अंडर-१९ विश्वचषक स्पर्धेत भारत-पाकिस्तान सामन्यादरम्यान पाकिस्तान संघाचे मेंटॉर सफराज अहमद ड्रेसिंगरूममध्ये मोबाईल फोन वापरताना दिसल्याने चर्चेला उधाण आले आहे. या घटनेचे व्हिडिओ आणि छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर चाहत्यांकडून आणि क्रिकेट वर्तुळातून प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत.
आयसीसीच्या नियमांनुसार खेळाडू, पंच आणि सामनाधिकारी यांना सामन्यादरम्यान मर्यादित क्षेत्रात इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशन डिव्हाइस वापरण्यास मनाई आहे. सामन्यापूर्वी खेळाडूंनी आपले मोबाईल फोन सुरक्षा अधिकाऱ्यांकडे जमा करणे बंधनकारक असते. सामना संपल्यानंतरच ते परत दिले जातात. फिक्सिंग आणि गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी ही तरतूद करण्यात आली आहे.
मात्र, सफराज अहमद संघ व्यवस्थापनाचा भाग असल्याने त्यांना मोबाईल वापरण्याची परवानगी असल्याचे स्पष्टीकरण संबंधित सूत्रांकडून देण्यात आले आहे. तरीही, U19 स्तरावरील स्पर्धेत अशी घटना घडल्याने नियमांच्या अंमलबजावणीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्ड किंवा आयसीसीकडून अधिकृत प्रतिक्रिया अद्याप देण्यात आलेली नाही.
दरम्यान, रविवारी क्विन्स स्पोर्ट्स क्लब मैदानावर झालेल्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा १२४ धावांनी पराभव करत सेमीफायनलमध्ये प्रवेश केला. भारताने प्रथम फलंदाजी करत २७३ धावांचे लक्ष्य ठेवले. प्रत्युत्तरात पाकिस्तानचा संघ १४९ धावांवर गारद झाला. भारताच्या गोलंदाजांनी प्रभावी कामगिरी करत प्रतिस्पर्ध्यांना रोखले. २९ धावा देत ३ बळी घेणाऱ्या कनिष्क चौहान याला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले.
या घटनेमुळे सामन्याच्या निकालाबरोबरच शिस्तीच्या मुद्द्यावरही चर्चा रंगली असून पुढील काही दिवसांत याबाबत अधिक स्पष्टता येण्याची शक्यता आहे.
