भारतीय खलाशाच्या मृत्यूनंतर युक्रेनच्या राजदूतांना समन्स

भारताची कठोर भूमिका

भारतीय खलाशाच्या मृत्यूनंतर युक्रेनच्या राजदूतांना समन्स

रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर एका व्यापारी जहाजावरील भारतीय खलाशाचा मृत्यू झाल्यानंतर भारताने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. काळ्या समुद्रात (ब्लॅक सी) एका जहाजावर झालेल्या हल्ल्यात एक भारतीय खलाशी ठार झाल्यानंतर, युक्रेनचे राजदूत ओलेक्झांडर पोलिशचुक यांना सोमवारी (२७ जुलै) नवी दिल्लीतील परराष्ट्र मंत्रालयात बोलावण्यात आले. या घटनेबाबत भारताने अधिकृत निषेध नोंदवत भारतीय नागरिकांच्या सुरक्षेबाबत गंभीर चिंता व्यक्त केली आहे.

परराष्ट्र मंत्रालयाच्या माहितीनुसार, काळ्या समुद्रातील व्यापारी जहाजावर झालेल्या हल्ल्यात एका भारतीय खलाशाचा मृत्यू झाला. या घटनेनंतर भारताने युक्रेनच्या राजदूतांना समन्स बजावत संपूर्ण घटनेचा तपशील मागवला. युद्धाच्या परिस्थितीतही व्यापारी जहाजे आणि त्यावरील निष्पाप नागरिकांची सुरक्षितता सुनिश्चित करणे आवश्यक असल्याचे भारताने स्पष्ट केले.

यापूर्वीही १९ जुलै रोजी ओडेसा बंदरातून निघालेल्या एमव्ही गोल्डन लिओ या व्यापारी जहाजावर झालेल्या हल्ल्यात चार भारतीय खलाशांचा मृत्यू झाला होता. त्या घटनेनंतर भारताने रशियाच्या प्रभारी राजनैतिक अधिकाऱ्यांनाही समन्स बजावत तीव्र निषेध नोंदवला होता. आता अल्पावधीतच आणखी एका भारतीय खलाशाचा बळी गेल्याने भारताने पुन्हा एकदा कठोर राजनैतिक पाऊल उचलले आहे.

हे ही वाचा:

“आंदोलन झाले म्हणून लाठीमार करण्याचा अधिकार नाही”

विद्यार्थ्यांवर AK-47 मधून गोळीबार करणारा जवान निलंबित

सोन्या-चांदीला पुन्हा झळाळी; तणाव ओसरताच दर तेजीत

त्या अभिनेत्रीने दाखवले मोदींचे अश्लील पोस्टर; गुन्हा दाखल

भारताने दोन्ही देशांना युद्धादरम्यान व्यापारी जहाजे आणि नागरी सागरी वाहतुकीचे संरक्षण करण्याचे आवाहन केले आहे. अशा हल्ल्यांमुळे आंतरराष्ट्रीय सागरी व्यापाराच्या सुरक्षिततेवर परिणाम होत असल्याचेही भारताने अधोरेखित केले. तसेच भारतीय खलाशांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले.

या सलग घटनांमुळे युद्धग्रस्त भागांत कार्यरत भारतीय खलाशी आणि व्यापारी जहाजांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. भारताने संबंधित देशांशी सातत्याने संपर्क ठेवत भारतीय नागरिकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक ती सर्व पावले उचलण्याचे आश्वासन दिले आहे.

Exit mobile version