महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि राज्यातील भाजपाचे प्रमुख नेते देवेंद्र फडणवीस यांचा २२ जुलै हा वाढदिवस. त्यांच्या ५६व्या वाढदिवशी विविध स्तरातून त्यांचे अभिष्टचिंतन केले जात असताना राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रमुख नेते आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी फडणवीस यांच्यावरील महाराष्ट्र नायक या पुस्तकात त्यांच्या कार्यपद्धतीवर स्तुतिसुमने उधळली आहेत.
देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त गिरीश महाजन यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ‘महाराष्ट्र नायक’ या पुस्तकात शरद पवार यांनी ही मुक्तकंठाने तारीफ केली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या कामाची गती अफाट असल्याचे मत शरद पवार यांनी या पुस्तकातील लेखात नोंदवले आहे.
शरद पवार त्यात लिहितात की, दोन विभिन्न विचारधारेचे प्रवाह समांतर वाहत असताना त्यांनी एकमेकांविषयी काय बोलावे ! अन् बोलायचंच म्हटलं तर दोन्ही प्रवाहांची गती सारखी हवी. मी माझा वेग अजूनही अबाधित ठेवला आहे आणि देवेंद्र फडणवीसांच्या कार्याची गती अफाट आहे हे कसे काय नाकारता येईल ? देवेंद्र फडणवीस यांच्या कामाचा झपाटा आणि उरक पाहिला की, मला ‘मी पहिल्यांदा मुख्यमंत्री झालो’ तो कार्यकाळ आठवतो. देवेंद्र फडणवीसांचीदेखील ही गती ते माझ्या वयाचे होईपर्यंत राहो आणि कालचक्रमानाने ती वृद्धिंगत होत राहो, असे अभिष्टचिंतन त्यांच्या वाढदिवसानिमित्त करतो, असे शरद पवार यांनी म्हटले आहे.
कौटिल्याने अर्थशास्त्रात राजसत्ता अबाधित राहून तिचा विस्तार व्हावा. जनतेचे हित जपावे व जनकल्याणात वृद्धी व्हावी असे सांगितले आहे. कौटिल्याची योगक्षेम या राजकीय संकल्पनेत राज्यकर्त्यांचे अंतिम ध्येय केवळ राजकीय स्थैर्य प्राप्ती नाही तर जनहित आहे. देवेंद्र यांनी स्वतःला सिद्ध केले आहे. त्यामुळे त्यांनी राजकीय आखाड्याबाहेरील क्षितीजे अधिकाधिक पार करावीत, अशी माझी अपेक्षा आहे. त्यांच्या हातून व्यापक जनहिताची कार्ये पार पडतील, देशहितासाठी त्यांचं योगदान लाभो याकरिता माझ्या शुभेच्छा आहेत. देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राची अस्मिता राखण्यासाठी, महाराष्ट्र धर्म वाढवण्यासाठी, महाराष्ट्राची पुरोगामी, विज्ञानवादी आणि सांस्कृतिक परंपरा पुढे नेण्यासाठी अधिक स्वयंभू होवोत. त्यासाठी त्यांना उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो, ही सदिच्छा वाढदिवासानिमित्ताने व्यक्त करतो.
