दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरू झालेल्या पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील पहिल्याच सामन्यात न्यूझीलंडला घरच्या मैदानावर लाजिरवाणा पराभव स्वीकारावा लागला. बे ओव्हल येथे झालेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने न्यूझीलंडचा ७ विकेट्सनी सहज पराभव करत मालिकेत १-० अशी आघाडी घेतली.
न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, पण तो पूर्णपणे चुकीचा ठरला. संघाची सुरुवातच अत्यंत खराब झाली. २१ धावांत ४ आणि ३६ धावांत ५ विकेट्स पडल्यामुळे संघ दबावात गेला. यात डेव्हन कॉन्वे आणि टॉम लॅथम यांसारख्या अनुभवी फलंदाजांचाही समावेश होता.
सुरुवातीचा धक्का न्यूझीलंडला सावरता आला नाही आणि संपूर्ण संघ १४.३ षटकांत केवळ ९१ धावांत गारद झाला. परिस्थिती आणखी वाईट झाली असती, पण जिमी निशमने २१ चेंडूत २६ धावा करत थोडा प्रतिकार केला. संघातील ७ फलंदाजांना दोन अंकी धावसंख्याही गाठता आली नाही.
दक्षिण आफ्रिकेकडून एन मोकोएना यांनी ३.३ षटकांत २६ धावा देत ३ विकेट्स घेतल्या. गेराल्ड कोएट्झे, ऑटनिल बार्टमन आणि कर्णधार केशव महाराज यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेत न्यूझीलंडच्या फलंदाजीचा कणा मोडला.
९२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेला सुरुवातीला दोन धक्के बसले. टोनी डी जॉर्जी (२) आणि रुबिन हर्मन (७) लवकर बाद झाले. मात्र कॉनर एस्टरहुइजनने ४८ चेंडूत नाबाद ४५ धावा करत संघाला विजय मिळवून दिला.
दक्षिण आफ्रिकेने १६.३ षटकांत ३ विकेट्स गमावून ९३ धावा करत सामना ७ विकेट्सनी जिंकला. डियान फॉरेस्टर १६ धावांवर नाबाद राहिले.
न्यूझीलंडकडून काइल जेमिसन, जॅकारी फॉक्स आणि कर्णधार सॅन्टनर यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
