“मामूसारख्यांच्या भजनी लागलेले ज्वलंत हिंदुत्ववादी बांगलादेशातील हिंदूंविषयी बोलत नाहीत”

भाजप आमदार अतुल भातखळकर यांची ठाकरे गटावर सडकून टीका

“मामूसारख्यांच्या भजनी लागलेले ज्वलंत हिंदुत्ववादी बांगलादेशातील हिंदूंविषयी बोलत नाहीत”

बांगलादेशमध्ये हिंसाचार उसळला असून या दरम्यान सातत्याने हिंदूंना लक्ष्य करण्यात येत आहे. हिंदूंची हत्या करून मृतदेह जाळण्याचे प्रकार होत असल्याचे समोर येत आहे. तर, काही ठिकाणी हिंदूंची घरे लक्ष्य करून जाळण्यात येत आहेत. भारतासह जगभराचे लक्ष्य या घटनांवर असून भारताने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तर संयुक्त राष्ट्रांनीही बांगलादेशमध्ये अल्पसंख्यांकांच्या सुरक्षेसाठी युनूस सरकारला पावले उचलण्याचे निर्देश दिले आहेत. हिंदुंवर होत असलेल्या अत्याचारांवर आतापर्यंत ठाकरे गटाकडून आणि उद्धव ठाकरे यांच्याकडून प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. यावरून भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी निशाणा साधला आहे.

आमदार अतुल भातखळकर यांनी एक्सवर म्हटले आहे की, “बांगलादेशात हिंदूंवर अनन्वित अत्याचार सुरू आहेत, परंतु रशीद मामूसारख्यांच्या भजनी लागलेले ज्वलंत हिंदुत्ववादी बाटगे एक शब्द तोंडातून काढायला तयार नाहीत,” अशी खोचक टीका अतुल भातखळकर यांनी केली आहे. छत्रपती संभाजीनगर येथे माजी महापौर रशीद मामू यांना ठाकरे गटात प्रवेश देण्यात आला. याशिवाय त्यांना उमेदवारीही देण्यात आली आहे.

रशीद मामू यांचा पक्षप्रवेश आणि त्यांना जाहीर झालेली उमेदवारी यावरून ठाकरे गटावर केवळ बाहेरून टीका होत नसून अंतर्गत वाद देखील चव्हाट्यावर आला आहे. ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे आणि माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यात वाद निर्माण झाला आहे. उमेदवारी ठरवताना विचारले नसल्याचा दावा खैरेंनी केला, तर दानवे यांनी निर्णय शिवसेना भवनातून पक्षप्रमुखांच्या संमतीने झाल्याचे म्हणत दावा फेटाळला. रशीद मामूंच्या उमेदवारीमुळे ५० हजार हिंदू मतांचा फटका पक्षाला बसणार, असा विश्वास खैरेंनी व्यक्त केला. समान नागरी कायद्याच्या समर्थनार्थ काढण्यात आलेल्या मोर्चावेळी रशीद मामू यांनी दगडफेक घडवून आणली होती, असा आरोप त्यांच्यावर आहे. दंगल पसरवणारा नेता अशी त्यांची प्रतिमा असल्याने त्यांना पक्षात घेणे चुकीचे असल्याचे मत खैरे यांनी वारंवार मांडले होते.

हे ही वाचा:

राहुल गांधींचा दावा खोटा; कर्नाटकचे सर्वेक्षण म्हणते ईव्हीएम योग्य!

बांगलादेशमध्ये हिंदू व्यावसायिकाला चाकूने मारहाण करून जाळले

डबघाईला आलेल्या अर्थव्यवस्थेवरून इराणमध्ये हिंसक निदर्शने; सात जणांचा मृत्यू

काळा लसूण : हृदय, यकृत आणि रोगप्रतिकारशक्तीसाठी फायदेशीर

दरम्यान, बांगलादेशमध्ये ४० वर्षीय खोकन हे केउरभंगा बाजारातील त्यांचे औषध दुकान बंद करून घरी परतत असताना त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. हल्लेखोरांनी त्यांच्यावर धारदार शस्त्रांनी वार करून शरीरावर पेट्रोल ओतले आणि त्यांना पेटवून दिले. यादरम्यान खोकन यांनी जवळच्या तलावात उडी मारली यामुळे त्यांचा जीव वाचला. सध्या त्यांची प्रकृती गंभीर आहे. यापूर्वी बांगलादेशातील मैमनसिंग येथील एका कपड्याच्या कारखान्यात सुरक्षा ड्युटीवर असताना बजेंद्र बिस्वास नावाच्या आणखी एका हिंदू व्यक्तीची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. गेल्या आठवड्यात, अमृत मंडल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एका व्यक्तीची खंडणीच्या आरोपावरून मारहाण करून हत्या करण्यात आली. तर, ईशनिंदेच्या आरोपावरून कारखान्यातील कामगार दीपू चंद्र दास यांची हत्या करून मृतदेह जाळण्यात आला.

Exit mobile version