अभिषेक शर्मा सिक्सर किंग बनणार?

अभिषेक शर्मा सिक्सर किंग बनणार?

भारतीय क्रिकेट संघाचा सलामीवीर अभिषेक शर्मा आपल्या आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जातो. आंतरराष्ट्रीय क्रिकेट असो किंवा आयपीएल, त्याची खेळण्याची शैली नेहमीच धडाकेबाज राहिली आहे. टी-२० विश्वचषक २०२६ च्या अंतिम सामन्यात अर्धशतक झळकावत भारताला विजेतेपद मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या अभिषेकची नजर आता आयपीएल २०२६ वर आहे. २८ मार्चपासून सुरू होणाऱ्या या हंगामात त्याच्या नावावर एक खास विक्रम नोंदवला जाऊ शकतो.

२०१९ पासून सनरायझर्स हैदराबाद (एसआरएच) संघाकडून खेळणाऱ्या अभिषेकने दरवर्षी आपली कामगिरी उंचावली आहे. आयपीएल २०२५ पर्यंत त्याने एसआरएचसाठी ७४ सामन्यांत ९६ षटकार ठोकले आहेत. आयपीएल २०२६ मध्ये फक्त ४ षटकार मारताच तो एसआरएचकडून १०० षटकार पूर्ण करणारा दुसरा फलंदाज ठरणार आहे.

एसआरएचसाठी १०० किंवा त्याहून अधिक षटकार मारणारा एकमेव फलंदाज म्हणजे माजी कर्णधार डेव्हिड वॉर्नर. वॉर्नरने २०१४ ते २०२१ दरम्यान ९५ सामन्यांत १४३ षटकार लगावले होते.

याशिवाय, अभिषेकला आयपीएल २०२६ मध्ये एसआरएचसाठी २,००० धावांचा टप्पाही गाठण्याची संधी आहे. त्यासाठी त्याला फक्त २४७ धावांची गरज आहे. त्याच्या सध्याच्या फॉर्मचा विचार करता, हा टप्पा गाठणे शक्य दिसत आहे.

सध्या अभिषेक एसआरएचसाठी सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत चौथ्या स्थानावर आहे. त्याने १ शतक आणि ९ अर्धशतकांच्या जोरावर १,७५३ धावा केल्या आहेत. आगामी हंगामात २,००० धावा पूर्ण करताना केन विल्यमसनला मागे टाकत तो तिसऱ्या स्थानावर पोहोचू शकतो. विल्यमसनने ७६ सामन्यांत २,१०१ धावा केल्या आहेत.

एसआरएचसाठी सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम डेव्हिड वॉर्नरच्या नावावर आहे. त्याने २ शतके आणि ४० अर्धशतकांच्या मदतीने ४,०१४ धावा केल्या आहेत. दुसऱ्या स्थानावर शिखर धवन असून, त्याने २०१३ ते २०१८ दरम्यान ९१ सामन्यांत २,७६८ धावा केल्या आहेत.

आता आयपीएल २०२६ मध्ये अभिषेक शर्मा कोणते नवे विक्रम रचतो, याकडे क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

Exit mobile version