेही सांगितले की इराणी अधिकाऱ्यांसोबत होणाऱ्या सर्व बैठका रद्द करण्यात आल्या आहेत. या सगळ्या घडामोडींमध्ये इराणने अमेरिकेच्या विधानांना पूर्णतः फेटाळून लावत कोणत्याही प्रकारच्या अमेरिकी कारवाईला प्रत्युत्तर दिले जाईल, असा इशारा दिला आहे.

Exit mobile version