झोहरान मामदानी गुरुवारी मध्यरात्रीनंतर न्यूयॉर्क शहराचे महापौर झाले. मॅनहॅटनमधील ऐतिहासिक आणि सध्या वापरात नसलेल्या (डीकमिशन्ड) सबवे स्थानकात त्यांनी पदाची शपथ घेतली. डेमोक्रॅट पक्षाचे नेते असलेले मामदानी अमेरिकेतील सर्वात मोठ्या शहराचे पहिले मुस्लिम महापौर ठरले. शपथ घेताना त्यांनी कुराणावर हात ठेवला.
एका संक्षिप्त भाषणात ते म्हणाले, हे माझ्या आयुष्यातील खरोखरच सर्वोच्च सन्मान आणि मोठा विशेषाधिकार आहे. हा शपथविधी समारंभ त्यांच्या राजकीय सहकारी लेटीशिया जेम्स यांनी शहराच्या जुन्या सिटी हॉल सबवे स्थानकात पार पाडला. कमानीदार छतांसाठी प्रसिद्ध असलेले हे स्थानक न्यूयॉर्कमधील मूळ सबवे थांब्यांपैकी एक आहे.
महापौर म्हणून आपल्या पहिल्याच भाषणात मामदानी यांनी या जुन्या सबवे स्थानकाचे वर्णन करताना ते म्हणाले की,
“सार्वजनिक वाहतुकीचे शहराच्या चैतन्य, आरोग्य आणि वारशासाठी किती महत्त्व आहे, याचे हे स्थानक जिवंत उदाहरण आहे.” याच वेळी त्यांनी माईक फ्लिन यांची शहराच्या परिवहन विभागाचे नवे आयुक्त म्हणून नियुक्ती जाहीर केली. भाषणाच्या शेवटी ते म्हणाले, आपल्या सर्वांचे मनापासून आभार, आता मी थोड्याच वेळात पुन्हा भेटतो आणि त्यानंतर जिना चढून ते वर गेले.
वयाच्या अवघ्या ३४ व्या वर्षी, मामदानी अनेक पिढ्यांतील सर्वात तरुण महापौरांपैकी एक ठरले आहेत. ते दक्षिण आशियाई वंशाचे पहिले महापौर, तसेच आफ्रिकेत जन्मलेले न्यूयॉर्कचे पहिले महापौर आहेत. आता ते अमेरिकेतील राजकारणातील सर्वात आव्हानात्मक पदांपैकी एक सांभाळत असून, देशातील सर्वाधिक लक्ष ठेवले जाणाऱ्या नेत्यांपैकी एक बनले आहेत.
हे ही वाचा:
चालत्या कारमध्ये आग, एका वर्षाच्या बाळाचा मृत्यू
पंतप्रधान मोदी यांनी दिल्या देशवासीयांना शुभेच्छा!
२०२६ मध्ये १९ टक्के नोकऱ्यांमध्ये कपात!
त्यांच्या जाहीरनाम्यात मोफत बालसंगोपन, मोफत बस सेवा, सुमारे १० लाख घरांसाठी भाडेवाढ गोठवणे, तसेच महानगरपालिकेच्या मालकीची किराणा दुकाने सुरू करण्याचा प्रायोगिक प्रकल्प यांचा समावेश आहे. त्याच वेळी, कचरा संकलन, बर्फ हटवणे, सबवेतील विलंब, रस्त्यांवरील खड्डे यांसारख्या दैनंदिन नागरी समस्यांची जबाबदारीही त्यांच्यावर असणार आहे.
झोहरान मामदानी यांचा जन्म युगांडातील कॅम्पाला येथे झाला. ते प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शिका मीरा नायर आणि शिक्षणतज्ज्ञ व लेखक महमूद मामदानी यांचे पुत्र आहेत. वयाच्या सातव्या वर्षी त्यांचे कुटुंब न्यूयॉर्क शहरात स्थायिक झाले. ९/११ नंतरच्या काळात मुस्लिमांबद्दल संशयाचे वातावरण असताना त्यांचे बालपण गेले. त्यांनी २०१८ मध्ये अमेरिकेचे नागरिकत्व स्वीकारले.
महापौर होण्यापूर्वी मामदानी यांनी डेमोक्रॅट उमेदवारांसाठी राजकीय मोहिमांमध्ये काम केले आणि २०२० मध्ये क्विन्समधील एका भागातून राज्य विधानसभेवर निवडून गेले. ते आणि त्यांची पत्नी रामा दुवाजी आता बाहेरील भागातील त्यांच्या एक खोलीच्या, भाडे-नियंत्रित घरातून मॅनहॅटनमधील अधिकृत महापौर निवासस्थानी राहायला जाणार आहेत.
