ट्रम्प म्हणतात, प्रिय मित्र मोदींशी बोलायची इच्छा; पंतप्रधान मोदी काय म्हणाले?

दंडात्मक कर लादल्यामुळे दोन्ही देशांमधील संबंध ताणले गेले आहेत

ट्रम्प म्हणतात, प्रिय मित्र मोदींशी बोलायची इच्छा; पंतप्रधान मोदी काय म्हणाले?

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर ५० टक्के दंडात्मक कर लादल्यामुळे दोन्ही देशांमधील संबंध ताणले गेले आहेत. अशातच आता ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी उत्सुक असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे अमेरिका आणि भारत यांच्यात असलेले व्यापारातील अडथळे दूर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ट्रम्प यांच्या इच्छेवर नरेंद्र मोदी यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.

भारत आणि अमेरिका हे नैसर्गिक भागीदार आहेत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टला उत्तर देताना म्हटले आहे. ट्रम्प यांनी या पोस्टमध्ये नरेंद्र मोदी यांना प्रिय मित्र असे संबोधले असून रखडलेल्या व्यापार चर्चेत नवीन गती येण्याचे संकेत दिले आहेत. “भारत आणि अमेरिका हे जवळचे मित्र आणि नैसर्गिक भागीदार आहेत,” असे पंतप्रधान मोदींनी एक्सवर लिहिले आहे. व्यापार वाटाघाटी भारत- अमेरिका भागीदारीच्या अमर्याद क्षमता उघडण्याचा मार्ग मोकळा करतील, असा विश्वास नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रुथ सोशल पोस्टमध्ये भारतासोबत व्यापार वाटाघाटी सुरू असल्याचे बोलल्यानंतर नरेंद्र मोदींनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

ट्रम्प यांनी नरेंद्र मोदींशी बोलण्याची इच्छाही बोलून दाखवली आहे. यावर पंतप्रधान म्हणाले की, ते लवकरच ट्रम्प यांच्याशी बोलण्यास उत्सुक आहेत. आम्ही लोकांसाठी एक उज्ज्वल, अधिक समृद्ध भविष्य सुरक्षित करण्यासाठी एकत्र काम करू, असेही नरेंद्र मोदी पुढे म्हणाले.

हे ही वाचा : 

बहुप्रतिक्षित आयफोन १७ सिरीज भारतात लाँच; काय आहेत फीचर्स?

पाक, श्रीलंका, बांगालादेश अन आता नेपाळ; भारताच्या शेजाऱ्यांकडे सत्तापालटाची हवा!

“नेपाळमध्ये हिंसाचार शिगेला; पंतप्रधान देश सोडण्याच्या तयारीत?”

रशियन बॉम्बिंगमध्ये २० पेक्षा जास्त जणांचा मृत्यू

रशियाच्या तेल आयातीमुळे अमेरिकेने भारतावर ५० टक्के दंडात्मक कर लादल्यामुळे संबंध बिघडले. या महिन्याच्या सुरुवातीला शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO) शिखर परिषदेतील छायाचित्रांमध्ये पंतप्रधान मोदी शी जिनपिंग आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यासोबत आनंदाने बोलताना दिसत असताना, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी नाराजी व्यक्त केली होती.

Exit mobile version