राज्यसभेच्या रिक्त होणाऱ्या जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. एप्रिल २०२६ मध्ये सदस्यांचा कार्यकाळ संपत असल्याने ही निवडणूक होणार आहे. राज्यसभेच्या ३७ जागांसाठी मतदान पार पडणार असून यामध्ये सात जागा या महाराष्ट्रातील आहेत. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार, अर्ज भरण्याची अंतिम तारीख ५ मार्च निश्चित करण्यात आली आहे. त्यानंतर ६ मार्च रोजी अर्जांची छाननी केली जाईल. उमेदवारांना माघार घेण्यासाठी ९ मार्चपर्यंत मुदत देण्यात आली आहे.
मतदानाची प्रक्रिया १६ मार्च रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत पार पडणार आहे. त्याच दिवशी सायंकाळी ५ वाजल्यापासून मतमोजणी सुरू होणार असून निकाल जाहीर केले जातील. महाराष्ट्रातील सात जागांसाठी होणारी ही निवडणूक राजकीयदृष्ट्या महत्त्वाची मानली जात आहे. सध्याच्या खासदारांचा कार्यकाळ हा येत्या २ एप्रिल रोजी संपणार आहे.
महाराष्ट्रातील शरद पवार गटाच्या फौजिया खान, शरद पवार, ठाकरे गटाच्या प्रियंका चतुर्वेदी, काँग्रेसच्या रजनी पाटील, भाजपचे भागवत कराड, धैर्यशील पाटील आणि रामदास आठवले यांचा कार्यकाळ संपणार आहे. सध्या महाविकास आघाडीचे चार तर भाजप आणि आठवले मिळून तीन खासदार आहेत. हे सर्व येत्या २ एप्रिल रोजी निवृत्त होतील.
राज्यसभेसाठी संख्याबळाचे समीकरण कसे असेल?
एक जागा निवडून येण्यासाठी ३७ आमदारांचा कोटा असेल. सध्या शरद पवार गटाचे १०, काँग्रेसचे १६ आणि ठाकरे गटाचे २० असे तीन पक्षांचे मिळून ४६ आमदार आहेत. माकप आणि शेकापचे प्रत्येकी एक सदस्य आहेत. मविआ एकत्र राहिल्यास आणि या दोघांनी महाविकास आघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा दिला तर एक खासदार निश्चितपणे निवडून जाईल. मात्र, अशा परिस्थितीत ती एक जागा महाविकास आघाडीमधून कोणाला द्यायची यावर एकमत होणे आवश्यक असणार आहे. ३७ मतांचा कोटा पूर्ण केल्यानंतर मविआकडे केवळ ११ मते शिल्लक असतील. समाजवादी पार्टीचे २ तर एमआयएमचे एक आमदार सोबत गेला तर १४ मते अतिरिक्त असतील.
हे ही वाचा:
एआय समिटमधून चोरीला गेलेले स्टार्टअप डिव्हाइस २४ तासांत सापडले
पाकिस्तानसाठी रावी नदीचे पाणी बंद!
अल्फाबेटपासून मायक्रोसॉफ्ट, चॅनेल, अॅडोबचे सीईओ भारतीय!
आम्हाला माफ करा, लाज वाटते…दिल्ली अपघात; आरोपीच्या वडिलांची प्रतिक्रिया
तुलनेने महायुतीची स्थिती मजबूत आहे. भाजपचे १३१, शिंदेसेनेचे ५७, राष्ट्रवादी कॉंग्रेस (अजित पवार गट) ४० असे मिळून २२८ आमदार आहेत. सात आमदारांचा त्यांना पाठिंबा असल्याने हे संख्याबळ २३५ इतके आहे. त्यामुळे त्यांचे सहा उमेदवार राज्यसभेवर नक्कीच निवडून जातील. भाजपने सातवा उमेदवार दिला तर मात्र महाविकास आघाडी आणि महायुती अशी चुरस होईल.
