महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बुधवारी (२८ जानेवारी) सकाळी विमान अपघातात निधन झाले. माहितीनुसार, त्यांना घेऊन जाणारे चार्टर्ड विमान बारामती येथे उतरण्याच्या तयारीत असताना कोसळले. या अपघातात अजित पवारांसह विमानात असलेल्या सर्वांचा मृत्यू झाला. पुणे जिल्ह्यातील बारामती भागात हा अपघात झाला, जिथे विमान एका मोकळ्या शेतात कोसळले आणि आगीच्या भक्ष्यस्थानी सापडले.
अपघातात स्थळावरील एका प्रत्यक्षदर्शीने या अपघाताचे वर्णन करताना म्हटले की, “मी हा अपघात स्वतःच्या डोळ्यांनी पाहिला. ते खरोखरच वेदनादायक आहे. विमान खाली उतरत असताना असे वाटत होते की ते कोसळेल आणि अखेर विमान कोसळले. त्यानंतर एक मोठा स्फोट झाला. आम्ही तेथे धावलो आणि पाहिले की विमानाला आग लागली आहे. विमानात आणखी चार-पाच स्फोट झाले. लोकांनी आत अडकलेल्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला, पण आग खूप तीव्र होती. अजित पवार देखील विमानात होते. मी या वेदना शब्दात वर्णन करू शकत नाही.” बारामती विमानतळाजवळ विमान उतरण्याचा प्रयत्न करत असताना हा अपघात झाला. सुरुवातीला विमानातील सर्वजण गंभीर जखमी झाल्याचे सांगण्यात आले होते, परंतु नंतर कोणीही वाचले नाही अशी पुष्टी करण्यात आली.
घटनेच्या अहवालानुसार, अपघातग्रस्त विमान हे VT-SSK नोंदणी क्रमांक असलेले Learjet 45 होते आणि ते VSR द्वारे चालवले जात होते. विमानात पायलट- इन-कमांड, एक फर्स्ट ऑफिसर आणि तीन प्रवाशांसह पाच जण होते. अजित पवार हे त्यांचे वैयक्तिक सुरक्षा अधिकारी आणि एका सहाय्यकासह प्रवास करत असल्याचे वृत्त आहे. बारामती विमानतळाजवळील एका मोकळ्या शेतात हे विमान कोसळले. सोशल मीडियावरील व्हिडिओंमध्ये दिसून येत आहे की, विमानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तसेच परिसरात आगीच्या ज्वाळा पसरल्याचे दिसून येत आहे.
हे ही वाचा:
“दमदार आणि दिलदार मित्र सोडून गेला…”
“मोठा भाऊ गेला… अजित पवारांच्या जाण्याने महाराष्ट्राचं मोठं नुकसान”
राज्याच्या राजकारणातील ‘दादा’ व्यक्तिमत्त्व हरपले! कशी होती राजकीय कारकीर्द?
“जनतेशी घट्ट नाते असलेले, तळागाळाशी मजबूत नाळ असलेले लोकनेते अजित पवार”
अजित पवार बुधवारी सकाळी ११ वाजता बारामती येथे येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीशी संबंधित जाहीर सभेला संबोधित करणार होते. या अपघाताने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. अनेक राज्य आणि केंद्रीय नेत्यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे, तर विमान अपघाताच्या कारणांची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
