ईशान्येकडील राज्य अरुणाचल प्रदेशातील एका भारतीय महिलेचा पासपोर्ट अवैध ठरवल्याप्रकरणी भारताने चीनला कठोर इशारा दिला आहे. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, अरुणाचल प्रदेशातील एका भारतीय नागरिकाला मनमानीपणे ताब्यात घेण्याबाबत चीनने दिलेल्या स्पष्टीकरणाची आम्ही नोंद घेतली आहे. संबंधित महिला वैध पासपोर्टसह शांघाय आंतरराष्ट्रीय विमानतळावरून जपानच्या पुढील प्रवासासाठी निघाली होती.
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयसवाल यांनी माध्यमांच्या प्रश्नांना उत्तर देताना स्पष्ट केले की, अरुणाचल प्रदेश भारताचा अखंड आणि अविभाज्य भाग आहे; हे निर्विवाद सत्य आहे. चीन कितीही नकार देत राहिला तरी ही सत्यता बदलणारी नाही.
जयसवाल म्हणाले की, महिलेच्या ताब्याचा विषय चीनसमोर ठामपणे मांडण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय विमान प्रवास नियंत्रित करणाऱ्या विविध करारांचे उल्लंघन चीनने केले असून, चीनच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या कृतीचे अजूनही समाधानकारक स्पष्टीकरण दिलेले नाही. सर्व देशांच्या नागरिकांना २४ तास व्हिसा-मुक्त ट्रान्झिट देण्याच्या चीनच्या स्वत:च्या नियमाचाही भंग करण्यात आला आहे.
हे ही वाचा:
श्रीराम मंदिराच्या चित्ताकर्षक सुशोभीकरणाने लक्ष वेधले
हिंदूराष्ट्र घोषित करण्याची आता गरजच नाही…
“जर तुम्ही बंगालमध्ये मला लक्ष्य केले तर मी देशाला हादरवून टाकेन”
धर्मध्वज फडकवल्यानंतर शतकानुशतकांच्या जुन्या जखमा भरून आल्या!
भारताची ही प्रतिक्रिया त्या घटनेनंतर आली आहे, ज्यात शांघाय पुडोंग आंतरराष्ट्रीय विमानतळावर चीनच्या अधिकार्यांनी अरुणाचल प्रदेशातील महिलेचा पासपोर्ट अवैध ठरविला. पासपोर्ट अवैध ठरविण्याचे कारण म्हणजे ती महिला अरुणाचल प्रदेशातील असल्याचे सांगण्यात आले, आणि चीन अरुणाचल प्रदेशावर आपला दावा करतो.
अरुणाचलची रहिवासी पेमा वांग थोंगडोक यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’ वर चीनच्या अधिकाऱ्यांच्या अमानुष वर्तनाचा पर्दाफाश केला आहे. त्यांनी सांगितले की, २१ नोव्हेंबर रोजी १८ तास त्यांना विमानतळावर बंधक ठेवून त्रास दिला गेला. या घटनेनंतर भारताने चीनला कठोर प्रत्युत्तर दिले आहे.
पेमा यांनी सांगितले की, चीनच्या अधिकाऱ्यांनी त्यांचा भारतीय पासपोर्ट अवैध घोषित करताना म्हटले की, त्यांचे जन्मस्थान अरुणाचल प्रदेश हा चीनचा भाग असल्याने हा पासपोर्ट वैध मानता येणार नाही. ब्रिटनमध्ये राहणारी ही महिला २१ नोव्हेंबर रोजी लंडनहून जपानला जात होती. शांघायमध्ये तिचा फक्त तीन तासांचा ट्रान्झिट थांबा होता.
