मुंबईची साथ सोडल्यावर पृथ्वी शॉ बुची बाबू स्पर्धेतून महाराष्ट्र संघासाठी पदार्पण करणार आहे. या स्पर्धेसाठी १७ सदस्यीय महाराष्ट्र संघाची घोषणा करण्यात आली असून, त्यात ऋतुराज गायकवाडचाही समावेश आहे. पृथ्वी शॉने अलीकडेच मुंबई संघापासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला होता आणि तो आता महाराष्ट्र संघात सामील झाला आहे.
टीम इंडियाचे प्रतिनीधत्व करणारा पृथ्वी शॉने अलीकडेच मुंबई संघापासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला होता. मागील हंगामात मुंबईकडून खराब कामगिरी, खराब फिटनेस आणि शिस्तभंग मुद्द्यावरून त्याला मुंबईच्या संघात स्थान मिळाले नव्हते.त्यामुळे २५ वर्षीय पृथ्वी शॉने आता ट्रॅकवर परतण्यासाठी मुंबईची साथ सोडून महाराष्ट्र संघ निवडला आहे. बुची बाबू स्पर्धेचे आयोजन १८ ऑगस्ट ते ९ सप्टेंबर दरम्यान चेन्नईमध्ये होणार आहे.
अंकित बावणे याला महाराष्ट्र संघाचा कर्णधार म्हणून नेमण्यात आले आहे. ऋतुराज गायकवाड आणि यष्टीरक्षक सौरभ नवाले या दोघांनाही एक सामना खेळल्यानंतर दुलीप ट्रॉफीसाठी बंगळुरूमध्ये पश्चिम विभागाच्या संघात सामील व्हावे लागणार आहे. पश्चिम विभागाला थेट उपांत्य फेरीत प्रवेश मिळाला आहे आणि ते आपला पहिला सामना ४ सप्टेंबर रोजी खेळतील. ऋतुराज गायकवाडने शेवटचा सामना भारत आणि भारत अ संघ यांच्यात इंग्लंड दौऱ्याआधी झालेल्या सराव सामन्यात खेळला होता आणि तोही पुन्हा एकदा आपली छाप सोडण्यासाठी उत्सुक आहे.
बुची बाबू स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात – अंकित बावणे (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, पृथ्वी शॉ, सिद्धेश वीर, सचिन धास, अर्शिन कुलकर्णी, हर्षल काटे, सिद्धार्थ म्हात्रे, सौरभ नवाले, मंदार भंडारी, रामकृष्ण घोष, मुकेश चौधरी, प्रदीप दाधे, विक्की ओस्तवाल, हितेश वालुंज, प्रशांत सोलंकी आणि राजवर्धन हांगरगेकर यांचा समावेश असणार आहे.
