भाजप खासदार संबित पात्रा यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर तिखट शब्दांत टीका केली. त्या केवळ केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनाच नव्हे तर संपूर्ण देशासाठी ‘धोकादायक’ असल्याचा आरोप त्यांनी केला. अमित शहा आणि ममता बॅनर्जी यांच्यात बेकायदेशीर घुसखोर आणि मतदार यादीच्या विशेष सघन सुधारणा (SIR) वरून झालेल्या शाब्दिक वादानंतर पत्रकार परिषदेत संबित पात्रा म्हणाले, “ममता बॅनर्जी यांनी भारताच्या गृहमंत्र्यांना धमकी दिली. त्या म्हणाल्या, तुम्ही हॉटेलमध्ये लपून बसला होता. जर आम्हाला हवे असते तर तुम्ही हॉटेलच्या बाहेर पाऊल ठेवू शकला नसता आणि तुम्ही भाग्यवान आहात की आम्ही तुम्हाला हॉटेलमधून बाहेर पडण्याची परवानगी दिली.” यावर पात्रा म्हणाले की, तुम्ही अमित शहांना धमकावत नाही आहात, तुम्ही भारताला धमकावत आहात.
संबित पात्रा म्हणाले की, “पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी आणि त्यांच्या तृणमूल काँग्रेसच्या गुंडांनी ३०० हून अधिक भाजप कार्यकर्त्यांची हत्या केली आहे. मतदार यादीतून घुसखोरांची नावे काढून टाकल्याने त्यांना अडचण आहे. ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालचा नाश केला आहे,” असे ते म्हणाले.
पश्चिम बंगाल सरकार सीमेवर कुंपण घालण्यासाठी जमीन देत नसल्याच्या अमित शहांच्या आरोपाचेही संबित पात्रा यांनी समर्थन केले. “गृहमंत्री अमित शहा यांनी स्पष्टपणे सांगितले की बंगालमध्ये भ्रष्टाचार, अन्याय आणि घुसखोरांवर राजकारण केले जात आहे आणि तेथील ममता सरकार कुंपण घालण्यासाठी जमीन देत नाही. मतदार यादीतून घुसखोरांची नावे वगळण्यावरून ममता बॅनर्जी आणि त्यांचे नेते बंगालमध्ये खूप अस्वस्थ आहेत,” अशी टीका त्यांनी केली.
हे ही वाचा:
नुसरत भरुचाने केले महाकाल दर्शन, मौलाना भडकले
मतदानापूर्वी भाजपचा पहिला विजय
भारताने चीनवर लादले तीन वर्षांचे स्टील टॅरिफ; कारण काय?
२०२५ मध्ये भारतीय अंतरिक्ष क्षेत्राला नवी गती
२०२६ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मंगळवारी एकमेकांवर जोरदार टीका केली. ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेस सरकारवर जोरदार हल्लाबोल करताना शाह यांनी म्हटले की, गेल्या १४ वर्षांपासून भीती आणि भ्रष्टाचार अशी राज्याची ओळख बनली आहे. पुढे ते म्हणाले की, “ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या काळात झालेल्या भ्रष्टाचारामुळे पश्चिम बंगालमधील विकास थांबला आहे. १५ एप्रिल २०२६ नंतर, जेव्हा पश्चिम बंगालमध्ये भाजपचे सरकार स्थापन होईल, तेव्हा आम्ही बंगालच्या वारसा आणि संस्कृतीचे पुनरुज्जीवन सुरू करू.”
