राज्यातील प्रलंबित २९ महापालिकांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. या महापालिकांसाठी १५ जानेवारी रोजी मतदान होणार असून निवडणुकांचा निकाल १६ जानेवारी रोजी लागणार आहे. सोमवार, १५ डिसेंबर रोजीपासून आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. राज्य निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केली.
ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुका या खूप कालावधीपासून प्रलंबित होत्या. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला. त्यामध्ये सुरुवातीला २ डिसेंबर रोजी नगरपालिका आणि नगरपरिषदांच्या निवडणुका घेण्यात आल्या. आता त्यानंतर राज्यातील प्रलंबित २९ महापालिकांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. राज्यातील २९ महापालिकांसाठी ३ कोटी ४८ लाख मतदार मतदान करणार आहेत.
कसा असेल निवडणूक कार्यक्रम?
- नामनिर्देशन पत्र स्वीकारण्याचा कालावधी- २३ ते ३० डिसेंबर
- नामनिर्देशन पत्र छाननी- ३१ डिसेंबर २०२५
- उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत- २ जानेवारी २०२६
- निवडणूक चिन्ह वाटप आणि अंतिम उमेदवार यादी- ३ जानेवारी २०२६
- मतदान- १५ जानेवारी २०२६
- निवडणूक निकाल- १६ जानेवारी २०२६
हे ही वाचा:
पहलगाम दहशतवादी हल्ल्यासंबंधी एनआयएने दाखल केले आरोपपत्र; काय खुलासे?
‘मनरेगा’ रद्द करून नवीन ग्रामीण रोजगार कायदा आणणार?
तेजस्वी घोसाळकरांचा ठाकरेंना जय महाराष्ट्र; भाजपात प्रवेश!
‘धुरंधर’ने ओलांडला ५०० कोटींचा टप्पा!
राज्यातील २७ महापालिकांची मुदत संपली असून जालना आणि इचलकरंजी या दोन नवीन महापालिकांच्या निवडणुका होणार आहेत. या महापालिका निवडणुकांसाठी १ जुलै २०२५ रोजीची मतदान यादी ग्राह्य धरण्यात येणार आहे. राज्यातील १,९६,६०५ कर्मचारी या निवडणुकीसाठी काम करतील. मतदानाच्या आधी ४८ तास प्रचारावर बंदी असेल. तसेच त्या दरम्यान जाहिरातींवरही बंदी असेल. महापालिका निवडणूक नियमांनुसार ही बंदी असेल. राज्यातील २९ महापालिकांमधील एकूण २,८६९ जागांसाठी मतदान होणार आहे. त्यामध्ये १,४४२ महिला सदस्य, ७५९ इतर मागासवर्गीय सदस्य, ३४१ अनुसूचित जाती तर ७७ सदस्य हे अनुसूचित जमातीचे सदस्य असतील.
