राज्यातील अनेक जिल्ह्यांना गुरुवारी पावसाने झोडपून काढले. यामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली होती. मुसळधार पावसाचा जोरदार फटका बसला तो पुणे जिल्ह्याला. पुरात अडकलेल्या नागरिकांना वाचवण्यासाठी लष्कराला पाचारण करण्यात आले होते. यानंतर दुपारनंतर पावसाने थोडी विश्रांती घेताच पाण्याचा निचरा होऊ लागला आणि जनजीवन सुरळीत होऊ लागले. दरम्यान, समुद्रही खवळला होता. अशातच अलिबाग समुद्रात एक जहाज भरकटल्याची घटना घडली.
मुसळधार झालेल्या पावसादरम्यान जे एस डब्ल्यु कंपनीचे एक बार्ज भरकटले. हे जहाज धरमतरकडून जयगडच्या दिशेने निघाले होते. खराब हवामान, सोसाट्याचा वारा आणि दृष्यमानता कमी असल्यामुळे हे जहाज भरकटले. ते अलिबाग कुलाबा किल्ल्याच्या मागील बाजूस आले. अखेर या ठिकाणी ते नांगरून ठेवण्यात आले. याबार्ज वर १४ खलाशी होते. बार्जवरील सर्व खलाशी सुखरूप आहेत.
यामधील १४ क्रू मेंबर्संना शुक्रवार, २६ जुलै रोजी कोस्टगार्डच्या हेलिकॉप्टरने रेस्क्यू ऑपरेशन करुन वाचवले आहे. सकाळी ८.५६ ते ९.५८ या वेळेत हे बचावकार्य राबवण्यात आले. यावेळी हेलिकॉप्टरच्या सहाय्याने रेस्क्यू ऑपरेशन करुन सर्व १४ क्रु मेंबर्संना वाचवण्यात आले. शिवाय त्यांची वैद्यकीय चाचणी केली असता ते मेडिकली फिट असल्याची माहिती समोर आली आहे.
हे ही वाचा:
कारगिल विजय दिवस: २५ वर्षांपूर्वी पाकिस्तानला चारी मुंड्या चित करून भारताने ‘कारगिल’ जिंकले!
पुण्यातील पूरस्थितीत बचावकार्यासाठी लष्कराचे जवान मैदानात
अनिल देशमुख पुरावे द्या, ३ तासाच्या आत तुमच्याही ऑडियो क्लिप्स जनतेसमोर आणू !
घटनेची माहिती मिळताच अलिबागचे तहसीलदार विक्रम पाटील यांनी घटनास्थळी जावून पाहणी केली. जे.एस डब्ल्यु कंपनीच्या अधिकाऱ्यांना याची माहिती देण्यात आली. त्यानंतर कंपनीची यंत्रणा बार्ज काढण्यासाठी घटनास्थळी दाखल झाली. रात्री उशीरा बार्ज काढण्याचे काम सुरू होते. मात्र, अंधार आणि खराब हवामानामुळे रात्री मदत आणि बचाव कार्य पूर्ण करता आले नाही.
