कांदिवली पूर्व येथील वॉर्ड क्रमांक २९ मधून भाजपचे कार्यकर्ते नितीन चौहान याना मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर झाली आणि त्यांनी मंगळवारी उमेदवारी अर्ज भरला. भाजपने जी ७० उमेदवाराची यादी प्रारंभी जाहीर केली त्यात चौहान यांचे नाव समाविष्ट होते. माजी आमदार रमेश सिंह ठाकूर यांचे पुत्र आणि माजी नगरसेवक सागर सिंह ठाकूर यांचे तिकीट मात्र कापण्यात आले. निष्क्रियपणाचा फटका ठाकूर यांना बसल्याचे बोलले जाते. या निमित्ताने कांदिवली पूर्व येथील ठाकूर पर्व संपुष्टात आल्याचे बोलले जात आहे.
एकेकाळी काँग्रेसचा मजबूत जनाधार मानल्या जाणाऱ्या कांदिवली विधानसभा मतदारसंघात २००९ मध्ये तत्कालीन काँग्रेस नेते रमेशसिंह ठाकूर यांचे वर्चस्व होते. मात्र ठाकूर यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर काँग्रेसला मोठा धक्का बसला. त्यानंतर बीएमसी प्रभागांमध्ये भाजप–शिवसेना (अविभाजित) यांच्या युतीमुळे हा मतदारसंघ अधिक मजबूत झाला आणि अखेर तो भाजपच्या ताब्यात गेला. परिणामी, भाजपने सलग तीन वेळा अतुल भातखळकर यांना विधानसभा निवडणुकीत उमेदवार म्हणून उभे करून येथून विजय मिळवला आहे.
प्रभागनिहाय निकाल पाहिले असता, जवळपास प्रत्येक लढतीत भाजप उमेदवारांना काँग्रेसपेक्षा दुप्पटपेक्षा अधिक मते मिळाल्याचे स्पष्ट होते.
सागर सिंह ठाकूर हे वॉर्ड २९ मधून नगरसेवक होते पण पक्षाच्या बैठका, कार्यक्रम यांना उपस्थित न राहिल्यामुळे त्यांना पुन्हा संधी देण्यात आली नाही असे सांगितले जाते.
कांदिवली विधानसभा मतदारसंघाच्या एकूण लोकसंख्येपैकी सुमारे ६.०६ लाख मराठी भाषिक आहेत. तसेच ३.६२ लाखांहून अधिक उत्तर भारतीय आहेत. या परिसरात ३.३४ लाख मुस्लिम लोकसंख्याही आहे. आगामी निवडणुकीत या सर्व घटकांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.
नगरसेवक पदाची उमेदवारी मिळाल्यावर नितीन चौहान यांनी म्हटले आहे की, वॉर्ड क्रमांक २९ मधून महायुतीच्या उमेदवार म्हणून भारतीय जनता पक्षाच्या वतीने मी माझा उमेदवारी अर्ज दाखल केला. हा क्षण माझ्यासाठी केवळ राजकीय प्रवासातील एक टप्पा नसून, जनतेच्या विश्वासावर आणि कार्यकर्त्यांच्या अथक परिश्रमांवर उभा असलेला नवा संकल्प आहे.
या प्रसंगी उपस्थित राहून मला बळ देणाऱ्या माझ्या सर्व ज्येष्ठ नेतेमंडळी, पदाधिकारी, कार्यकर्ते, मित्रपरिवार तसेच वॉर्डमधील नागरिकांचे मनःपूर्वक आभार. तुमचा उत्साह, प्रेम आणि पाठिंबा हाच माझ्यासाठी खरा प्रेरणास्त्रोत आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.
हे ही वाचा:
‘न्यायाधीश चंद्रचूड’ असल्याचे भासवून महिलेकडून लुबाडले ३.७१ कोटी
सूर्यकुमार यादव यांचे तिरुमला श्री वेंकटेश्वर स्वामी मंदिरात दर्शन
मुल्लामौलवींनो इराण सोडा…खोमेनी राजवटीबद्दल संताप
२०२६ मध्ये जीडीपी वाढ ७.४ टक्क्यांपर्यंत पोहोचू शकते
चौहान म्हणतात, वॉर्ड क्रमांक २९ च्या सर्वांगीण विकासासाठी, जनतेच्या प्रत्येक प्रश्नासाठी आणि प्रामाणिक जनसेवेसाठी मी पूर्ण निष्ठेने कार्य करीन, हीच ग्वाही देतो. तुमच्या आशीर्वादाने आणि सहकार्याने हा लढा निश्चितच यशस्वी होईल, असा मला ठाम विश्वास आहे.
