देशातील अनेक भागांमध्ये उष्णतेची तीव्र लाट कायम आहे. अशा परिस्थितीत योग्य आहार आणि पेयपदार्थांच्या मदतीने आरोग्याची काळजी घेता येते. वाढत्या तापमानात शरीराला थंडावा मिळावा म्हणून अनेकजण नैसर्गिक पेयांचा आधार घेतात. ही पेये केवळ उष्णतेपासून आराम देत नाहीत, तर शरीराला आवश्यक पोषकतत्त्वेही पुरवतात. घरगुती पद्धतीने तयार होणाऱ्या या पेयांमध्ये रासायनिक पदार्थ किंवा प्रिझर्व्हेटिव्ह नसतात. त्यामुळे उन्हाळ्यात बाजारातील शीतपेयांऐवजी या नैसर्गिक पेयांचा आहारात समावेश करणे अधिक फायदेशीर ठरू शकते.
- आम पन्हे : कच्च्या कैऱ्यांपासून तयार होणारे हे लोकप्रिय पेय व्हिटॅमिन सी, लोह आणि इलेक्ट्रोलाइट्सने समृद्ध असते. ते शरीराला थंडावा देऊन थकवा कमी करते आणि पचन सुधारते.
- लस्सी : पंजाब आणि हरियाणाची ओळख असलेली लस्सी प्रथिने, कॅल्शियम आणि प्रोबायोटिक्सने भरलेली असते. ती पोटाचे आरोग्य सुधारण्यास मदत करते.
- ताक : राजस्थान, गुजरात आणि देशातील अनेक भागांमध्ये ताकाचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. पचनास हलके आणि आंत्र आरोग्यासाठी फायदेशीर असलेले ताक व्हिटॅमिन बी-१२ आणि कॅल्शियमचा चांगला स्रोत आहे.
- सत्तूचे सरबत : बिहार, झारखंड आणि उत्तर प्रदेशातील हे पारंपरिक पेय प्रथिने, फायबर आणि खनिजांनी युक्त आहे. ते शरीराला ऊर्जा देत उष्णतेपासून संरक्षण करते.
- कोकम सरबत : कोकण आणि गोव्याची खासियत असलेले कोकम सरबत व्हिटॅमिन सी आणि अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध आहे. ते पचन सुधारते, शरीराला थंडावा देते आणि त्वचेसाठीही लाभदायक ठरते.
- सोलकढी : कोकम आणि ताज्या नारळाच्या दुधापासून तयार होणारी सोलकढी चवदार आणि पौष्टिक आहे. ती पचनक्रिया सुधारते आणि उष्णतेत शरीराला गारवा देते.
- पानकम : दक्षिण भारतातील हे पारंपरिक आयुर्वेदिक पेय गूळ, सुंठ, मिरी आणि वेलचीपासून बनवले जाते. ते शरीराला ऊर्जा देऊन पचनास मदत करते.
- नीर मोर : विशेषतः तामिळनाडूमध्ये लोकप्रिय असलेले हे पेय दही, पाणी आणि सौम्य मसाल्यांपासून तयार केले जाते. ते शरीराला थंडावा देऊन ताजेतवाने ठेवते.
- सम्बारम : दही, कढीपत्ता, आले आणि मसाल्यांपासून बनणारे हे दक्षिण भारतीय पेय इलेक्ट्रोलाइट्सने समृद्ध असून निर्जलीकरण टाळण्यास मदत करते.
- बेल पन्हे : ओडिशामधील लोकप्रिय पेय असलेले बेल पन्हे उष्णतेपासून आराम देण्याबरोबरच पोटाच्या तक्रारी कमी करण्यासही उपयुक्त मानले जाते.
उन्हाळ्यात कृत्रिम शीतपेयांऐवजी ही पारंपरिक, नैसर्गिक आणि पौष्टिक पेये आहारात समाविष्ट केल्यास शरीराला थंडावा मिळण्यासोबतच आरोग्यही उत्तम राहण्यास मदत होते.
