भारतीय क्रिकेट संघाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. डावखुरा आक्रमक फलंदाज तिलक वर्मा यांच्यावर राजकोटमध्ये तातडीची शस्त्रक्रिया करण्यात आली असून, त्यामुळे ते न्यूझीलंडविरुद्धच्या आगामी ५ सामन्यांच्या टी२० मालिकेतून बाहेर राहण्याची दाट शक्यता आहे. इतकेच नव्हे, तर त्यांचा टी२० विश्वचषक २०२६ मधील सहभागही सध्या संशयात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी नाश्त्यानंतर तिलक वर्मा यांना अचानक पोटात तीव्र वेदना सुरू झाल्या. प्रकृती गंभीर झाल्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. तपासणीत शस्त्रक्रियेची गरज असल्याचे स्पष्ट झाले. बंगळुरू येथील बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सलन्सच्या वैद्यकीय पथकाच्या सल्ल्यानुसार राजकोटमधील एका सुपर-स्पेशालिटी रुग्णालयात त्यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून, शुक्रवारी त्यांना डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे.
एका वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, अशा प्रकारच्या तातडीच्या शस्त्रक्रियेनंतर खेळाडू पूर्णपणे तंदुरुस्त होण्यासाठी जास्तीत जास्त एक महिना लागू शकतो. टिश्यू डॅमेज किती आहे, यावर रिकव्हरीचा कालावधी अवलंबून असतो. त्यामुळे फेब्रुवारीत सुरू होणाऱ्या विश्वचषकापूर्वी तिलक पूर्ण फिट होतील की नाही, याबाबत अनिश्चितता आहे.
टी२० विश्वचषक २०२६ ची सुरुवात ७ फेब्रुवारी पासून होत असून, भारत आपला पहिला सामना अमेरिकेविरुद्ध खेळणार आहे. त्याआधी न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या टी२० मालिकेत तिलक वर्मा खेळण्याची शक्यता फारच कमी मानली जात आहे. त्यांच्या जागी कोणाला संधी दिली जाणार, याबाबत बीसीसीआयकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
तिलक वर्मा जर विश्वचषकातून बाहेर झाले, तर हा भारतीय संघासाठी मोठा धक्का ठरेल. आशिया कप अंतिम सामन्यात पाकिस्तानविरुद्ध २० धावांत ३ गडी बाद अशा कठीण परिस्थितीत त्यांनी ५३ चेंडूंमध्ये नाबाद ६९ धावांची दमदार खेळी करत भारताला विजेतेपद मिळवून दिले होते. आतापर्यंत त्यांनी ४० टी२० सामन्यांत २ शतके आणि ६ अर्धशतकांच्या जोरावर १,१८३ धावा केल्या आहेत.
आता भारतीय संघ व्यवस्थापन आणि चाहत्यांचे लक्ष तिलक वर्मा यांच्या रिकव्हरीकडे लागले आहे. पुढील एक ते दोन आठवड्यांतील वैद्यकीय अहवालानंतरच तिलक वर्मा टी२० विश्वचषक २०२६ खेळू शकतील की नाही, हे स्पष्ट होणार आहे.
