भारतीय युवा शटलर तन्वी शर्मा हिने ताइपे बॅडमिंटन ओपन २०२६ स्पर्धेत शानदार कामगिरी कायम राखत महिला एकेरीच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. बीडब्ल्यूएफ सुपर ३०० स्पर्धेच्या उपांत्य फेरीत तिने पाचव्या मानांकित यजमान खेळाडू हुआंग यू-हसुन हिचा २१-१७, २१-११ असा सरळ गेममध्ये पराभव करत भारताच्या विजेतेपदाच्या आशा कायम ठेवल्या.
जागतिक क्रमवारीत ३४व्या स्थानावर असलेल्या तन्वीने अवघ्या ३३ मिनिटांत सामना जिंकला. आता रविवारी होणाऱ्या अंतिम सामन्यात तिची लढत व्हिएतनामच्या गुएन थुई लिन्ह हिच्याशी होणार आहे.
उपांत्यपूर्व फेरीत तन्वीने थायलंडच्या चौथ्या मानांकित सुपनिडा कातेथोंग हिच्याविरुद्ध पिछाडीवरून शानदार पुनरागमन करत तीन गेममध्ये विजय मिळवला होता. मात्र, उपांत्य फेरीत तिने सुरुवातीपासूनच वर्चस्व राखत प्रतिस्पर्धीला पुनरागमनाची कोणतीही संधी दिली नाही.
गेल्या दोन वर्षांत तन्वीची आंतरराष्ट्रीय स्तरावरील कामगिरी सातत्याने उंचावत आहे. २०२४ मध्ये बॅडमिंटन आशिया टीम चॅम्पियनशिपमध्ये भारताच्या सुवर्णपदक विजेत्या संघाची ती सदस्य होती. तसेच २०२५ मध्ये ओडिशा मास्टर्स सुपर १०० आणि गुवाहाटी मास्टर्स सुपर १०० स्पर्धेत उपविजेतेपद पटकावले, तर बॉन इंटरनॅशनल २०२४ आणि डेन्मार्क चॅलेंज २०२५ स्पर्धेचे विजेतेपदही तिने जिंकले आहे.
दरम्यान, दुसरी भारतीय खेळाडू उन्नती हुड्डा हिला उपांत्य फेरीत गुएन थुई लिन्हकडून १५-२१, १८-२१ असा पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे महिला एकेरीतील अखिल भारतीय अंतिम फेरीची संधी हुकली.
पुरुष एकेरीत भारताची मोहिम निराशाजनक ठरली. किरण जॉर्ज याला उपांत्यपूर्व फेरीत जपानच्या युदाई ओकिमोटो याच्याकडून १२-२१, १०-२१ असा पराभव पत्करावा लागला. यापूर्वी एच. एस. प्रणयही स्पर्धेबाहेर पडला होता. पुरुष दुहेरीत भार्गव राम अरिगेला आणि विश्व तेज गोब्बूरू ही भारतीय जोडी पहिल्याच फेरीत बाद झाली.
