राजीव गांधी इंटरनॅशनल स्टेडियमवर हैदराबादविरुद्ध सुरू असलेल्या रणजी ट्रॉफीच्या सहाव्या फेरीतील सामन्यात सरफराज खानने अफलातून दुहेरी शतक ठोकत मुंबईला मोठी आघाडी मिळवून दिली आहे. सरफराजच्या या खेळीच्या जोरावर मुंबईने पहिल्या डावात तब्बल ५६० धावा केल्या आहेत.
विजय हजारे ट्रॉफीत तुफान फॉर्म दाखवणारा सरफराज जेव्हा मुंबईसाठी पांढऱ्या कपड्यात मैदानात उतरला, तेव्हा त्याची फलंदाजी आणखी खुलून दिसली. पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या सरफराजने २१९ चेंडूंमध्ये ९ षटकार आणि १९ चौकारांच्या मदतीने २२७ धावांची जबरदस्त खेळी केली. त्याच्या याच इनिंगमुळे मुंबई एवढ्या मोठ्या स्कोअरपर्यंत पोहोचू शकली.
हे सरफराजचं प्रथम श्रेणी क्रिकेटमधलं पाचवं दुहेरी शतक ठरलं. या डावातच त्याने फर्स्ट क्लास क्रिकेटमधल्या ५,००० धावांचाही टप्पा पार केला.
सरफराजने चौथ्या विकेटसाठी सिद्धेश लाडसोबत २४९ धावांची महत्त्वाची भागीदारी केली. त्यानंतर सहाव्या विकेटसाठी सुवेद परकरसोबत ११४ धावांची भागीदारीही उभी केली.
सिद्धेश लाडने १७९ चेंडूंमध्ये २ षटकार आणि १० चौकारांसह १०४ धावा केल्या. सुवेद परकरने ९८ चेंडूंमध्ये १ षटकार आणि ११ चौकार मारत ७५ धावांची खेळी केली.
सलामीवीर अखिल हर्वाडेकरने २७, तर आकाश आनंदने ३५ धावा केल्या. दोघांमध्ये पहिल्या विकेटसाठी ६० धावांची भागीदारी झाली. अथर्व अंकोलेकरनेही २२ चेंडूंमध्ये झटपट ३५ धावा जोडल्या.
हैदराबादकडून सी. टी. एल. रक्षण सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने २४ षटकांत १०७ धावा देत ४ बळी घेतले. रोहित रायडूने २ विकेट घेतल्या. कर्णधार मोहम्मद सिराज, नीतिन साई यादव आणि कोडीमेला मधुशन हिमतेजा यांना प्रत्येकी १ विकेट मिळाली.
