मुंबईमध्ये सध्या महापालिकेच्या निवडणुकीचे वारे वाहत असून राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अशातच मुंबईच्या महापौरपदी मराठी व्यक्ती बसणार यासाठी राजकीय पक्षांमध्ये चढाओढ लागलेली असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही यासंबंधी भाष्य केले आहे.
गुरुवारी ‘आज तक’च्या मुंबई मंथन कार्यक्रमात बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी अधोरेखित केले की, भाजप “राष्ट्र प्रथम” विचारसरणीचे पालन करतो. तसेच त्यांनी मराठी आणि बिगर- मराठी मतदारांना विभाजित करण्याचा भाजपाचा प्रयत्न असल्याचा दावा फेटाळून लावला. मुंबईच्या महापौरपदाची जागा मराठी हिंदूंसाठी राखीव आहे का असे विचारले असता, फडणवीस यांनी ठामपणे उत्तर दिले, “हो, नक्कीच.” त्यांनी पुढे म्हटले की, “जर चेन्नईमध्ये महानगरपालिका निवडणुका झाल्या तर लोक स्वाभाविकपणे म्हणतील की महापौर तमिळ असावा. त्याचप्रमाणे, मुंबईतही महापौर मराठीच असेल.”
मुंबई महानगर प्रदेशातील (एमएमआर) मीरा भाईंदर महानगरपालिकेत “उत्तर भारतीय” आणि “हिंदी भाषिक” महापौर निवडण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन भाजप नेते कृपाशंकर सिंह यांनी केल्यानंतर दीर्घकाळ चाललेला मराठी विरुद्ध बिगर- मराठी असा वाद पुन्हा निर्माण झाला होता. ठाकरे गट आणि मनसे या पक्षांनी या वक्तव्यावर जोरदार टीका केली. देवेंद्र फडणवीस यांनी एआयएमआयएम नेते पठाण यांच्या “बुरखाधारी” मुंबई महापौरांबद्दलच्या वक्तव्याकडे लक्ष वेधत विरोधकांच्या निवडक संतापावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
हे ही वाचा:
मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्याचा ठाकरे बधुंकडून पुनरुच्चार
भाजपशी युती केल्याने निलंबित केलेल्या १२ काँग्रेस नगरसेवकांनी हाती घेतले ‘कमळ’
अमेरिका रशियन तेल खरेदीदार देशांवर ५००% कर लावणार?
कामगिरी मूल्यांकनाच्या बहाण्याने नेमबाजी प्रशिक्षकाचा अल्पवयीन खेळाडूवर बलात्कार
मुंबई महानगरपालिका निवडणुकीत भाजपच्या विजयाचा विश्वास व्यक्त करताना, फडणवीस यांनी भाजपच्या मतदारांमध्ये मराठी आणि बिगर-मराठी दोन्ही समुदायांचा समावेश आहे यावर भर दिला. “प्रत्येकजण आम्हाला मतदान करतो. जरी दोन्ही भाऊ एकत्र आले तरी आमच्या मतांचा वाटा कमी होणार नाही,” असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
