इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी कतारची राजधानी असलेल्या दोहा येथे हमास अधिकाऱ्यांवर केलेल्या लष्करी कारवाईचे समर्थन केले आहे. तसेच त्यांनी ९/११ च्या हल्ल्याला अमेरिकेने दिलेल्या प्रतिसादाशी या कारवाईची तुलना केली आहे. नेतन्याहू यांनी दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्या देशांना दहशतवाद्यांना बाहेर काढण्याचे आवाहन केले आहे. शिवाय असे न झाल्यास इस्रायल कारवाई करेल असा कठोर इशारा त्यांनी दिला आहे.
नेतान्याहू यांनी इस्रायलवरील ७ ऑक्टोबरच्या हल्ल्याचे वर्णन ९/११ च्या हल्ल्याप्रमाणे केले आहे. त्यांनी कतारवर हमासला सुरक्षित आश्रय दिल्याचा आणि दहशतवाद्यांना आर्थिक मदत केल्याचा आरोप केला आहे. ते म्हणाले की, “मी कतार आणि दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्या सर्व राष्ट्रांना सांगतो की, तुम्ही दहशतवाद्यांना हाकलून लावा किंवा त्यांना न्यायालयासमोर आणा. जर तुम्ही तसे केले नाही तर ते काम आम्ही करू,” असे दहशतवादाविरुद्ध इस्रायलच्या भूमिकेला आंतरराष्ट्रीय पाठिंबा मिळवण्याच्या उद्देशाने नेतन्याहू यांनी म्हटले आहे.
मंगळवारी गाझा पट्टीत युद्धबंदीच्या अमेरिकेच्या प्रस्तावावर विचार करण्यासाठी हमासचे वरिष्ठ नेते जमले असताना इस्रायलने कतारमधील हमासच्या राजकीय नेतृत्वाच्या मुख्यालयावर हल्ला केला. यामुळे युद्ध संपवण्याच्या आणि ओलिसांना मुक्त करण्याच्या उद्देशाने होणाऱ्या चर्चेला धोका निर्माण झाला. कतारने या हल्ल्याचा निषेध केला आणि त्याला भ्याड कृती म्हणत आंतरराष्ट्रीय कायदे आणि नियमांचे उघड उल्लंघन केल्याचा आरोप केला आहे. तसेच कतारमधील नागरिकांच्या आणि रहिवाशांच्या सुरक्षिततेसाठी गंभीर धोका निर्माण झाल्याचे म्हटले आहे.
आपल्या व्हिडिओ भाषणात, नेतन्याहू यांनी ११ सप्टेंबरच्या हल्ल्याच्या स्मृतींना आठवून या घटनेची तीव्रता आणि त्यानंतर जबाबदारांना शोधून काढण्यासाठी अमेरिकेच्या वचनबद्धतेची आठवण करून दिली. त्यांनी ९/११ च्या घटना आणि ७ ऑक्टोबरच्या घटनांमधील समांतरता अधोरेखित केली, त्यांनी म्हटले की ९/११ नंतर अमेरिकेने जागतिक स्तरावर दहशतवाद्यांना शोधून काढण्याचा निर्धार केला आणि दहशतवाद्यांना आश्रय देण्याविरुद्ध संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा ठराव मंजूर केला. ११ सप्टेंबरच्या घटनेनंतर अमेरिकेने काय केले? तर त्यांनी हे भयंकर कृत्य करणाऱ्या दहशतवाद्यांना, ते कुठेही असले तरी, शोधून काढण्याचे आश्वासन दिले. आणि दोन आठवड्यांनंतर संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत एक ठरावही मंजूर केला, ज्यामध्ये असे म्हटले होते की सरकारे दहशतवाद्यांना आश्रय देऊ शकत नाहीत. आम्ही त्याच धर्तीवर काम केले, असे इस्रायलचे पंतप्रधान म्हणाले.
हे ही वाचा
भाषण करत असतानाच ट्रम्प यांचे विश्वासू चार्ली कर्क यांच्यावर झाडल्या गोळ्या
दहशतवादी मॉड्यूलशी संबंधित तिघांना अटक; पाकिस्तानी संबंध उघड
“भारताला दहशतवाद पुरस्कृत देशाकडून धडा घेण्याची गरज नाही”
काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा प्रताप अंगरक्षकाला चापट; शिवीगाळ |
अफगाणिस्तानात अल-कायदाविरुद्ध अमेरिकेच्या कारवाया आणि पाकिस्तानात ओसामा बिन लादेनच्या हत्येचा उल्लेख करत ते पुढे म्हणाले, “आम्ही अमेरिकेने जे केले तेच केले. अफगाणिस्तानात अल-कायदाच्या दहशतवाद्यांचा पाठलाग केला आणि नंतर पाकिस्तानात ओसामा बिन लादेनला ठार मारले”. जगातील विविध देश इस्रायलचा निषेध करत आहेत त्यांना सुनावत नेतान्याहू यांनी स्वसंरक्षण आणि दहशतवादविरोधी कारवाईच्या संदर्भात इस्रायलचे कौतुक करण्याचे आवाहन केले आहे.
